‘वन्दे मातरम्’ला विरोध करून काँग्रेसने दाखवली देशविरोधी मानसिकता ! – राम कुलकर्णी, प्रवक्ते, भाजप

अंबाजोगाई (जिल्हा बीड), ५ ऑक्टोबर (वार्ता.) – सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दूरभाषवर ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणावे, या राज्यशासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकताच दाखवली आहे. ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात ‘वन्दे मातरम्’ म्हणत फासावर चढलेल्या हुतात्म्यांचा एकप्रकारे अपमानच केला असून त्यासाठी त्यांनी देशाची क्षमा मागावी, अन्यथा त्यांना जनतेच्या संतापास सामोरे जावे लागेल, अशी चेतावणीही भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. भगतसिंग, राजगुरु यांच्यासारखे अनेक क्रांतीकारक, स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेले सामान्य कार्यकर्ते ‘वन्दे मातरम्’ म्हणतच फासावर चढले होते. बाळासाहेब थोरात यांना हा इतिहास ठाऊक आहे, तरीही त्यांनी ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणे दुर्दैवी आहे. पंडित नेहरूंच्या पणतूच्या काळात काँग्रेसची राष्ट्रप्रेमाची व्याख्या कदाचित् पालटली असावी. त्यामुळे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ यांसारख्या देशविरोधी घोषणा देणार्‍या प्रवृत्तींना नेहरूंचे पणतू राहुल गांधींनी पाठिंबा दिला. एकीकडे ‘भारत जोडो’ म्हणत पदयात्रा काढायची आणि दुसरीकडे ‘वन्दे मातरम्’ला विरोध करायचा यातून काँग्रेसचा दुटप्पी आणि ढोंगी चेहरा उघड झाला आहे.