चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सरकारने कोरोना नियंत्रणासाठी राबवलेल्या ‘झिरो कोविड पॉलिसी (कोरोनामुक्त धोरण)’च्या विरोधात शांघाय, बीजिंग, वुहानसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन चालू आहे. या आंदोलनामुळे ‘चीनने जगासमोर मांडलेले सारे काही आलबेल असल्याचे चित्र पूर्णतः फसवे होते’, हे स्पष्ट केले आहे. वरकरणी हे आंदोलन ‘कोविड पॉलिसी’विरोधातील असल्याचे दिसत असले, तरी त्यामध्ये चीनमधील साम्यवादी पक्षाच्या अनियंत्रित एकाधिकारशाहीच्या विरोधातील असंतोष स्पष्टपणाने दिसत आहे. हा अंतर्गत संघर्ष जिनपिंग यांच्यासाठी पुष्कळ मोठे आव्हान ठरणार आहे.
१. चीनमध्ये निर्माण करण्यात आलेले आभासी चित्र
चीनमध्ये सर्व काही आलबेल नाही. जगाला जे जे शी जिनपिंग दाखवण्याचा प्रयत्न करत होते, त्याहून वास्तव हे विपरित आहे. ‘२१ वे शतक हे आशिया खंडाचे असून या शतकात संपूर्ण वैश्विक राजकारण चीनभोवती केंद्रित असणार आहे. अमेरिका आणि पश्चिम युरोपियन राष्ट्रे आंतरराष्ट्रीय राजकारणात लयाला जात आहेत. त्यामुळे येणारा काळ हा आमच्या प्रभुत्वाचा आहे’, असे म्हणणार्या जिनपिंग यांना अलीकडेच तिसर्या मुदतीसाठी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडण्यात आले. या निवड समारंभाच्या वेळी जिनपिंग यांनी वर्ष २०५० पर्यंत अमेरिकेला मागे टाकून चीनला पहिल्या क्रमांकाची ‘जागतिक आर्थिक महासत्ता’ बनवण्याचे उद्दिष्ट मांडले होते. ते मांडतांना ‘जिनपिंग यांना या वाटेवर कोणतेही अडथळे नसतील आणि चीनलाही महासत्ता बनण्यापासून आता कुणीही रोखू शकत नाही’, असे एक आभासी चित्र निर्माण करण्यात आले होते; परंतु या स्वप्नांना गालबोट लागणारी परिस्थिती चीनमध्ये निर्माण झाली असून ती ऐतिहासिक स्वरूपाची आहे; कारण गेल्या काही दशकांमध्ये अशी परिस्थिती कधी अनुभवायला मिळाली नाही.
२. काय घडत आहे नेमके चीनमध्ये ?
चीनमधील शहरी भागांमधून सरकारविरोधी निदर्शने करणारे सहस्रो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन चिनी सरकारने ‘झिरो कोविड पॉलिसी’च्या अंतर्गत जनतेवर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधासाठी आहे. या निर्बंधांना त्रासून चिनी जनता उद्विग्न होऊन रस्त्यावर उतरली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून प्रतिदिन ४० सहस्र कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळून येत आहेत. ही परिस्थिती चीनसाठी अत्यंत धोकादायक आहे. वास्तविक संपूर्ण जगाने कोरोना महामारीवर मात केल्यासारखी स्थिती असतांना या विषाणूचा उगम ज्या देशातून झाला, तो चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या मगरमिठीत अडकतांना दिसत आहे. यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत.
‘आम्ही कोरोनावर मात केलेली आहे, कोरोनाचा आमचा औद्योगिक विकास आणि उत्पादन यांवर कोणताही परिणाम झालेला नाही, कोरोनावर मात करून आम्ही पुन्हा एकदा ‘प्रबळ देश’ म्हणून पुढे आलेलो आहोत’, असे गुलाबी (चांगले) चित्र जगासमोर मांडण्याचा जो चीनचा प्रयत्न चालू होता, त्याला किंवा दाव्याला या आंदोलनाने छेद दिला आहे; कारण चीनमध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. महत्त्वाचे म्हणजे यामुळे चीनमधील अंतर्गत परिस्थिती बिघडत चालली आहे. चीनने या आंदोलनकर्त्यांविरुद्ध दडपशाही चालू केली असून त्यामध्ये काही आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. शांघायमधून चालू झालेल्या या आंदोलनाचे लोण आता बीजिंगपर्यंत जाऊन पोचले आहे. कोरोना विषाणूचा उगम ज्या वुहान शहरामध्ये झाला, तेथेही आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
३. शी जिनपिंग यांच्या हुकूमशाहीला विरोध
या आंदोलनातील ठळक गोष्ट म्हणजे त्यामध्ये झळकणारे बॅनर्स (फलक). ‘आम्हाला स्वातंत्र्य द्या’, ‘सरकारी दडपशाही थांबवा’, ‘कोरोनाचे निर्बंध हटवा’, असे फलक झळकावत सहस्रो चिनी नागरिक स्वातंत्र्याचा नारा देत आक्रोश करत आहेत. वरवर हे आंदोलन कोरोनाच्या निर्बंधांविरुद्धचे वाटत असले, तरी त्यामागचा मुख्य रोख चीनमधील कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाच्या एकाधिकारशाही राजवट आणि शी जिनपिंग यांची हुकूमशाही यांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे जिनपिंग यांच्या साम्राज्याला तडे जाण्याच्या शक्यता त्यातून स्पष्टपणाने प्रतिबिंबित होत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
वास्तविक पहाता चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसर्यांदा शी जिनपिंग यांची निवड केली जाणार होती, तेव्हाही काही फलक झळकले होते, ज्यामध्ये जिनपिंग यांच्या हुकूमशाहीचा विरोध करण्यात आला होता. त्या वेळी स्वातंत्र्य आणि अधिकार यांची मागणी करण्यात आली होती; परंतु नेहमीप्रमाणे चीनने दंडुकेशाहीच्या बळावर हे आंदोलन दडपून टाकले होते.
४. चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या अनियंत्रित हुकूमशाहीच्या विरोधात होत असलेले जनआंदोलन
चीनमध्ये वर्ष १९८९ नंतर अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदाच पहावयास मिळत आहे. वर्ष १९८९ मध्ये चीनमध्ये ऐतिहासिक आंदोलन झाले होते. हे आंदोलन प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे होते; पण चिनी सैन्याने बीजिंगमधील तियानानमेन स्क्वेअरच्या चौकात गोळीबार करत आंदोलकांना चिरडून टाकून अटक करत ते पूर्णतः लष्करी बळावर दडपले होते. या दडपशाहीमध्ये ३ सहस्रांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अनेक अभ्यासकांच्या मते सध्या चालू असलेले आंदोलनाच्या मुळाशी शी जिनपिंग यांच्या अनियंत्रित हुकूमशाहीच्या विरोधातील राग आहे. या आंदोलनामध्ये आणि वर्ष १९८९ च्या आंदोलनामध्ये गुणात्मक भेद आहे. ते आंदोलन हे बीजिंग शहरापुरते मर्यादित होते आणि मुख्य म्हणजे त्याला कुणाचेही नेतृत्व नव्हते. ते उत्स्फूर्तपणाने झालेले आंदोलन होते; पण त्याचा प्रसारही फारसा झालेला नव्हता. आताचे आंदोलन हे चीनमधील प्रमुख शहरांमध्ये पसरलेले असून त्याची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. दुसरे म्हणजे वर्ष १९८९ मध्ये सोशल मिडिया प्रचलित झालेला नव्हता; पण आता त्याच्या माध्यमातून संबंध चीनमध्ये या आंदोलनाचा प्रसार होत आहे. ताज्या आंदोलनाचे लोण हे केवळ चीनपुरते मर्यादित रहाणार नसून ते तैवान आणि तिबेटमध्ये, हाँगकाँगमध्ये पसरण्याची शक्यता आहे; कारण गेल्या ३ मासांपासून तिबेटची राजधानी ल्हासा येथे चीनने पूर्णपणे दळणवळण बंदी (लॉकडाऊन) घोषित केली आहे. तेथील जनतेत याविषयी प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे येत्या काळात जिनपिंग यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहेत.
५. जनआंदोलनामुळे चीनच्या अखंडत्वास धोका
सध्याच्या निदर्शनांमधील आणखी एक पैलू महत्त्वाचा आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांवर गेल्या काही वर्षांपासून चिनी सरकारकडून कमालीची अमानवी दडपशाही चालू आहे. त्यांचे अत्यंत अमानुषपणाने हाल केले जात आहेत. याविरोधात उठणारे त्याचे सूर दडपले जात आहेत. सध्याच्या आंदोलनाच्या कालावधीत अशाही घोषणा दिल्या जात आहेत की, चिनी जनता उघूर प्रांतातील मुसलमानांच्या पाठिशी आहे. या अल्पसंख्यांकांविषयी सद़्भावना आणि सहानुभूती व्यक्त केली जात आहे. ही गोष्ट चीनसाठी अत्यंत धोक्याची असून यामुळे चीनच्या अखंडत्वालाही धोका निर्माण होऊ शकतो. ही सर्व परिस्थिती लक्षात आल्यामुळेच शी जिनपिंग हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकंदरीतच शी जिनपिंग यांचा पुढील प्रवास हा सुखनैव, अडथळेविरहित असणार नाही, हे या आंदोलनांमुळे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात त्यांना अंतर्गत विरोधाच्या मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. चीनमधील साम्यवादी पक्षाच्या अनियंत्रित एकाधिकारशाही राजवटीच्या विरोधात चिनी जनतेत कमालीचा असंतोष आहे.
६. चीनमध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक त्यांच्या लसी कुचकामी ठरत असल्याचे द्योतक
या आंदोलनातून आणखीही काही संकेत मिळत आहेत. कोरोनावर आम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचा चीनचा दावा हा पूर्णपणे फसवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला कोरोना महामारीमुळे पुष्कळ मोठी हानी सहन करावी लागली आहे. कोरोनाविरुद्ध चीनने ३ लसी विकसित केल्या होत्या. यांपैकी ‘सायनोव्हॅक्स’ ही लस सर्वांत महत्त्वाची होती आणि चीनकडून तिची मोठ्या प्रमाणावर निर्यातही करण्यात आली होती; पण या लसीच्या परिणामकारतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत; कारण चीनने जवळपास ८० ते ९० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण केले आहे. असे असूनही तेथे कोरोनाचा प्रसार होत आहे. याचा अर्थ चीनने विकसित केलेल्या लसी बोगस (कुचकामी) आहेत. या लसींची परिणामकारकता ६० ते ७० टक्के असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता; परंतु ती ३० टक्केही नाही, हे आता दिसून आले आहे. प्रगत राष्ट्रातील ‘फायझर’सारख्या कंपन्यांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींची परिणामकारकता ८० टक्क्यांपर्यंत होती, तर भारताने विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ यांसारख्या लसींची परिणामकारकता ८० ते ८५ टक्के होती. या लसींच्या साहाय्यानेच भारताने १०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आणि आज आपण कोरोनावर पूर्णतः मात केली आहे. असे असतांना चीनमध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक हा त्यांच्या लसी या कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होते. या लसी निर्यात केलेल्या देशांमध्येही परिस्थिती समाधानकारक नाही.
७. चीनमधील परिस्थितीचा अमेरिका लाभ घेण्याची शक्यता
चीनमधील या परिस्थितीचा लाभ अमेरिकेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे; कारण तैवानच्या मुद्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम आहे. अमेरिकेने तैवान आणि हाँगकाँग यांना उघड समर्थन दिलेले आहे. चीनमध्ये लोकशाही अधिकार रुजवले जावेत, या दृष्टीकोनातून अमेरिकेची प्रसारमाध्यमे प्रयत्नशील असतात. त्यामुळे आताच्या आंदोलनाची संधी अमेरिका दवडणार नाही.
८. भारताच्या विरोधात केलेल्या अपप्रचाराला चीनला मिळालेली चपराक !
भारतात जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती, तेव्हा ‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या सरकारी अधिकृत माध्यमाने भारताची अनेकदा खिल्ली उडवली होती. भारताच्या लसींची परिणामकारकता नसल्याची टीका केली होती. भारतात शेकडो लोकांचा कोरोना महामारीवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होत असल्याचा अपप्रचार केला होता; पण कोरोनावर मात करून भारताने संपूर्ण जगापुढेच एक आदर्श घालून दिला. दुसरीकडे चीनमध्ये मात्र प्रतिदिन ४० सहस्र कोरोनाबाधित आढळत आहेत. यातून ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसींची परिणामकारकताही स्पष्ट झाली आहे. भारताने ज्या ज्या देशांना या लसींची निर्यात केली, तेथेही त्यांची परिणामकारकता दिसून आली आहे. भूतान हे याचे आदर्श आणि उत्तम उदाहरण आहे. ही गोष्ट चीनला चपराक देणारी आहे.
९. भारताची भरारी चीनला आत्मपरीक्षण करायला लावणारी !
सारांश कोरोना विषाणूचे बूमरँग चीनवर उलटले आहे. वर्ष २०२० हे दशक आंतरराष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे ठरले आहे. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर आता चीनमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. भारत या संपूर्ण काळामध्ये अत्यंत संयमाने वागला आहे. कोरोनावर मात करून भारताचा आर्थिक विकासदर आज ६ ते ७ टक्क्यांवर पोचला आहे. भारताची अर्थव्यवस्था इतर देशांपेक्षा निश्चितच सक्षम बनली आहे. इंग्लंडला मागे टाकून ५ व्या स्थानावर भरारी घेणारा भारत येत्या काळात जपान आणि जर्मनीला मागे टाकत नवी भरारी घेऊ शकतो. ही परिस्थिती भारताला सातत्याने न्यून लेखणार्या चीनला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
(साभार : फेसबुक खाते, डिसेंबर २०२२)
संपादकीय भूमिकाचीन सरकारकडून तेथील जनतेवर करण्यात येत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात भारतातील साम्यवादी काही बोलतील का ? |