श्रीलंकेने आणीबाणी उठवली

देशभरात चीनविरोधी निदर्शने !

श्रीलंकेत चीनविरोधी निदर्शने !

कोलंबो (श्रीलंका) – आर्थिक संकटावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात १ एप्रिलला लागू केलेली आणीबाणी ५ एप्रिलला मध्यरात्री उठवण्याची घोषणा केली. आणीबाणी लागू केल्यामुळे राजपक्षे यांना प्रचंड विरोध होत होता.

१. या आणीबाणीच्या विरोधात ५ एप्रिलला सायंकाळी राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.

 (सौजन्य : Zee News)

२. श्रीलंकेने नॉर्वे, इराक आणि ऑस्ट्रेलिया येथील स्वतःचे दूतावास तात्पुरते बंद केले आहेत. श्रीलंकेचे माजी वित्त अधिकारी नंदलाल वीरासिंघे हे ७ एप्रिल रोजी ‘सेंट्रल बँके’च्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

३. दुरीकडे श्रीलंकेच्या सैन्याने हिंसक आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. सैन्याने ५ एप्रिलला प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ‘निषेधाच्या नावाखाली हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल’, असे म्हटले आहे. श्रीलंकेच्या पोलिसांनीही आंदोलकांना ‘कायदा हातात घेऊ नका’, अशी चेतावणी दिली आहे.  श्रीलंकेचे संरक्षण सचिव जनरल (निवृत्त) कमल गुणरत्ने यांनीही लोकांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

४. या आंदोलनांच्या प्रकरणी आतापर्यंत एकूण ५४ जणांना अटक करण्यात आली आहे. आंदोलकांना पकडण्यासाठी सीसीटीव्हीचे साहाय्य घेतले जात आहे.