भूक निर्देशांक ठरवण्याची पद्धत अशास्त्रीय असून तो निश्‍चित करण्याच्या कार्यपद्धतीत अनेक गंभीर चुका ! – भारताने निर्देशांक नाकारला !

जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान घसरल्याचे प्रकरण

जर भारताला जाणीवपूर्वक अशा निर्देशांकाद्वारे जागतिक स्तरावर अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर भारताने प्रखर विरोध करून निर्देशांक फेटाळलेच पाहिजे ! – संपादक

नवी देहली – जागतिक भूक निर्देशांकात भारताचा क्रम खाली येणे आश्‍चर्यजनक आहे. या निर्देशांकाच्या क्रमवारीसाठी वापरली जाणारी पद्धत ‘अशास्त्रीय’ आहे. या अहवालाचा वस्तूस्थितीशी संबंध नाही. निर्देशांक निश्‍चित करण्याच्या कार्यपद्धतीत गंभीर चुका आहेत, असे सांगत भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने या अहवालाविषयी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. वर्ष २०२१ च्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये (ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये) ११६ देशांच्या सूचीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावर घसरण झाली. वर्ष २०२० मध्ये भारत ९४व्या क्रमांकावर होता. आता तो या सूचीमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या शेेजारी देशांच्याही मागे आहे.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पुढे म्हटले की, दूरध्वनीद्वारे केलेल्या ४ प्रश्‍नांच्या जनमत चाचणीच्या निकालावर हे मूल्यांकन करण्यात आले आहे. दरडोई अन्नधान्याच्या उपलब्धतेवर आधारित कुपोषणाचे मोजमाप करण्याची कोणतीही शास्त्रीय पद्धत नाही. कुपोषणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यासाठी वजन आणि उंचीच्या मोजमापाची आवश्यकता असते.