हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास सांगणार्‍या शाळेची मान्यता रहित !

  • मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा निर्णय

  • शाळेमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने केली कारवाई !

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दमोह येथील ‘गंगा जमना हायर सेकेंडरी स्कूल’ या शाळेची मान्यता रहित केली आहे. या शाळेतील हिंदु विद्यार्थिनींनी हिजाब घातल्याचे एक भित्तीपत्रक प्रसारित झाल्यानंतर त्याला विरोध होऊ लागला होता. यानंतर स्थानिक प्रशासनाने याची चौकशी चालू केल्यावर शाळेत व्यवस्थापकीय स्तरावर अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर सरकारकडून शाळेची मान्यता रहित करण्यात आली.

१. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करून सांगितले की, माझे भाचे आणि भाची (शिवराज सिंह चौहान यांना राज्यात ‘मामा’ म्हणून ओळखले जाते.)  यांच्याशी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. अशा कृत्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

२. या शाळेत ग्रंथालय नाही, तसेच रसायन, भौतिक शास्त्रासाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये जुने ‘फर्निचर’ आणि साहित्य आढळून आले. प्रयोगांसाठी आवश्यक साहित्य नव्हते. विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांच्यासाठी वेगवेगळे शौचालय नव्हते. शुद्ध पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचेही चौकशीत आढळून आले.