सरकार सणांच्या नाही, तर कोरोनाच्या विरोधात ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शिस्त आणि नियम यांचे पालन करावेच लागेल. हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपकडून करण्यात येत असलेले आंदोलन आणि दहीहंडी उत्सवाला अनुमती नाकारली. याविषयी मनसेने केलेली टीका यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारची वरील भूमिका प्रसिद्धीमाध्यमांकडे मांडली.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत, याची मला जाणीव आहे; पण गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्याच्या सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. ‘दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी’, असे राज्याला पत्र पाठवून केंद्रशासनाने कळवले आहे. आंदोलन करणारे स्वत:च्या बेशिस्त वागणुकीतून शिस्त पाळणार्‍या लोकांचे जीवन ते अडचणीत आणत आहेत.’’