शिक्षणव्यवस्थेत हिंदुत्वाच्या शिक्षणाचा समावेश व्हावा ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

न्यायालयात भारतीय भाषांत निकाल हवेत, अशीही मागणी

रायपूर (छत्तीसगड) – अमेरिका आणि ब्रिटन या देशांमध्ये हिंदुत्वाचे शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे ते भारतातही दिले पाहिजे. ‘हिंदुत्वाविषयी योग्य माहिती काय आहे ?’, याचा शिक्षणव्यवस्थेत समावेश व्हावा, अशी मागणी येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३ दिवसीय समन्वय बैठकीमध्ये करण्यात आली. या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत शिक्षण, रोजगार, आर्थिक, सामाजिक यांसारख्या सूत्रांवर विस्ताराने चर्चा झाली. संघाच्या सर्व ३६ संघटनांशी चर्चा केल्यानंतर देशात सकारात्मक पालटावर काम झाले पाहिजे, यावर एकमत झाले. तसेच स्थानिक स्तरावर ग्राम आधारित अर्थव्यवस्था पुन्हा चालू करण्यावर चर्चा झाली.

संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी बैठकीविषयी माहिती देतांना सांगितले की, न्यायालयांत भारतीय भाषांत काम व्हावे. निकाल भारतीय भाषांत असावा. ‘अधिवक्ता आणि न्यायाधीश इंग्रजीत काय बोलतात ?’, हे लोकांना कळत नाही. ‘राष्ट्र म्हणजे समाज असतो. त्यामुळे येथील समाज हिंदू आहे’, असेही ते म्हणाले.