कोल्हापूर – पाकिस्तानने क्रिकेटची मॅच जिंकल्यावर भारतात काही ठिकाणी फटाके फोडले जातात, तसेच काही ठिकाणी धर्मांधांकडून राष्ट्रध्वज जाणीवपूर्वक उलटा फडकवल्याच्या कृती झाल्या आहेत. त्याचा कधी पुरोगामी, निधर्मी लोकांनी निषेध केला नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकावला जात नव्हता; पण आज राज्यकर्त्यांनी भगवा झेंडा खांद्यावर घेतल्यामुळे काश्मीरमध्ये तिरंगा डौलाने फडकत आहे. त्यामुळे ऋषितुल्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी ‘तिरंग्या झेंड्यासमवेत भगवा झेंडा घ्या’, असे म्हणणे चूक ती काय ? तरी तिरंगा झेंड्याच्या आडून कुणी भगव्या झेंड्याला विरोध करत असेल, तर सकल हिंदु समाज खपवून घेणार नाही, असे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरसकर, फेरीवाले संघटनेचे श्री. अर्जुन आंबी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विजय करसगार, सर्वश्री पियुश पाटील, हर्ष ऐतवडे, शैलेश अतिगरे, नितीन नाळे उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देश स्वतंत्र्य होऊन हिंदु समाज अजूनही अत्याचार सहन करत आहे. त्यामुळे भारत देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी आहे. मुसलमान समाजाने ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास विरोध केला त्या वेळी डाव्या, पुरोगामी, साम्यवादी लोकांनी कधी या विरोधात आवाज उठवला नाही. त्यामुळे अशा लोकांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. तिरंग्याच्या आडून पुरोगामी, साम्यवादी, निधर्मी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समस्त हिंदूंसाठी आदर्श असलेल्या भगव्या झेंड्याला विरोध चालू केला आहे. तरी जाणीवपूर्वक हिंदु समाजात तेढ निर्माण करणार्या पुरोगामी, डाव्या विचारसरणीच्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत.