नेताजींना योग्य सन्मान हवाच !

भारतीय चलनावर थोर क्रांतीकारक आणि देशाच्या स्वातंत्र्याचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेने बंगालमध्ये केली आहे. महासभेचे तेथील कार्याध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले, ‘‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान करण्याचा हा सर्वाेत्तम मार्ग आहे.’’ वर्ष २०२२ हे नेताजींचे १२५ वे जयंती वर्ष आहे. हे निमित्त पहाता ‘गोस्वामी यांनी केलेली सूचना शासनाने तात्काळ कार्यवाहीत आणून या महान क्रांतीकारकाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी’, असे राष्ट्रप्रेमींना वाटले, तर ते खचितच योग्य आहे. वरील सूत्र सांगतांना गोस्वामी यांनी साहजिकच गेली ७५ वर्षे काँग्रेसने उदो उदो केलेल्या गांधीजींशी त्यांची तुलना केली आहे. ‘नेताजींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान गांधींपेक्षा अल्प नव्हते’, असे त्यांनी म्हटले आहे; परंतु ‘नेताजींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान गांधींपेक्षा किती दूरदृष्टी असणारे आणि सर्वार्थाने यथार्थ होते, याला सीमाच नाही’, असे म्हणावे लागेल.

धाडसाचे दुसरे नाव नेताजी !

श्रीमंत आणि उच्चविद्याविभूषित पार्श्वभूमी असलेल्या घरातून करून आलेल्या अन् ब्रिटनहून सनदी अधिकार्‍याची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या सुभाषबाबूंनी तत्कालीन सर्वच राष्ट्रप्रेमींप्रमाणे त्यांचे राष्ट्रकार्य त्या वेळच्या काँग्रेसच्या माध्यमातून चालू केले होते. त्यांनी काँग्रेसअंतर्गत ‘स्वराज्य पक्ष’ स्थापला आणि कोलकात्याच्या तत्कालीन महापालिकेत ते निवडून आल्यावर तिथे प्रशासकीय स्तरावर त्यांनी आमूलाग्र पालट केले. वर्ष १९२८ च्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात नेताजींनी इंग्रजांकडे ‘पूर्ण स्वराज्या’ची, तर गांधींजींनी ‘वसाहतीचे स्वातंत्र्या’ची मागणी केली. येथूनच दोन्ही नेत्यांच्या विचारदृष्टीतील मूलभूत भेद लक्षात येतो. पुढे भगतसिंह यांच्या सुटकेच्या मागणीला इंग्रज सरकार दाद देत नसल्याने ‘गांधींनी त्यांच्यासमवेत केलेला करार मोडावा’, अशी सुभाषबाबूंची इच्छा होती; पण तथाकथित नैतिकतेचा अतिरेक करणार्‍या गांधींनी ते न केल्यामुळे अंतिमत: भगतसिंह यांना फाशी झाली. तेव्हापासून काँग्रेसच्या कारभारावर सुभाषबाबू अधिकच अप्रसन्न झाले. नेताजींच्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्या अत्यंत धाडसी आणि पराक्रमी स्वभावाच्या, त्यांच्यातील क्षात्रतेज दर्शवणार्‍या अनेक घटना आहेत. केवळ १५ व्या वर्षी गुरूंचा शोध घेण्यासाठी हिमालयात जाणे, महाविद्यालयात इंग्रज शिक्षकाच्या अन्यायाच्या विरोधात संप पुकारणे, राष्ट्रकार्यासाठी इंग्रजांच्या चाकरीचे त्यागपत्र देऊन मायदेशी येणे, कोलकात्याच्या रस्त्यांची इंग्रजी नावे पालटणे, फाशी झालेल्या क्रांतीकारकाचा मृतदेह मागवून त्याच्यावर उघडपणे अंत्यसंस्कार करणे यांसारख्या इंग्रजांचा भयंकर रोष ओढवून घेणार्‍या त्यांच्या क्रांतीकार्यातील असंख्य घटना या त्यांच्यातील धाडस आणि वीरता यांचे द्योतक आहेत.

त्यातूनच पुढे इंग्रजांच्या नजरकैदेतून केलेले पलायन आणि इंग्रजी राजवटीला शह देण्यासाठी अतिशय गुप्तपणे विदेशात राहून उभारलेले सैन्यदल या सार्‍यांमध्ये त्यांच्या क्षात्रवृत्तीची आणि नितांत राष्ट्रप्रेमाची प्रचीती येते. वर्ष १९३८ मध्ये त्यांची लोकप्रियता पाहून गांधीनी काँग्रेसच्या ५१ व्या अधिवेशनाचे त्यांना अध्यक्ष केले, तेव्हा जनतेने ५१ बैलांच्या गाडीतून त्यांची मिरवणूक काढून जणू त्यांना मनोमन नेतेपद बहाल केले होते. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी इंग्रजांचा कठीण काळ ओळखून त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा तीव्र केला आणि इंग्रजांना कोंडीत पकडण्याचे त्यांनी नियोजन केले; परंतु गांधींना ते मान्य नव्हते. गांधींच्या प्रखर विरोधानंतरही नेताजी पुढील वर्षीचीही काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले; परंतु नंतर गांधींचा अंतर्गत विरोध एवढा वाढला की, शेवटी नेताजींनीच काँग्रेसचे त्यागपत्र दिले. पुढे इंग्रजांच्या अटकेतून पलायन करून त्यांनी विदेशात राष्ट्रकार्य चालू केले. हिटलरची भेट घेतल्यावर त्याच्या आत्मचरित्रात भारतियांविषयी केलेल्या अवमानकारक उद्गाराविषयी त्याला क्षमा मागण्यास आणि ते उल्लेख त्यातून काढण्यास त्यांनी भाग पाडले. नेताजींचे व्यापक विचार आणि हृदयाची उदारता अनाकलनीय होती. आझाद हिंद सेनेने अंदमान-निकोबार बेटे जिंकून ‘चलो देहली’ची हाक देण्यापर्यंत प्रगती केली होती. त्यामुळे ‘इंग्रज भारत सोडून जाण्यास केवळ गांधी नव्हे, तर सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे क्रांतीकारक कारणीभूत होते’, असे अनेक तज्ञांचे मत आहे. वर्ष १९४५ मध्ये आजपर्यंत न उलगडलेल्या नेताजींच्या रहस्यमय मृत्यूने भारताची अनन्वित हानी झाली. मोदी शासन आल्यावर वर्ष २०१५ मध्ये त्यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक धारिका शासनाने जनतेला पहाण्यासाठी खुल्या केल्या.

नेताजींना योग्य आदरांजली द्या !

वीरश्रीने भरलेल्या नेताजींच्या आयुष्यातील काही अत्यल्प प्रसंगांना मुद्दामहून येथे उजाळा दिला; कारण त्यावरूनही त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अत्युच्च योगदानाचा सन्मान करणे राहून गेले आहे, हे लक्षात येईल. इंडोनेशियासारख्या इस्लामी देशाने त्याच्या नोटेवर श्री गणेशाची मूर्ती छापली आहे. भारतियांच्या दृष्टीने धन हेही ‘लक्ष्मी’चे प्रतीक आणि पूजनीय आहे. त्यामुळे चलनावर योग्य त्या व्यक्तीचे चित्र असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरही संस्कृतमध्ये ‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी, शहाजीराजेंचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते’ अशा सुंदर आशयाचे लिखाण केले होते. ‘भारताच्या चलनावरही संस्कृती, परंपरा, इतिहास, क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज असणार्‍या महापुरुषांची प्रतिके असावीत’, असे राष्ट्रप्रेमींना वाटते. त्या अनुषंगाने हिंदु महासभेने सुचवलेले सूत्र मोदी शासनाने कृतीत आणले, तर नेताजींच्या कार्यासाठी देशाकडून वाहिलेली आदरांजली ठरेल, तसेच त्यांच्या वीरश्रीची चेतना जनतेत निर्माण होण्यास साहाय्य होईल !

भारतीय चलनावर नेताजींसारख्या उच्च ध्येय घेऊन लढणार्‍या शूर पुरुषांची प्रतिके हवीत !