बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार ! – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यातील समस्यांविषयी मुंबईत वर्षा निवासस्थानी बैठकीतील निर्णय !

पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी  – आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. या बोर्डाच्या माध्यमातून समस्या सोडवण्यासाठी समिती नेमून या समितीवर २ बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.

या बैठकीला बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार योगेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, आंबा बागायतदार संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, अन्य पदाधिकारी, नाम फाऊंडेशनचे मंदार पाटेकर, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले,

१. अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या आंबा आणि काजू बागायतदार हानीग्रस्तांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यासंबंधी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित अधिकारी यांची ९ फेब्रुवारी या दिवशी तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
२. रत्नागिरी जिल्ह्यातील २२ सहस्र शेतकर्‍यांना ८४ कोटी रुपयांचा पीक विम्याचा मोबदला देण्यात आला आहे. याविषयी खातरजमा करून उर्वरित वंचित शेतकर्‍यांना पीक विमा मोबदला देण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेवून प्रश्‍न सोडवावा.
३. आंबा बागायतदारांना पेट्रोल, रॉकेल, खते, कीटकनाशके आणि औषधांच्या निर्धारित किमतीसंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.
४. रत्नागिरीत सुसज्ज प्रयोगशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीतून प्रावधान करून प्रयोगशाळा चालू करण्यात येईल.
५. फळमाशी आणि माकड अशा वन्यप्राण्यांमुळे होणार्‍या शेतीहानीविषयी राज्यशासनाने समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचा जिल्हा दौरा होणार असून या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात येईल.

६. शेतीसाठी वापरात असलेल्या कृषीपंपांना चुकीची वीजदेयके आकारली जात असल्याविषयीच्या समस्येची माहिती घेवून जिल्हाधिकारी यांनी हा प्रश्‍न सोडवावा.
७. कोकणातील कुळवहिवाटदारांची प्रकरणे आणि दावे, तसेच पिढ्यान्पिढ्या रहात असलेल्या घरांच्या भूमी मालकी हक्कासंबंधी गावनिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण करून मोहीम राबवावी.
८. रत्नागिरीमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘लोकनेते शामरावजी पेजे अभियांत्रिकी विद्यालय’ असे नाव देण्याविषयी लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
९. पहिल्या टप्प्यातील शिल्लक रकमेतून सध्या वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम करावे, तसेच दुसर्‍या टप्प्यासाठी ५ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात येईल. जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना निधीतून ५० लाख रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.