पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या खोलीत बसल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी ११.५.२०२१ या रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. आज त्यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी

‘२१.९.२०२० या दिवशी मला पू. माईणकरआजी यांच्या खोलीत बसण्याची संधी मिळाली.

१. खोलीत बसून नामजप करतांना ‘स्वतःवरचे आवरण निघून जात आहे’, असे जाणवणे

मी खोलीत गेल्याक्षणी मला खोलीमध्ये पुष्कळ गरम जाणवले. मी खोलीत १० मिनिटे होते. मी नामजप करत असतांना ‘माझ्यावरचे आवरण निघून जात आहे’, असे मला जाणवले. माझ्या शरिरातून गरम वाफा बाहेर पडत होत्या. मला हलकेपणा जाणवत होता.

कु. शांता जंगम

२. पू. माईणकरआजींच्या गळ्यातील माळेला स्पर्श केल्यावर हाताला सुगंध येणे

पू. आजी जसे सांगत होत्या, त्याप्रमाणे मी कृती करत होते. त्या वेळी माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती. पू. आजी त्यांच्या गळ्यातील माळ काढत होत्या. मी त्यांना गळ्यातील माळ काढायला साहाय्य केले. मी त्या माळेला हात लावल्यावर मला चंदनाचा सुगंध आला. माझ्या हातालाही सुगंध येत होता.

३. पू. माईणकरआजींची त्वचा तेजस्वी दिसणे

पू. आजी नामजप करतांना मला त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाची नखे पिवळी दिसत होती. स्पर्श केल्यावर त्यांची त्वचा पुष्कळ मऊ लागत होती. पू. आजी आणि पू. आजींच्या खोलीत असणार्‍या परात्पर गुरुमाऊलीच्या चित्राकडे पाहून वाटत होते, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे श्रीराम आहेत आणि पू. आजी शबरी आहेत.’

४. पू. माईणकरआजींचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव

सौ. अनुराधा पुरोहित (पू. आजींच्या कन्या) पू. आजींना ‘हे पहा. आता तुमची शबरी जेवत आहे’, असा भाव ठेवून भरवत होत्या. पू. आजी परम पूज्यांना सांगत होत्या ‘हे बघा. मी जेवत आहे. तुम्हीही जेवा.’ सौ. अनुराधाताईंनी पू. आजींना विचारले, ‘‘तिचा (कु. शांता जंगम यांचा) घसा बरा कसा होणार ? तिने काय करायला पाहिजे ?’’ तेव्हा पू. आजींनी सांगितले, ‘‘नामजप करा. बरा होईल.’’

– कु. शांता जंगम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक