वांगी, मिरची आणि टोमॅटो यांसारखे लहान बी लावतांना कोणती काळजी घ्यावी ?

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

१. ‘वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवर यांचे बी पुष्कळ लहान असते. त्यामुळे ते थेट कुंडी किंवा वाफा यांमध्ये लावू नये. त्या आधी त्यांची रोपे सिद्ध करून घ्यावीत.
२. रोपे करण्यासाठी तळाला एखादे मुगाएवढे छिद्र केलेले लहान कागदी कप किंवा पसरट ट्रे यांची निवड करावी. या कपांवर लागवड केलेल्या दिनांकाची नोंद करावी.
३. बी पेरतांना अगदी खोल किंवा अगदी उथळही पेरू नये. बीची जेवढी जाडी असेल, तिच्या दुप्पट खोल पुरावे. पेरलेल्या बियांवर मातीचा हलका थर द्यावा.
४. बी पेरलेले लहान कागदी कप किंवा पसरट ट्रे कडक उन्हात न ठेवता थोडी सावली असलेल्या; परंतु सूर्यप्रकाश असेल, अशा जागी ठेवावेत.
५. लहान रोपे उगवून आल्यानंतर पाणी देतांना विशेष काळजी घ्यावी. पाणी मर्यादित प्रमाणात आणि हळूवार घालता यावे यासाठी तुषारांच्या बाटलीचा (स्प्रेचा) वापर करावा.
६. लहान रोपाला ४ ते ६ पाने आली की, त्याची मुख्य कुंडी किंवा वाफा यामध्ये लागवड करावी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१४.१०.२०२२)