विदेशींचे ‘संस्कृत’प्रेम !

अमेरिकेतील गायिका कॅटी पेरी

भारतात संस्कृतला ‘देवभाषा’ मानले जाते; पण सध्याच्या परिस्थितीत तिला देवभाषेचा मान मिळतो का ? हा प्रश्नच आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना संस्कृत भाषा उत्तम प्रकार बोलता येते किंवा त्या भाषेचे अगदी थोडेच जाणकार आहेत. जे भारतात घडत नाही, ते विदेशात घडत असते, हे आपण बरेचदा पहातो, ऐकतो किंवा अनुभवतोही ! अगदी तसेच या संस्कृतच्या संदर्भात झाले आहे. अमेरिकेतील गायिका कॅटी पेरी हिने तिच्या हातावर संस्कृतीमधील एक सुभाषित ‘अनुगच्छतु प्रवाहं’ ‘टॅटू’ (गोंदणे) स्वरूपात काढलेले आहे. याचा अर्थ होतो, ‘प्रवाहासोबत जाणे.’ विदेशी गायिकेने तिच्या हातावर संस्कृतमधील ‘टॅटू’ काढणे, ही वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. त्यातही तो ‘टॅटू’ अर्थबोध करून देणारा आहे. ‘अनुगच्छतु प्रवाहं’ यातून गायिकेचा जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टीकोन आणि नवी आव्हाने स्वीकारण्याची सिद्धता दिसून येते. हा ‘टॅटू’ खरेतर ती इंग्रजी भाषेतूनही लिहू शकली असती; पण संस्कृतचे महत्त्व आणि तिची महानता तिने जाणली अन् ती ‘टॅटू’द्वारे साध्य करून दाखवली !

भारतात आज अनेकांच्या हातावर किंवा शरिराच्या विविध अवयवांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे ‘टॅटू’ काढलेले दिसतात. बहुतांश ‘टॅटू’ हे चित्र स्वरूपात किंवा इंग्रजी भाषेतील असतात. त्यात हिंदी किंवा मराठी या भाषा आढळूनच येत नाहीत. मातृभाषेला नव्हे, तर गुलामी लादणार्‍या भाषेला डोक्यावर घेऊन नाचवणे, हे भारतियांना चांगले जमते. त्यामुळे जे आपल्याला सांगायचे आहे, त्यासाठी इंग्रजीच कशी योग्य आहे, हेच सांगण्याचा भारतियांचा आटापिटा असतो. बहुतांश ‘टॅटू’ हे अर्थहीन किंवा निवळ प्रसिद्धीच्या हेतूने काढले जातात. त्यामुळे त्यामागील हेतूच लक्षात येत नाही. विदेशी लोक भारतात येतात, ते काय केवळ येथील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी नव्हे, तर भारताची संस्कृती, परंपरा अन् देशाचे वैभव यांना अभ्यासण्याच्या हेतूने ! या प्रत्येकातून ते भारत जाणण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करतात. भारतातील अनुभव डोळ्यांत, तसेच मनात साठवून ते पुन्हा विदेशात जातात अन् तेथे भारतीय तत्त्वाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. भारतीय वेशभूषा परिधान करणे, उदा. साडी किंवा धोतर नेसणे किंवा सदरा-पायजमा घालणे. कपाळाला कुंकू लावणे, हातात बांगड्या घालणे, कानातले घालणे, नथ किंवा पैंजण घालणे इत्यादी ते करतात. ‘हॅलो’, ‘हाय’ असे न म्हणता ‘नमस्कार’ म्हणून अभिवादन करणेही ते आचरणात आणतात. विदेशींच्या या सर्व उदाहरणांतून शिकून आता भारतीय लोक त्यानुसार अनुकरण करतील का ? संस्कृत भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतील का ?

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.