वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात मान्यवरांनी केलेली भाषणे

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव – द्वितीय दिन : ‘मंदिर मुक्ती अभियान’ सत्र

‘मंदिर मुक्ती अभियान’

‘सेक्युरिझम’ च्या नावाखाली आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे हिंदूंविरोधी कारवाया चालू ! –  महेश डेगला, संस्थापक अध्यक्ष, हिंदू उपाध्याय समिती, आंध्रप्रदेश

श्री. महेश डेगला

राजा कृष्णदेवराय यांनी युद्ध केले नसते, तर सर्व दक्षिण भारत बाबरच्या हातात गेला असता. सध्या मात्र आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील व्यवस्था साम्यवाद्यांच्या हातात गेली आहे. या दोन्ही राज्यांतील सर्व शिक्षणव्यवस्थेमध्ये नक्षलवादी मानसिकतेचे लोक आहेत. पुस्तकांच्या छपाईच्या कामातही साम्यवादी विचारांचे लोक आहेत. आंध्रप्रदेशमध्ये इयत्ता ६ वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भारताच्या नकाशामध्ये ‘जम्मू-काश्मीर’ दाखवण्यात आलेले नाही. येथील सर्व शिक्षणव्यवस्था पोखरली आहे. ‘हिंदुविरोधी शक्तींनी आतापर्यंत अफगाणिस्तानपासून भारतापर्यंत ८ कोटी हिंदूंची हत्या केली’, याची माहिती मात्र कुठेही मिळत नाही. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे रमजानच्या काळात शाळा आणि शासकीय कार्यालये यांमध्ये १ मास नियमित प्रार्थनेसाठी १ घंटा सुट्टी दिली जाते; मात्र हिंदूंच्या सणांच्या काळात हिंदु अधिकार्‍यांना कामकाजाच्या वेळेत सुट्टी दिली जात नाही. ‘हिंदूंनाही शाळा आणि शासकीय कार्यालये यांमध्ये प्रार्थनेसाठी सुट्टी मिळावी’, यासाठी मागील ३ वर्षांपासून ‘हिंदु उपाध्याय समिती’कडून सरकारला सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत आहे; मात्र अद्याप सरकारकडून आम्हाला उत्तर मिळालेले नाही. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांत ‘उर्दू’ भाषा द्वितीय स्थानावर पोचली आहे. येथे हिंदूंची हत्या झाली तरी कुणाला काही वाटत नाही. ‘सेक्युरिझम’च्या नावाखाली आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे हिंदुविरोधी कारवाया चालू आहेत. या दोन्ही राज्यांतील हिंदुविरोधी कारवाया पहाता हिंदूंनी वेळीच  जागृत होणे आवश्यक आहे. ‘हिंदु उपाध्याय समिती’चे १० सहस्र कार्यकर्ते आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांत धर्मकार्यासाठी कार्यरत आहेत.


कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु जनजागृती समिती

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

वर्ष १९२० मध्ये श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचा डावा हात भग्न झाला. तेव्हापासून तो हात धातूच्या पट्ट्यांचा जोड देऊन मूर्तीला अडकावण्यात आला आहे. हिंदु धर्मशास्त्रात परंपरागत पद्धतीने वज्रलेपन करण्याची अनुमती आहे; पण धर्मशास्त्राचा अभ्यास नसलेल्या पुरातत्व खात्याच्या सूचनेनुसार प्रत्येक ६ मासांनी रासायनिक संवर्धन केले जात आहे. वज्रलेपन करणे, म्हणजे एखाद्या शरिरावर शल्यकर्म करण्यासारखे असते. प्रत्येक ६ मासांनी देवीच्या मूर्तीवर शल्यकर्मासम अत्याचार केले जात आहेत. मूर्तीचे पूजन, अभिषेक आदींद्वारे मूर्तीतील देवत्व जागृत होत असते; पण मूर्तीची वाढती झीज रोखण्यासाठी २६ वर्षांपासून मूळ मूर्तीवर स्नान, अभिषेक आणि नित्योपचार थांबवण्यात आले, ते आजतागायत बंदच आहेत. गेल्या अनेक वर्षांत देवीच्या मूर्तीची काही ठिकाणी झीज झाली असून काही ठिकाणी ती भंग झाली आहे. पुजार्‍यांच्या अयोग्य कृतींमुळे मूर्ती भंगली, असा आरोप होऊ नये; म्हणून हे श्रीपूजक मंडळ ‘मूर्ती भंगलेलीच नाही’, असे खोटेच सांगत आहेत. यावरून ‘सध्या कोल्हापूरच काय, सर्वत्रच्याच मंदिरांतील पुजार्‍यांना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे ?’, हे दिसून येते. विविध धर्माधिकारी, राजकारणी, पुजारी आणि मंदिर प्रशासन या सर्वांच्या भिन्न भिन्न भूमिकांमुळे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना प्रतिदिन चालू आहे. हा मंदिरांच्या सरकारी अधिग्रहणाचा दुष्परिणाम आहे, हे लक्षात घेऊन लवकरात लवकर ही मंदिरे सरकारमुक्त करणे, हाच यावरील एकमात्र उपाय आहे.


मंदिरांच्या संदर्भातील कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक ! – अनुप जयस्वाल, सचिव, देवस्थान सेवा समिती, विदर्भ, महाराष्ट्र

श्री. अनुप जयस्वाल

१२ वर्षांपूर्वी विदर्भ स्तरावर ‘देवस्थान समिती’ स्थापन केली. त्यामाध्यमातून आम्ही विदर्भातील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मंदिरांची व्यवस्था चालावी, यासाठी दानशूर लोकांनी मंदिरांना भूमी अर्पण केली होती. मंदिरांकडे अशी सहस्रो एकर भूमी आहे. काही इतरांच्या कह्यात आहे, तर काही भूमीवर अतिक्रमण झाले आहे. त्या भूमी अल्प व्ययामध्ये आणि अल्प काळात मंदिरांना परत मिळाव्या, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. काही ठिकाणी एकमेकांशी साटेलोटे असल्यामुळे ‘ही भूमी परत मिळावी’, यासाठी विश्‍वस्त खटले प्रविष्ट करत नाहीत. अशा विश्‍वस्तांना पदच्युत करून त्या ठिकाणी दुसरे विश्‍वस्त बसवून ती भूमी मंदिरांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. काही मंदिरे उपेक्षित आहेत. त्यांच्या भूमीवर अधर्मियांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मंदिरे त्यांच्या कह्यात जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. विदर्भ समितीच्या अंतर्गत अशा मंदिरांच्या संरक्षणासाठी पैसा उभा करून त्यांचा जिर्णोद्धार व्हावा किंवा त्यांना संरक्षक भिंत बांधून त्यांचेही अधर्मियांच्या अतिक्रमणापासून संरक्षण व्हावे, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सध्याच्या मंदिरांच्या संदर्भातील जे कायदे आहेत, त्यांच्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. हिंदूंची मंदिरे केवळ प्रार्थनास्थळे नाहीत, तर ते चैतन्याचे स्रोत आहेत. त्याचा लाभ सर्व हिंदु भाविकांना मिळणे आवश्यक आहे. तो अधिकाधिक मिळावा, यासाठी मंदिरांच्या प्रशासनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.


काशी विश्‍वेश्‍वराची मुक्ती होईल, तेव्हा देश अखंड हिंदु राष्ट्र होईल ! –  अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय आणि प्रवक्ते, हिंदू फ्रंट फॉर जस्टिस

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्‍वेश्‍वर हे एक स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. या खटल्यात आपला विजय निश्‍चित आहे. काशी विश्‍वेश्‍वर जेव्हा त्यांच्या मूळस्थानी विराजमान होतील, तेव्हा सर्व हिंदूंसाठी आध्यात्मिक उन्नतीचे एक मोठे स्थान निर्माण होईल. १२ मे २०२३ या दिवशी प्रयागराज (अलाहाबाद) उच्च न्यायालयाने मंदिराच्या परिसरात आढळलेल्या शिवलिंगाची शास्त्रीय चाचणी करण्याची अनुमती दिली आहे. याला अंजुमन इंतेजामियाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. ६ जुलै या दिवशी वाराणसी जिल्हा न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होईल तेव्हा ‘ही मशीद औरंगजेबाने कशी बांधली ?’, हे सत्य बाहेर येईल. ‘हे सत्य बाहेर येऊ नये’, यासाठीच अंजुमन इंतेजामिया याला विरोध करत आहे. आम्ही ‘कार्बन डेटिंग’ चाचणीची मागणी करत असल्याची अफवा पसरवण्यात आली. शिवलिंगाची कोणतीही रासायनिक चाचणी होणार नाही, तर शास्त्रीय पद्धतीने चाचणी होईल. यामध्ये शिवलिंगाला कोणतीही हानी होणार नाही. या चाचणीतून ‘हे शिवलिंग स्वयंभू आहे का ?’, तसेच ‘किती वर्षे पुरातन आहे’, हे कळू शकेल. काशी विश्‍वेश्‍वराची मुक्ती होईल, तेव्हा देश अखंड हिंदु राष्ट्र होईल. काशी विश्‍वेश्‍वराच्या मुक्तीचे मोठे लक्ष्य घेऊन आपण मार्गक्रमण करत आहोत. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी लावून धरायला हवी.

ते पुढे म्हणाले की,

१. मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीला मुक्त करण्यासाठी मागील १० वर्षे आम्ही जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांमध्ये प्रयत्नरत आहोत. प्रयागराज न्यायालयाने ही याचिका प्रविष्ट करून घेतली असून श्रीकृष्णजन्मभूमीविषयीच्या सर्व खटल्याची माहिती न्यायालयाने मागवली आहे. यामुळे विविध न्यायालयात खटले लढवण्यात वेळ जाण्याचे त्यांचे षड्यंत्र फसले आहे.

२. याप्रमाणे मारुतिरायांची जन्मभूमी असलेल्या कर्नाटक येथील किष्किंधा येथील मारुतिरायांची स्वयंभू मूर्ती असलेल्या मंदिराचे कर्नाटक सरकारने अधिग्रहण केले आहे. हे मंदिर सरकारीकरणपासून मुक्त करण्यासाठी मागील ५ वर्षे आमचा कायदेशीर लढा चालू आहे.

३. या सर्व मंदिरांच्या मुक्तीसाठी जोपर्यंत मी आणि माझे वडील पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन जीवंत आहोत, तोपर्यंत लढत राहू.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक बळामुळेच संपूर्ण देशात हिंदु राष्ट्राची मागणी ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

वर्ष २०१४ मध्ये मी प्रथम सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संपर्कात आलो. त्यानंतर मंदिरमुक्तीच्या या लढ्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामुळे आध्यात्मिक अधिष्ठान लाभले. त्यांचा आशीर्वादामुळे हा लढा आम्ही लढत आहोत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक बळामुळेच हिंदु राष्ट्राची मागणी संपूर्ण देशात होत आहे. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन अखंड हिंदु राष्ट्राची मागणी करणे आवश्यक आहे.

भारतीय जीवनपद्धत विदेशी शक्तींपुढे शरणागती पत्करणार नाही, हे विजयनगर साम्राज्याने जगाला दाखवून दिले  ! – श्री. कृष्ण देवराय,

श्री. कृष्ण देवराय

अराविडू राजवंश, आनेगुंडी नरपती संस्थानम्, कर्नाटक  विजयनगर साम्राज्याने आक्रमकांच्या विरोधात लढा दिला. या साम्राज्याने हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांचे रक्षण करण्यासह हिंदूंसाठी नवीन धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांची निर्मिती केली. हे साम्राज्य हिंदूंसाठी आशेचा किरण होता. भारतीय जीवनपद्धत विदेशी शक्तींपुढे शरणागती पत्करणार नाही, हे या साम्राज्याने जगाला दाखवून दिले. भारतीय परंपरेचे रक्षण करण्यासाठी विजयनगर राजघराण्याने हिंदूंची प्राचीन मंदिरे, मठ यांची पुनर्बांधणी केली. विजयनगर साम्राज्याने हिंदूंची मंदिरे पुनरुज्जीवित करण्याचे महान कार्य केले,  तसेच जनतेच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले. विजयनगर शहर हे उत्कृष्ट तंत्रज्ञान, नगरनियोजन, सिंचन, रस्ते, मंदिर आणि वास्तूशास्त्र यांचा एक नमुना होते. तत्कालीन जगासाठी ते एक आश्‍चर्य होते. या राजघराण्याने राज्य केलेल्या दक्षिण भारतात आजही हिंदूंची सहस्रावधी प्राचीन मंदिरे आणि मठ अस्तित्वात आहेत. तसेच या भागात हिंदूंच्या प्राचीन पूजाविधी पद्धतीचे जतन केले गेले आहे.


भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला आहे, धार्मिकदृष्ट्या नाही ! – डॉ. एन्. रमेश हासन, सहकार संजीवनी हॉस्पिटल, हासन, कर्नाटक

डॉ. एन्. रमेश हासन

भारताला स्वातंत्र्य केवळ राजकीयदृष्ट्या मिळाले आहे, धार्मिकदृष्ट्या आपण अजूनही स्वतंत्र झालेलो नाही. आजही देशात हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांची दिशाभूल केली जात आहे. इस्लामी नियमांचा गौरव केला जात आहे. कर्नाटक राज्यातील हासन जिल्ह्यातील बेळूर येथील श्री चन्नकेशव मंदिराच्या रथोत्सवाच्या पूर्वी कुराणाचे पठण केले जात होते. हिंदु मंदिरातील या ‘सॉफ्ट टेररिझम’च्या विरोधात आपण आंदोलन उभे केले आणि हिंदु मंदिरातील ही अनिष्ट पद्धत बंद केली. होशाळा साम्राज्याने दक्षिण भारतात ३ सहस्र मंदिरे बांधली. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदु संघटनांनी संघटित झाले पाहिजे . हिंदूंनी सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु धर्माचा प्रसार केला पाहिजे.