अनेक समस्‍यांवर औषध असलेल्‍या नागवेलीची (विड्याच्‍या पानांच्‍या वेलीची) लागवड कशी करावी ?

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ७५

नागवेल (विड्याची पान)

‘केवळ खाण्‍यासाठीच नव्‍हे, तर आपल्‍या प्रत्‍येक धार्मिक सण-समारंभामध्‍ये विड्याच्‍या पानांची आवश्‍यकता असते. विड्याचे पान पोटाचे विकार, मुखदुर्गंधी, तोंडातील व्रण, मळमळणे आदी अनेक समस्‍यांवरील औषध आहे. प्रत्‍येक घरात जसे तुळशीचे रोप असते, तशीच नागवेलही असायला हवी. पावसाळा, तसेच फेब्रुवारी आणि मार्च हे मास हा नागवेलीच्‍या लागवडीसाठी योग्‍य काळ आहे. रोपवाटिकेतून नागवेलीचे रोप आणून लावता येते, तसेच एका वेलीची फांदी कापून तिच्‍यापासून दुसरे रोप सिद्ध करता येते.

सौ. राघवी कोनेकर

फांदीने लागवड करतांना मुख्‍य वेलीची सुमारे अर्धा फूट लांबीची सशक्‍त फांदी कापून घ्‍यावी. त्‍या फांदीची वरील २ – ३ पाने ठेवून अन्‍य सर्व पाने काढून टाकावी. फांदी मातीत खोचतांना लहान लहान मुळे असलेला तिचा भाग मातीखाली जाईल, याची दक्षता घ्‍यावी. फांदी लावल्‍यावर भरपूर पाणी घालावे. वेलीला आधार देण्‍यासाठी कुंडीत एखादी काठी खोचावी. नागवेल भिंतीला धरूनही उत्तम वाढते.

नागवेलीची कुंडी ठेवतांना वेलीला सूर्यप्रकाश मिळेल; पण कडक ऊन लागणार नाही, अशा ठिकाणी ठेवावी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.१.२०२३)