श्री गंगेचे अनुभवसिद्ध देवत्‍व !

आज ‘गंगोत्‍पत्ती म्‍हणजेच गंगापूजन’ आहे. त्‍या निमित्ताने…

गंगापूजन

१. गंगा नदी ‘लोकमाता’ 

भारतात नदीला ‘लोकमाता’ ही संज्ञा आहे. आरंभीच्‍या अवस्‍थेत नदीच्‍या आश्रयानेच गावे वसत; म्‍हणून तिला ‘लोकमाता’ हे सार्थ नाम ! गंगाजलाच्‍या अद़्‍भुत आणि विलक्षण वैशिष्‍ट्यांमुळेच गंगा विश्‍वमान्‍य लोकमाता झालेली आहे. गंगा वरपांगी इतर मोठ्या नद्यांसारखीच दिसत असली, तरी ‘तिचे अंतरंग वैज्ञानिकांनीही मानावे’, अशा दिव्‍य स्‍वरूपाचे आहे. एव्‍हरेस्‍ट विजेते एडमंड हिलेरी यांनी गंगेवरील अध्‍ययनाची मोहीम ॠषिकेशहून वर्ष १९७७ मध्‍ये चालवली होती. २८.९.१९७७ या दिवशी श्री ओंकारानंदजी महाराज ॠषिकेश येथे असतांना त्‍यांनी हिलेरी यांना विचारले होते, ‘‘गंगेविषयी आपणास काय अनुभव आहे ?’’ तेव्‍हा अत्‍यंत विनम्रभावे गंगेच्‍या दिशेने आपली हॅट (टोपी) उतरवत हिलेरी म्‍हणाले होते, ‘‘गंगा एक नदी नाही, ते एक दिव्‍य रसायन आहे !’’

२. गंगा म्‍हणजे साक्षात् वहाणारे ब्रह्म ! 

‘धर्मसम्राट’ स्‍वामी करपात्रीजी महाराज आपल्‍या प्रवचनातून श्री गंगेस ‘ब्रह्मद्रव’ विशेषणाने अलंकृत करत असत. ते म्‍हणायचे, ‘‘कलियुगात पामर जिवांच्‍या कल्‍याणार्थ परमात्‍माच जणू करुणाकर होऊन श्री गंगाजलाच्‍या रूपाने साक्षात् प्रवाहित आहे. गंगाजल म्‍हणजे साक्षात् वहाणारे ब्रह्म आहे.’’

३. गंगेची वाळू म्‍हणजे भक्‍तांना सर्व सुखे प्रदान करणारी कामधेनू !

श्रीरामाचे बंधू भरत यांनी तर गंगेच्‍या वाळूचीही मुक्‍तकंठाने प्रशंसा करत म्‍हटलेले आहे, ‘‘श्री गंगेची वाळू सेवकांना (भक्‍तांना) सर्व सुखे प्रदान करणारी कामधेनू आहे.’’

–  दादा पांडे, कपिलकृष्‍ण

(साभार : मासिक ‘गणानाम् त्‍वां’,  जुलै २०१४)