पणजी बनत आहे जुगाराची राजधानी ! – शैलेंद्र वेलिंगकर, परशुराम सेना

तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याने दिवसाढवळ्या कॅसिनोत प्रवेश करून प्रकार आणला उघडकीस !

श्री. शैलेंद्र वेलिंगकर, परशुराम सेना

पणजी, ५ नोव्हेंबर (वार्ता.)  – गोव्याची राजधानी पणजी आता जुगाराची राजधानी होऊ लागली आहे. याला स्थानिक आमदाराचाही पाठिंबा असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात अनधिकृत कॅसिनो चालू असल्याची माहिती पोलिसांना देऊनही त्यांनी त्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे आम्ही दिवसाढवळ्या अनधिकृत कॅसिनोत जाऊन हा प्रकार उघडकीस आणला, अशी माहिती ‘परशुराम सेने’चे प्रमुख श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील नामांकित दैनिकाच्या इमारतीतही अनधिकृत कॅसिनो चालू आहे. या कॅसिनोच्या बाहेर कॅसिनोविषयी कोणतीही लेखी माहिती नसते. पोलिसांनी कॅसिनोविषयी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केलेली असली, तरी आम्ही दिवाळीनंतर पुन्हा अनधिकृत कॅसिनोच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करणार आहे. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी ‘निवडून आल्यास १०० दिवसांत मांडवीतील तरंगते कॅसिनो हटवणार आहे’, असे आश्‍वासन दिले होते; मात्र अजूनही एकही तरंगता कॅसिनो बंद झालेला नाही, तर याउलट पणजी शहरात नवीन कॅसिनो येत आहेत. आमदार बाबूश मोन्सेरात यांना अशीच पणजी अपेक्षित आहे का ?’’