कन्याकुमारी (तमिळनाडू) जिल्ह्यातील अनधिकृत चर्चच्या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना अटक !

  • काही घंट्यांनी सुटका !

  • जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन !

  • हिंदुत्वनिष्ठांना अनधिकृत चर्चवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? सरकार, पोलीस आणि प्रशासन यांना हे स्वतःहून लक्षात येत नाही का ?
  • चर्चने अनेक भूमी बळकावूनही पुरो(अधोगामी), हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, साम्यवादी, काँग्रेसी त्याविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ)) सत्ता असलेल्या तमिळनाडूमध्ये अनधिकृत चर्चवर कारवाई हाण्याची सुतराम शक्यता नाही ! यास्तव हिंदुत्वनिष्ठांनी न्यायालयात दाद मागणे यांसारख्या वैध मार्गांनी आवाज उठवणे अपेक्षित !
(डावीकडे) अनधिकृत चर्च (उजवीकडे) आंदोलन करताना हिंदुत्वनिष्ठ

कन्याकुमारी (तमिळनाडू) – कन्याकुमारी जिल्ह्यात असलेल्या माथुर पुलाजवळील अनधिकृत चर्चच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नुकतेच तीव्र आंदोलन केले. हे अनधिकृत चर्च हटवण्याची मागणी करत जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन केले. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी कन्याकुमारीच्या जिल्हा प्रशासकीय कार्यालयासमोरील आंदोलन स्थळावरून भाजपचे नागरकॉइल येथील आमदार एम्.आर्. गांधी, भाजपचे जिल्हाध्यक्ष धर्मराज यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठांना अटक केली. काही घंट्यांनी त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनामध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदु मुन्नानी (हिंदु आघाडीवर) या संघटनांचे कार्यकर्ते अन् काही गावकरी यांचा समावेश होता.

ताडपत्री टाकून चर्च झाकण्याचा प्रशासनाचा हास्यास्पद उपाय !

हास्यास्पद उपाय योजणारे प्रशासन ! प्रशासनाने असे अनधिकृत चर्च झाकणे, म्हणजे स्वतःची अकार्यक्षमता झाकण्याचा प्रकार आहे ! ‘आम्ही काहीतरी करतो’, असे दाखवणारे वरवरचे उपाय नकोत, तर अनधिकृत चर्च बांधणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे !

हिंदुत्वनिष्ठांच्या सुटकेनंतर त्यांची उपजिल्हाधिकरी यांच्यासमवेत बैठक झाली. या समस्येवर सामोपचाराने तोडगा काढत सध्या चर्चवर ताडपत्री टाकून चर्च झाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

कन्याकुमारी जिल्ह्यात शेकडो अनधिकृत चर्च ! – हिंदुत्वनिष्ठांचा आरोप

इतक्या मोठ्या संख्येने अनधिकृत चर्च उभे राहीपर्यंत प्रशासकीय यंत्रणा झोपल्या होत्या का ? यास उत्तरदायी असणार्‍या संबंधितांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

आंदोलनकर्त्या हिंदुत्वनिष्ठांनी अनधिकृत चर्चसंदर्भात माहिती देतांना सांगितले की, हिंदु आणि ख्रिस्ती यांच्यातील धार्मिक सामंजस्य अबाधित राखण्यासाठी वर्ष १९८२ मध्ये सादर करण्यात आलेला ‘वेणुगोपाल समिती’चा अहवाल विचारात घ्यायला हवा. यानुसार खासगी अथवा सार्वजनिक जागेत चर्च उभारले जाऊ शकत नाही. असे असले, तरी ख्रिस्ती मिशनरी हुशारीने एखादी इमारत भाड्याने घेतात आणि कालांतराने त्यावर क्रॉस लावतात. काही वेळा मिशनरी कोणतीही अनुमती न घेता चर्च उभारतात आणि विजेच्या जोडणीविना वर्षानुवर्षे ते चालवतात. पुढे ‘वजन’ वापरून चर्च अधिकृत करून घेतात. आज कन्याकुमारी जिल्ह्यात अशाप्रकारे शेकडो चर्च उभारली गेली आहेत.