दुहेरी लाभ देणारी लसूण लागवड

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

नोव्हेंबर मास हा लसूण लागवड करण्याचा योग्य कालावधी आहे. लसूण लावणे पुष्कळ सोपे आहे. लसणीच्या कांद्यातील पाकळ्या सुट्या कराव्यात. त्यांचे साल काढू नये. मातीमध्ये ३ – ३ इंच अंतरावर बोटाने छिद्र करून एकेक पाकळी खोचावी. खोचतांना पाकळीचे शेंड्याकडील टोक वरच्या दिशेने असावे. वाफ्याच्या कडेने किंवा कुंडीत अगोदर लावलेल्या झाडाच्या बाजूने लसूण लावता येते. असे केल्याने लसणीच्या उग्र वासाने कीटक मुख्य पिकाजवळ येत नाहीत आणि नैसर्गिक कीटकनियंत्रणाचे कार्य होते.

सौ. राघवी कोनेकर

कांद्याच्या पातीप्रमाणे लसणीचीही पात मातीच्या वर वाढते आणि लसणीचा कांदा मातीच्या आतमध्ये बनतो. संपूर्ण हिवाळ्याच्या कालावधीत ही ताजी लसूणपात भाजी, चटणी इत्यादींमध्ये घालण्यासाठी खुडून वापरावी. उन्हाळा चालू झाल्यावर, म्हणजे लागवड केल्यापासून साधारण ४ मासांनंतर वरील पात पिवळी होऊ लागल्यावर मातीत लसणीचा गड्डा सिद्ध झाला, असे समजावे. लागवडीसाठी गावरान लसूण मिळाल्यास त्याचा स्वाद निराळाच असतो. या हिवाळ्यात सर्वांनी ही सोपी लसूण लागवड अवश्य करून पहावी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा,
गोवा.       (५.११.२०२२)