झारखंडमध्ये गोतस्करांकडून पोलिसांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

रांची (झारखंड) – नुकतेच येथे महिला पोलीस अधिकारी संध्या टोपनो यांना वाहनाद्वारे चिरडून ठार मारल्यानंतर आता गुमला येथे गोतस्करांनी पोलिसांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस कर्मचारी त्वरित मागे हटल्याने ते थोडक्यात बचावले. या वेळी पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक प्रसिद्ध तिवारी घायाळ झाले.

गोतस्कर ट्रकमधून गोवंश घेऊन जात असल्याची माहिती गुमला पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुमलाच्या शंख मोड माजतोली येथे पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले. पोलिसांनी एक मालवाहू ट्रक आणि बोलेरो गाडी रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र या वाहनांनी थांबण्याऐवजी पोलिसांना वाहनांद्वारे चिरडण्याचा प्रयत्न केला आणि पुढे निघून गेले.

पोलिसांनी दोन्ही वाहने कह्यात घेतली आहेत. त्यांमधील ४१ गोवंश जप्त करून ती गावकर्‍यांना वाटली. या प्रकरणी गोवंश तस्कर महंमद दानिश कुरेशी, चालक महंमद मोजाहिद आणि वाहनाचा मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

गोरक्षण करतांना गोरक्षकांना अनेकदा अशा जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. तेव्हा पोलिसांनी गोतस्करांवर कठोरात कठोर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. परिणामी उद्दाम गोतस्करांची आता पोलिसांच्या अंगावरच गाडी घालून त्यांना जिवे मारण्यापर्यंत मजल गेली आहे ! गोतस्कारांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसणे, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !