कोणत्या झाडाला किती आणि कधी पाणी द्यावे ?

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘झाडांच्या चांगल्या वाढीसाठी मातीमध्ये ओलावा आणि वायू (हवा) यांचे मिश्रण असावे लागते. यालाच ‘वाफसा’ म्हणतात. माती सातत्याने पुष्कळ ओली राहिली, तर झाडांच्या मुळांना प्राणवायू मिळत नाही. पावसाळ्यामध्ये पाणी देण्यावर आपले नियंत्रण नसते; परंतु अन्य ऋतूंमध्ये पुष्कळ वेळा झाडांच्या मुळांना आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात दिलेले पाणी, हे रोपे मरून जाण्याचे कारण असते. लागवडीमध्ये लहान-मोठी दोन्ही प्रकारची झाडे असतात. त्यांना पाणी देण्यापूर्वी झाडाची पाने आणि मातीतील ओलावा यांचे निरीक्षण करावे. पालेभाज्या आणि फळभाज्या यांची रोपे लहान असल्याने त्यांची मुळे जमिनीत वरच्या थरातच असतात. हा थर सुकला असेल, तर लहान रोपांची पाने टवटवीत दिसत नाहीत. अशा वेळी त्यांना पाणी द्यायला हवे; परंतु त्याच ठिकाणी लिंबू आणि कढीपत्ता यांसारखे एखादे मोठे झाड असेल, तर त्याची मुळे खोल पसरलेली असल्याने मातीच्या खालच्या थरांतील ओलावा मिळून त्याची पाने टवटवीत दिसतात. त्यामुळे त्याला पाणी देण्याची आवश्यकता नसते. नियमित निरीक्षण करून तारतम्याने पाणी दिल्यास हळूहळू ‘कोणत्या झाडाला किती आणि कधी पाणी द्यावे ?’, हे समजू लागते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१५.१०.२०२२)