बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश !

मुंबई येथील कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अवमान केल्याचे प्रकरण

ममता बॅनर्जी

मुंबई – काही दिवसांपूर्वी मुंबई येथील कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालय म्हणजेच शिवडी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर २ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना २ मार्च २०२२ या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना दिलेला निर्देश

 

(निर्देश वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात फौजदारी तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी २ मार्च या दिवशी सुनावणी होणार आहे. १ डिसेंबर २०२१ या दिवशी ममता बॅनर्जी या मुंबई येथील दौर्‍यावर आल्या होत्या. येथील एका कार्यक्रमात त्यांनी आसंदीवर बसूनच राष्ट्रगीताला प्रारंभ केला. त्यानंतर ४-५ ओळी गायल्यानंतर त्या उभे राहिल्या. कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी बंगालची संस्कृती, राष्ट्रगीत आणि संपूर्ण देश यांचा अवमान केला आहे, असे याचिकेत म्हटले आहे.