अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल
पणजी, ३१ मे (वार्ता.) – गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा शालांत मंडळ) १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल सिद्ध करणारी योजना आणि तिचा मसुदा आखला आहे. शाळांमधील परीक्षांच्या गुणांनुसार अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तो निकाल देण्यात येणार आहे. या मसुद्याला पुढील काही दिवसांत अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिली आहे.
१. सध्या सिद्ध झालेल्या धोरणानुसार प्रत्येक शाळेने निकाल समिती नेमावी लागणार आहे आणि यामध्ये मुख्याध्यापकासह ८ शिक्षकांचा समावेश करावा लागणार आहे. यामध्ये शेजारील शाळेमधील २ शिक्षकांना समाविष्ट करण्याची अट घालण्यात आली आहे.
२. मंडळाने सिद्ध केलेला निकाल एखाद्या विद्यार्थ्यास मान्य नसल्यास त्याला पुरवणी परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
३. शाळांनी गुण कोणत्या आधारावर दिले, त्याचा पुरावा नोंद करून ठेवावा. कुणीही हरकत घेतल्यास हे पुरावे दाखवण्याची आवश्यकता भासू शकते.
४. शाळांना स्वतंत्र परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देता येणे शक्य नाही किंवा ज्यांचे अंतर्गत मूल्यमापन होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना वेगळी पुरवणी परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
५. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाला अंतर्गत गुण २० असतात, तर मंडळाच्या परीक्षेचे ८० गुण असतात. यंदा मंडळाची परीक्षा न झाल्याने ८० गुणही शाळांच्या निकाल समितीला द्यावे लागणार आहेत.