अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांच्या आधी ‘सुश्री’ ही उपाधी लावावी !

सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे

१. अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांपूर्वी ‘कुमारी’ ही उपाधी लावणे ऐकण्यास बरे वाटत नसणे

‘सध्या मराठी भाषेत अविवाहित मुलींच्या नावांच्या आधी ‘कुमारी’ आणि विवाहित स्त्रियांच्या नावांच्या आधी त्यांच्या वैवाहिक स्थितीनुरूप ‘सौभाग्यवती’ किंवा ‘श्रीमती’ या उपाधी लावण्यात येतात. भाषेत अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांच्या आधी लावण्यासाठी स्वतंत्र उपाधी नाही. त्यामुळे विशिष्ट वय उलटल्यानंतर, विशेषतः चाळिशीनंतर ‘अशा स्त्रियांना काय उपाधी लावावी ?’, असा प्रश्न पडतो. त्यांना ‘कुमारी’ ही उपाधी लावणे ऐकण्यास बरे वाटत नाही.

२. प्रौढ कुमारिकांच्या नावांपूर्वी ‘श्रीमती’ लिहिणे योग्य नसणे

सध्या काही जण प्रौढ कुमारिकांना ‘श्रीमती’ ही उपाधी लावतात; पण गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेत विधवा स्त्रियांच्या नावांपूर्वी ‘श्रीमती’ असे लिहिण्याची पद्धत रूढ झाली आहे. ही रूढी मराठीची भाषाभगिनी असलेल्या हिंदी भाषेतून मराठीत आली. या रूढीमुळे प्रौढ कुमारिकांच्या नावांपूर्वी ‘श्रीमती’ लिहिल्यास वाचकांचा अपसमज होऊ शकतो.

३. अविवाहित प्रौढ स्त्रियांना ‘सुश्री’ ही संस्कृत भाषेतील उपाधी लावणे

‘सुश्री’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. त्याचा अर्थ ‘सुंदर आणि सद्गुणी स्त्री’, असा आहे. संस्कृतमध्ये हा शब्द कुमारिका, सौभाग्यवती आदी सर्व स्त्रियांना आदराने संबोधण्यासाठी वापरला जातो. हिंदी भाषेने यापूर्वीच अविवाहित स्त्रियांना ही उपाधी लावण्यास आरंभ केला आहे. हे लक्षात घेऊन आणि मराठीतील उपलब्ध उपाधींचा अभ्यास करून विवाह न केलेल्या प्रौढ (४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या) कुमारिका स्त्रियांना ‘सुश्री’ ही संस्कृत भाषेतील आदर व्यक्त करणारी उपाधी लावणे योग्य वाटते.

टीप – मराठी भाषिक वाचकांना ‘सुश्री’ या उपाधीची सवय होईपर्यंत ‘सुश्री’ या उपाधीपुढे कंसात ‘कुमारी’ असे लिहिण्यात येईल.’

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२१)