आगरा येथील राजा मंडी रेल्वे स्थानकावरील चामुंडादेवी मंदिर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील राजा मंडी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर असलेले चामुंडादेवीचे मंदिर हटवण्याची रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. या नोटिसीच्या विरोधात या संघटनांनी रेल्वे स्थानाकात निदर्शने केली. ‘मंदिर हटवले, तर रेल्वेगाडीखाली उडी मारून आत्महत्या करू’, अशी चेतावणी त्यांनी दिली. यानंतर प्रशासन आणि पोलीस यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे मंदिर २५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. एकूण १ सहस्र ७१६ चौरस फूटांच्या या मंदिराचा १७२ चौरस फूट भाग या फलाटावर आहे. तो हटवण्यासाठी १२ एप्रिलला रेल्वे प्रशासनाने नोटीस दिली होती. यामागे प्रवाशांना होणारी असुविधा आणि सुरक्षा हे कारण देण्यात आले आहे. ‘जर मंदिर हटवले नाही, तर हे फलाट प्रवाशांसाठी बंद करण्यात येईल’, असेही प्रशासनाने म्हटले आहे.