तबलिगी जमात प्रकरणी ३ वृत्तवाहिन्यांना दंड आणि प्रेक्षकांची क्षमा मागण्याचे ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी’चे निर्देश

बेंगळुरू (कर्नाटक) – गेल्या वर्षी देहलीतील निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी जमातचे सदस्य देहलीतून आपापल्या गावी परतल्यानंतर देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांकडून, तसेच राजकीय नेत्यांकडून यासाठी तबलिगी जमातवाल्यांना उत्तरदायी ठरवण्यात येऊ लागले. यानंतर विविध न्यायालयांनी हे वार्तांकन आक्षेपार्ह असल्याचे नमूद केले होते. तेव्हा करण्यात आलेल्या वार्तांकनावरून कर्नाटकातील ३  वृत्तवाहिन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच प्रेक्षकांची क्षमा मागण्यासही सांगण्यात आले आहे. ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी’ (एन्.बी.एस्.ए.) अर्थात् ‘वृत्त प्रसारण मानक संस्थे’ने ही कारवाई केली आहे.

१. एन्.बी.एस्.ए. ने म्हटले की, तबलिगी जमातविषयी करण्यात आलेले वार्तांकन अत्यंत आक्षेपार्ह आणि केवळ अंदाजावर आधारित होते. वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची भाषा असभ्य होती. त्यात पूर्वग्रहदूषितपणा होता. कार्यक्रमातील भाषा चिथावणी देणारी होती आणि धार्मिक भावनांचा विचार न करता अन् सामाजिक सौहार्दतेची चौकट तोडणारी होती. सामाजिक तेढ निर्माण करून त्याला चिथावणी आणि प्रोत्साहन देणारी भाषा होती.

२. या प्रकरणी एन्.बी.एस्.ए.ने एका वृत्तवाहिनीला १ लाख, तर दुसर्‍या प्रादेशिक वृत्तवाहिनीला ५० सहस्र रुपयांंचा दंड ठोठावला आहे. या दंडासह  संबंधित वृत्तवाहिनीने या कार्यक्रमाविषयी २३ जून या दिवशी रात्री ९ वाजता प्रसारित केल्या जाणार्‍या बातमीपत्राच्या अगोदर प्रेक्षकांची क्षमा मागण्याचे निर्देशही दिले आहेत.

३. एका इंग्रजी वृत्तवाहिनीलाही या प्रकरणात दोषी धरण्यात आले असून दंड ठोठावण्यात आला आहे. या इंग्रजी वृत्तवाहिनीने तबलिगी जमात कार्यक्रमाविषयी आणि नंतर प्रसारित केलेली दृश्ये जुळत नसल्याचेही एन्.बी.एस्.ए.ने म्हटले आहे.