राहुल गांधी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा आभारी आहे ! – आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांची उपरोधिक टीका

भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

गौहत्ती (आसाम) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळेच मी आसामचा मुख्यमंत्री होऊ शकलो. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे विधान आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यावर उपरोधिक टीका करतांना केले.

हिमंत सरमा पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असतांना आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक बैठक झाली होती. या बैठकीत सरमा आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे काही प्रमुख नेतेही उपस्थित होते. या घटनेविषय सरमा म्हणाले की, बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांसाठी चहा, कॉफी मागवण्यात आली. या वेळी राहुल गांधी यांच्याजवळ बसलेला कुत्रा पटलाजवळ गेला आणि तिथे ठेवलेल्या ताटलीमधील एक बिस्किट घेऊन खाऊ लागला. या कुत्र्याचे नाव पीडी असल्याचे मला कळले. यानंतर राहुल गांधी आमच्याकडे बघून हसू लागले. आमच्याकडून पाहून ते असे का करत आहेत ?, असा विचार मी करत होतो. कुत्र्याने उष्टी केलेली बिस्किटाची ताटली पालटून राहुल गांधी दुसरी ताटली मागवतील याची मी चहाचा कप घेऊन वाट बघत राहिलो; पण असे झाले नाही. त्या वेळी तरुण गोगोई आणि सी.पी. जोशी यांच्यासारखे मोठे नेते त्याच ताटलीमधून बिस्किटे उचलून खाऊ लागल्याचे मी पाहिले.

सौजन्य : IndianExpressOnline 

मी नेहमी राहुल गांधी यांना भेटायला जात नव्हतो. यामुळे अन्य नेत्यांसाठी ही सामान्य गोष्ट बनली असल्याचा मला अंदाज आला. राहुल गांधी यांच्या प्रत्येक बैठकीत असेच काहीसे होत असणार याचाही मला अंदाज आला. अशा व्यक्तीसमवेत आणखी काळ काम करू शकत नाही, हे या घटनेनंतर मी ठरवले आणि काँग्रेसमधून बाहेर पडलो. यामुळे राहुल गांधी यांचा मी खूप आभारी आहे. मी मुख्यमंत्री होण्यात कुठे ना कुठे त्या घटनेचे मोठे योगदान आहे, असे हिमंत सरमा यांनी सांगितले. (हिमंत सरमा यांनी सांगितलेला प्रसंग खरा असेल, तर काँग्रेसमध्ये गांधी घराण्याकडून पक्षाच्या नेत्यांचा किती मान राखला जातो, हे स्पष्ट होते ! अशांकडून सर्वसामान्य जनतेचा मान आतापर्यंत का राखला गेला नाही आणि पुढे तो का राखला जाणार नाही, हे लक्षात येते ! – संपादक)