छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथील महंत कनक बिहारीदास महाराज यांचे अपघातात निधन

महंत कनक बिहारीदास महाराज

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील छिंदवाडास्थित आश्रमाचे महंत कनक बिहारीदास महाराज यांचा १७ एप्रिल या दिवशी नरसिंहपूर जिल्ह्यातील बर्मन-सागरी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार महंत कनक बिहारीदास महाराज अशोकनगरहून चारचाकी गाडीने छिंदवाडा येथील त्यांच्या आश्रमाकडे जात होते. नरसिंहपूर जिल्ह्यातील बर्मनजवळ एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची चारचाकी दुभाजकाला धडकून उलटली. या भीषण अपघातात महंत आणि त्यांचा सुरक्षारक्षक यांचा जागीच मृत्यू झाला.

अयोध्येत श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांची देणगी दिल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. ते यज्ञसम्राट म्हणूनही प्रसिद्ध होते. ते श्रीरामाचे निस्सीम भक्त होते आणि पुढील वर्षी फेब्रुवारी मासामध्ये अयोध्येत महायज्ञ करणार होते. महंत कनक बिहारीदास महाराज यांचे लाखो भक्त आहेत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून शोक व्यक्त

महंत कनक बिहारीदास महाराज यांच्या अपघाती मृत्यूविषयी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटले आहे की, रघुवंश शिरोमणी श्री श्री १००८ संत श्री कनक बिहारीदास महाराज यांच्या निधनाने धर्म आणि अध्यात्म जगताची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.