‘शब्दांवरील आडव्या रेषेची व्याख्या, तिची निर्मिती आणि महत्त्व’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

‘सनातन परंपरेत संस्कृत, मराठी आणि हिंदी या भाषांतील शब्दांवर नेहमी आडवी रेष दिली जाते. ‘शब्दांवरील रेषेची व्याख्या काय आहे ? ती का देतात ? तिची निर्मिती कुणी आणि कशी केली ? तिचे महत्त्व काय ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. शब्दांवरील रेषेची व्याख्या

‘रेष’ या शब्दातील ‘रे’ हा शब्द ‘तेजा’शी संबंधित आहे, तर ‘ष’ हा शब्द ‘विशिष्ट प्रमाणा’शी संबंधित आहे. ‘जी शब्दांमध्ये विशिष्ट प्रमाणात तेज निर्माण करते, ती ‘रेष’ होय.’

२. शब्दांवर रेष देण्याची पद्धत कशी निर्माण झाली ?

भगवान शिवाच्या कपाळावर भस्माच्या ३ आडव्या रेषा आहेत. या ३ रेषा ‘पृथ्वीची उत्पत्ती, स्थिती आणि लय’ यांच्याशी संबंधित आहेत, तसेच भस्माच्या ३ आडव्या रेषांपैकी वरून पहिली रेष ‘भुवर्लाेक, स्वर्गलोक, महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक’, या सूक्ष्म लोकांशी संबंधित आहे. दुसरी, म्हणजे मध्यभागी असलेली रेष पृथ्वीशी संबंधित आहे, तर तिसरी रेष सप्तपाताळांशी संबंधित आहे. या तीन रेषा ‘भगवान शिव हा १४ भुवनांचा स्वामी आहे’, याचे प्रतीक आहे.

श्री. राम होनप

संस्कृत भाषा ऋषींच्या माध्यमातून सर्वप्रथम पृथ्वीवर साकार झाली. त्यापूर्वी श्री सरस्वतीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण एकत्र आले अन् त्यांनी देवलोकातील संस्कृत भाषेचे रूपांतर पृथ्वीला अनुरूप अशा संस्कृत भाषेत केले. जेव्हा या १२ गणांनी संस्कृत भाषेची निर्मिती केली, तेव्हा त्यांना संस्कृत शब्दांमध्ये स्थिरता आणि शक्ती (तेज) निर्माण करायची होती. यासाठी त्या गणांनी भगवान शिवाच्या कपाळावरील भस्माच्या ३ आडव्या रेषांपैकी मध्यभागी असलेली रेष ‘पृथ्वीलोक’ आणि ‘स्थिती’ यांच्याशी संबंधित असल्याने तिचा उपयोग शब्दांवर रेष देण्यासाठी केला. तेव्हापासून शब्दांवर आडवी रेष देण्याच्या संकल्पनेला आरंभ झाला.

या १२ गणांनी शब्दांवर आडवी रेष देण्याची संकल्पना साकार करून संस्कृत भाषेला पूर्णत्व दिले आणि त्यातून ‘अक्षरयोग’ साधला गेला; म्हणून भगवान शिव त्या गणांवर प्रसन्न झाला.

२ अ. शब्दांवरील आडव्या रेषेचे आध्यात्मिक वैशिष्ट्य : श्री सरस्वतीदेवीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण यांनी निर्माण केलेल्या संस्कृत भाषेला गणेश अंतिम स्वरूप देतो. ‘ही भाषा पृथ्वीवरील व्यक्तींसाठी पूरक व्हावी’, यासाठी गणेश संस्कृत शब्दांमध्ये काही पालट करतो; परंतु तो या १२ गणांनी निर्माण केलेल्या शब्दांवरील आडवी रेष देण्याच्या पद्धतीमध्ये कुठलाही पालट करत नाही.

३. ‘अक्षर’ या शब्दाची उत्पत्ती आणि त्याचा अर्थ

‘अखंड’ या शब्दापासून ‘अक्षय’ या शब्दाची निर्मिती झाली आणि ‘अक्षय’ या शब्दापासून ‘अक्षर’ या शब्दाची निर्मिती झाली. ‘अ’ या अक्षराचा अर्थ ‘निर्मिती’ आणि ‘क्षर’ हा शब्द ‘तेजा’शी संबंधित आहे. ‘ज्या आकारातून अक्षय तेजाची निर्मिती होते, त्या आकाराला ‘अक्षर’ असे म्हटले आहे.’

४. शब्दांवर रेष देण्याचे व्याकरणाच्या दृष्टीने महत्त्व

एखाद्या शब्दाचा आरंभ आणि शेवट कळण्यासाठी शब्दांवरील रेषेचा उपयोग होतो. त्यामुळे व्यक्तीला विषयाचे आकलन सहजतेने होते.

५. शब्दांवर आडवी रेष दिल्याने होणारे आध्यात्मिक लाभ 

५ अ. लिखाणातील रज-तम न्यून होणे : व्यक्ती साधना करणारी नसल्यास तिच्या लिखाणातून रज-तम लहरींची निर्मिती होऊ लागते. त्याचा परिणाम व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर होतो. त्यामुळे अशा व्यक्तीचे मन चंचल होऊन तिची बुद्धी अस्थिर होऊ शकते. तिने लिखाणात शब्दांवर आडवी रेष दिल्याने त्या रेषेद्वारे लिखाणात काही अंशी तेजतत्त्व निर्माण होते. त्यामुळे लिखाणातील रज-तम काही अंशी न्यून होतात; परिणामी लिखाणातील नकारात्मकता न्यून होते.

५ आ. लिखाणातील सात्त्विकता आणखी वाढणे : एखाद्या साधकाने देव किंवा गुरु यांच्याविषयी लिखाण केले असल्यास ते लिखाण मुळातच सात्त्विक असते. अशा शब्दांवर आडवी रेष दिल्याने रेषेतील तेजतत्त्वाने लिखाणातील सात्त्विकता आणखी वाढते. त्यामुळे याचा लिखाण करणारा साधक आणि वाचक या दोन्ही घटकांना आध्यात्मिक लाभ होतो.

५ इ. सात्त्विक व्यक्तीच्या मूलाधारचक्रातील ईश्वरी शक्तीत वाढ होणे : सात्त्विक व्यक्तीने सात्त्विक शब्दांवर आडवी रेष दिल्यास त्या शब्दांतून तिच्या मूलाधारचक्राला शक्ती मिळते. त्यामुळे त्या व्यक्तीतील कुंडलिनीशक्तीची स्वाधिष्ठानचक्राकडे जाण्याची गती वाढते. ही प्रक्रिया ‘अक्षरसिद्धांत’ किंवा ‘अक्षरसाधना’ या विषयांच्या अंतर्गत येते.

५ ई. आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीच्या लिखाणातील काळी शक्ती काही अंशी न्यून होणे : आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीच्या शरिरात वाईट शक्ती असल्यामुळे तिच्या लिखाणात काळी शक्ती असते. अशा व्यक्तीने स्वतःच्या लिखाणात शब्दांवर आडवी रेष दिल्याने लिखाणातील काळी शक्ती काही प्रमाणात न्यून होते.

६. शब्दांवर आडवी रेष न दिल्याने होणारी हानी

६ अ. सात्त्विक लिखाणातील सत्त्वगुण न्यून होणे आणि रज-तम असलेल्या लिखाणातील रज-तमात वाढ होणे : साधना करणार्‍या व्यक्तीने सात्त्विक शब्दांवर आडवी रेष न दिल्यास त्या शब्दांना परिपूर्णता येत नाही, तसेच त्या शब्दांतील पृथ्वी आणि आप या तत्त्वांना शब्दांवरील आडव्या रेषेद्वारे तेजतत्त्व मिळत नाही; परिणामी अशा शब्दांतील सत्त्वगुण न्यून होतो. साधना न करणार्‍या राजसिक आणि तामसिक व्यक्तीच्या लिखाणात त्या व्यक्तीतील स्वभावदोषांशी निगडित अनेक विचार असतात. अशा लिखाणातील शब्दांवर आडवी रेष न दिल्याने शब्दांतील रज-तमात आणखी वाढ होते.

६ आ. व्यक्तीचे मन अधिक चंचल होणे : साधना न करणार्‍या व्यक्तीचे मन मुळातच चंचल असते. तिने तिच्या लिखाणात शब्दांवर आडवी रेष न दिल्यास शब्दांतील रज-तमात आणखी वाढ होते. त्यामुळे त्या व्यक्तीचे मन आणखी चंचल होते.

६ इ. आध्यात्मिक त्रासात वाढ होणे : आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीच्या लिखाणात वाईट शक्तीमुळे काळी शक्ती निर्माण झालेली असते. अशा व्यक्तीने शब्दांवर आडवी रेष न दिल्यास तिच्या लिखाणात ईश्वरी तत्त्व येण्याचा मार्ग बंद होतो; परिणामी त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक त्रासात वाढ होते.

६ इ १. ‘व्यक्तीला शब्दांवर आडवी सरळ रेष ओढता न येणे’, हे तिला आध्यात्मिक त्रास असल्याचे एक लक्षण असणे : आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीला त्रास देणार्‍या वाईट शक्तीमुळे त्या व्यक्तीने केलेल्या कुठल्याही लिखाणात काळी शक्ती निर्माण होते. जेव्हा अशी व्यक्ती शब्दांवर आडवी रेष देते, तेव्हा रेषेतील तेजतत्त्वाचा त्या व्यक्तीतील वाईट शक्तीला त्रास होतो. त्यामुळे त्या व्यक्तीला ‘लिखाण करतांना त्यातील शब्दांवर आडवी रेष देण्याचा कंटाळा येणे, मनाचा संघर्ष होणे, शब्दांवर आडवी सरळ रेष देता न येता ती तिरकी किंवा तुटक दिली जाणे’, हे त्रास होतात. ‘व्यक्तीला शब्दांच्या व्यतिरिक्त सरळ रेष ओढता न येणे’, हेही तिला आध्यात्मिक त्रास असल्याचे एक लक्षण मानले आहे.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.