जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून पुण्यातील लोहगडावर चालू आहे दर्ग्याच्या ऊरुसाची सिद्धता !

  • छत्रपती शिवरायांनी मोगलांपासून रक्षण केलेल्या गड-किल्ल्यांचे स्वतंत्र भारतात मात्र इस्लामीकरण होण्याचा धोका !

  • राज्यातील गड-किल्ल्यांवर अवैध थडगी आणि दर्गे बांधून निर्माण केली जात आहेत धार्मिक स्थळेे !

  • पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीतच ‘किल्ले-गड बंद’चा शासन आदेश धाब्यावर बसवून गडावर उभारण्यात येत आहे मंडप !

  • हा ‘भूमी जिहाद’ नव्हे का ? – संपादक
  • राज्यातील किल्ल्यांवर दर्गे उभारून छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे इस्लामीकरण करण्याचे धर्मांधांचे नियोजित षड्यंत्र नव्हे का ? – संपादक
  • हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास दाबून त्यांचे खच्चीकरण करण्याचा हा बेबनाव वैध मार्गाने रोखायला हवा अन्यथा उद्या ‘हे किल्लेही मोगलांचेच होते’, असे सांगायलाही धर्मांध कमी करणार नाहीत ! – संपादक
  • गड-किल्ल्यांवरील अवैध बांधकामांविरुद्ध आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलीस आणि प्रशासकीय अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक
लोहगड

मुंबई, १० जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या किल्ल्यांवर थडगी किंवा दर्गे यांची अवैध बांधकामे उभारून शिवकालीन गड-किल्ले यांचे पद्धतशीरपणे इस्लामीकरण चालू आहे. राज्यातील अनेक किल्ल्यांवर अशा प्रकारे अतिक्रमण करून धार्मिक स्थाने सिद्ध करण्यात आली आहेत. हे सर्व काम नियोजनबद्ध चालू असून याकडे पोलीस आणि पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. पुणे येथील लोहगडावर तर पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीतच गडावर उरूस साजरा करण्याची जय्यत सिद्धता चालू आहे.

पुरातत्व विभाग किंवा जिल्हाधिकारी यांनी लोहगडावर उरूस साजरा करण्याची कोणतीही अनुमती दिलेली नाही. असे असतांना गडावर उरुसासाठी मंडप उभारला आहे. पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या अधिकार्‍यांनी गडाची पहाणी करूनही गडावर उभारण्यात आलेल्या मंडपावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुळात कोरोनाच्या धोक्यामुळे राज्यात जमावबंदी असतांना, तसेच गड आणि किल्ले बंद ठेवण्याचा सरकारचा स्पष्ट आदेश असतांना पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या अधिकार्‍यांच्या मूकसंमतीने लोहगडावर ऊरुसाची जय्यत सिद्धता चालू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

उरुसाच्या कार्यक्रमाची पत्रिका (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

पुरातत्व विभागाची अनुमती नसतांना हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून गडावर उरुसाची घोषणा !

हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून १७ आणि १८ जानेवारी या दिवशी लोहगडावर उरुस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची पत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात १७ आणि १८ जानेवारी हे दोन्ही दिवस गडावर साजर्‍या करण्यात येणार्‍या धार्मिक कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी अनुमती दिली नसतांना स्थानिक पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या जिवावर हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून हे सर्व अवैध प्रकार चालू आहेत.

उरूस साजरा होण्यापूर्वी गडावर घाण झाली नसल्याचे दाखवण्यासाठी पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी गडावर जाऊन बनवला व्हिडिओ !

हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून मागील काही वर्षांपासून लोहगडावर अवैधपणे उरुस साजरा केला जात आहे. यापूर्वी उरुस साजरा करतांना गडावर मद्य पिणे, मांस शिजवणे, मलमूत्र विसर्जित करून घाण करणे आदी प्रकार झाले आहेत. याविषयीचे जुने व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या पावनानगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शेळके, पुरातत्व विभागाचे अधिकारी, लोहगडाच्या देखभाल दुरुस्तीचे काम पहाणारे निकांत कुमार, गावचे सरपंच आदींनी या लोहगडाची पहाणी केली आणि गडावर घाण झाली नसल्याचा व्हिडिओ प्रसारित केला. (या वर्षीचा उरूस अद्याप झालेला नाही आणि मागील वर्षी उरुसाच्या वेळी करण्यात आलेली घाण आतापर्यंत कशी रहाणार ?  उरुसासाठी गडावर उभारण्यात आलेल्या मंडपावर कारवाई करण्याऐवजी ‘उरुसामुळे घाण होत नाही’, असे दाखवण्याची हातघाई पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी करत आहेत का ? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. – संपादक)

उरुसाला अनुमती नसूनही स्थानिक पोलीस आणि पुणे पुरातत्व उपविभागाचे अधिकारी यांची गडावरील त्यासाठीच्या मंडपाच्या बांधकामाला मूकसंमत्ती ?

प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये मागच्या बाजूला गडावर होणार्‍या उरुसासाठी मंडप उभारण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. उरुसाच्या कार्यक्रमपत्रिकेत नाव असणार्‍या आयोजकांपैकी एकाने ‘पोलीस नाईक शेळके आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत १७ आणि १८ जानेवारी या दिवशी गडावर उरूस साजरा करण्यात येणार असल्या’चीही माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. तरीही अवैधपणे उभ्या रहाणार्‍या मंडपाविषयी पोलीस आणि पुणे पुरातत्व उपविभागाचे अधिकारी सरळसरळ दुर्लक्ष करत असून उलट तिथे घाण नसल्याचा व्हिडिओ प्रसारित करून एक प्रकारे वरील गोष्टीचे समर्थनच करत असल्याचे बोलले जात आहे.

आतापर्यंत अनेक तक्रारी करूनही गडावर अवैधपणे साजरा होत आहे उरूस !

यापूर्वी शिवप्रेमी आणि विश्‍वनाथ जावलिकर यांनी केलेल्या लेखी तक्रारींची प्रत (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

मागील काही वर्षांपासून लोहगडावर अवैधपणे मंडपाची उभारणी करून हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून उरुस साजरा करण्यात येत आहे. याविषयी ‘गड-किल्ले सुरक्षा दला’चे श्री. विश्‍वनाथ जावलिकर स्थानिक शिवप्रेमींनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, तसेच पुरातत्व विभागाच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात लेखी तक्रार केली आहे. तथापि आतापर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे आता लोहगडावर प्रतिवर्षी उरुस साजरा करण्याची परंपरा चालू झाली असून हा अपप्रकार पोलीस आणि पुरातत्व अधिकारी यांच्या मूकसंमंतीने चालू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पुणे येथील पुरातत्व विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचे तहसीलदारांच्या पत्राकडेही दुर्लक्ष !

तहसीलदारांचे पत्र (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

पुणे येथील ‘गड-किल्ले सुरक्षा दला’चे श्री. विश्‍वनाथ जावलिकर यांनी केलेल्या तक्रारीवरून नायब तहसीलदारांनी २९ जून २०१९ या दिवशी लोहगडावर अवैधपणे साजर्‍या केल्या जाणार्‍या उरुसाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुणे येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाला पत्र पाठवले आहे; मात्र त्यानंतरही नियमितपणे गडावर उरुस साजरा केला जात आहे.

गडावर उरुस साजरा न करणाच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या आदेशाला मुंबई विभागाच्या पुरातत्व अधीक्षकांच्या वाटाण्याच्या अक्षता !

भारतीय पुरातत्व विभागाकडून पाठवण्यात आलेले पत्र (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

लोहगड किल्ला हे प्राचीन स्मारक असून त्यावर कोणत्याही प्रकारे धार्मिक कार्यक्रमाला अनुमती नाही. ‘प्राचीन स्मारक आणि त्याच्या परिसरात उरूस शरीफ साजरा करण्यासाठी अनुमती देण्यात येऊ नये’, असा स्पष्ट आदेश १३ डिसेंबर २०१८ या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून मुंबई विभागाच्या अधीक्षकांना देण्यात आला आहे. हा आदेश डावलून प्रतिवषी लोहगडावर उरूस साजरा केला जात आहे. (मुंबई विभागीय पुरातत्व खात्याच्या कार्यालयाने पुणे उपविभागीय कार्यालयाला याविषयी का कळवले नाही ?, हेही पुढे यायला हवे ! – संपादक)

गड-किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई होण्यासाठी पुढाकार घेऊन शिवकालीन किल्ल्यांचे इस्लामीकरण रोखा !

राज्यातील अनेक किल्ल्यांवर दर्गे किंवा थडगी उभारण्यात आली आहेत. असा प्रकार कुठे निदर्शनास आल्यास त्याविषयी प्रथम स्थानिक पोलीस, पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिकमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार करा. त्यानंतरही कारवाई होत नसल्यास राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे कारवाई होत नसल्याची तक्रार करा. त्यानंतरही कारवाई होत नसेल, तर लोकशाहीने मार्गाने आंदोलन उभारण्यासाठी सिद्ध व्हा !

लोहगड येथे होणार्‍या अवैध उरुसाच्या कार्यक्रमपत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे नाव !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके

मुंबई – पुण्यातील लोहगड येथे हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून साजर्‍या करण्यात येणार्‍या उरुसाच्या निमंत्रणपत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांचे नाव छापण्यात आले आहे. राज्यात सत्ता असलेल्या महाविकास आघाडीचे आमदार असतांना सरकारच्या जमावबंदीच्या कार्यक्रमाला हरताळ फासून आमदार शेळके उरुसाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार का ? अवैधपणे साजर्‍या करण्यात येणार्‍या या उरुसाच्या कार्यक्रमाला आमदार शेळके यांचा पाठिंबा आहे का ? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

लोहगडावर उरूस साजरा करणार्‍यांवर खटले प्रविष्ट करा ! – आमदार अतुल भातखळकर, भाजप

भाजपचे आमदार अतुल भातखळ

मुंबई – मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावर उरुसाची आवश्यकता काय ?  राज्यातील गडांवर मशीदसदृश बांधकाम करून जात्यंधता वाढवण्याचे काम चालू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्याने जात्यंध लोकांचे धारिष्ट्य वाढले आहे. खोटा इतिहास दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. लोहगडावरील या उरुसावर कायमची बंदी घालून आयोजकांवर खटले प्रविष्ट करावेत, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.