१९६५ च्या भारत-पाक युद्धापूर्वी पाकिस्तानच्या फौजा भारतीय प्रदेशावर आक्रमण करत आत घुसत होत्या. त्यामध्ये भारतीय नागरिक मारले जात होते. नंतर मात्र ‘आमच्या फौजा चुकून भारतीय प्रदेशात गेल्या’, असे समर्थन पाकिस्तानकडून केले जायचे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मेजर जनरल य.श्री. परांजपे यांच्या भेटीच्या वेळी सावरकर परांजपे यांना म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे सैनिक चुकून आपल्या इथे येतात, मग आपल्याही सैनिकांनी चुकून पाकिस्तानमध्ये जाऊन आक्रमण करायला काय हरकत आहे ?’ त्यावर जनरल परांजपे म्हणाले, ‘‘तात्या, हे कसे शक्य आहे ? दीड हजार मैलांच्या (२ सहस्र ४१४ कि.मी.) सरहद्दीवर कुठे कुठे गस्त घालायची ? कुठे त्यांना अडवायचे आणि कुठे आपण काही करायचे ?’’ सावरकर लगेच म्हणाले, ‘‘दीड हजार मैलांची सरहद्द आपल्याला आहे. त्यांना नाही का ? ते आत येऊ शकतात, आक्रमण करतात. तुम्हाला काय हरकत आहे ? असेच चुकून एक दिवस लाहोरपर्यंत जा आणि चुकून लाहोरही ताब्यात घ्या की !’’ मेजर जनरल परांजपे बघतच राहिले.