हडपसर (जिल्हा पुणे), २० डिसेंबर (वार्ता.) – येथे १ जानेवारी २०२३ या दिवशी होणार्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चा प्रचार आता शिगेला पोचला आहे. हडपसर गाव येथील श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरून आणि श्री भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून, तसेच थेऊरच्या चिंतामणीच्या चरणी सभेची निमंत्रण पत्रिका अर्पण करून सभेच्या प्रसाराला आरंभ करण्यात आला. सभेतील विघ्ने दूर होऊन सभा यशस्वी होण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी श्री गणेशाच्या चरणी सर्वांनी प्रार्थना केली. वैयक्तिक संपर्क, बैठका, सामाजिक प्रसारमाध्यमे, फलकप्रसिद्धी, तसेच वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांद्वारे सहस्रो जिज्ञासू अन् हिंदु धर्मप्रेमींपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात येत आहे.
असा चालू आहे प्रसार…
१. सभेच्या निमित्ताने उद्योजक, आधुनिक वैद्य, धर्मप्रेमी, भजनी मंडळे, तसेच समाजातील विविध घटकांच्या मोठ्या संख्येने बैठका घेण्यात येत आहेत.
२. गोरक्षक, अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, मंदिरांचे पुजारी यांच्यासह सहस्रो लोकांना सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
प्रतिष्ठितांकडूनही मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद
१. ‘भाजप युवा मोर्चा’चे अध्यक्ष श्री. सुदर्शन चौधरी यांनी विषय मनापासून ऐकून घेतला आणि ‘सभेच्या दृष्टीने बैठका ठरवण्यासाठी साहाय्य करणार’, असे सांगितले. त्यांनी त्यांच्या संपर्कातील काही प्रतिष्ठितांचे संपर्क स्वतःहून दिले. ‘हलाल जिहाद’ हा विषय ऐकल्यावर त्यांनी उरुळी कांचन येथील व्यापार आघाडीचे अध्यक्ष यांना भेटण्यासंदर्भात सुचवले.
२. चिंतामणी प्रासादिक दिंडीचे श्री. दत्तात्रय चोरघे यांनी ‘सोरतापवाडी गावात युवती आणि महिला यांसाठी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो’, असे सांगितले. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. सुदर्शन चौधरी यांच्या साहाय्याने आणि वैयक्तिक स्तरावर ते या विषयावर जागृती करण्यासाठी बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
३. भाजपचे हडपसर विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. युवराज मोहरे तीन ‘होर्डिंग्ज’ लावणार आहेत, तसेच ‘समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला स्वतः येणार’, असे त्यांनी सांगितले.
४. हडपसर येथील हिंदू महासभेचे विशेष जनसंपर्क अधिकारी श्री. मित्र वरुण झांबरे यांनी सर्व हिंदू बांधवांना सभेला येण्याचे आवाहन केले.
५. पश्चिम महाराष्ट्राचे व्यापार आघाडी अध्यक्ष श्री. विकास जगताप यांना हलाल, लव्ह जिहाद, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयासंदर्भात माहिती दिल्यावर त्यांनी युवतींची बैठक ठरवून त्यांना विषय सांगण्यासाठी आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. गावातील युवकांना एकत्रित करून त्यांची बैठक घेण्याच्या दृष्टीने त्यांनी काही क्रियाशील युवकांचे संपर्क दिले. तसेच सभेला जास्तीत जास्त उपस्थिती आणण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
अन्य विशेष
१. गोरक्षक अक्षय कांचन यांनी ‘ज्या ज्या ठिकाणी शिववंदना होतात, तेथे आपण विषय घेऊया आणि बैठकांचे नियोजन करूया’, असे सांगितले.
२. येवलेवाडी येथील कट्टर हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षक श्री. स्वप्नील धांडेकर दादा यांच्या माध्यमातून गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ होणार्या शिववंदनेमध्ये उपस्थित युवकांना सभेचा विषय सांगून निमंत्रण दिले. तेव्हा सर्वांनी ‘गाड्यांची ‘रॅली’ काढून एकत्र सभेला येतो’, असे सांगितले.
३. शिवरी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठातील गुरुकुल वेदभवन येथील मठाधिपती- स्वामीदास गणेशानंद महाराज यांची भेट घेऊन त्यांना सभेचे निमंत्रण दिले. त्यांनी त्यांच्या गुरुकुलात आपला विषय मांडायची संधी दिली आहे.
४. राधाकृष्ण मंदिरात पूज्य आसाराम बापूजी यांचे भजन चालू होते. त्या वेळी त्यांच्या एका भक्तांनी उपस्थितांना सभेची माहिती सांगितली, तसेच सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आणि समितीच्या कार्याचे कौतूक केले.