पुणे जिल्ह्यातील ४२० रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ पूर्ण, उर्वरित ३०२ रुग्णालयांचे ‘ऑडिट’ करण्याचे काम चालू !

 ‘ऑडिट’ केलेल्या रुग्णालयांत प्राथमिक त्रुटी आढळल्या

रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अग्नीप्रतिबंधक यंत्रणा सक्षम नसणे, चिंताजनक ! संबंधित उत्तरदायींना शिक्षा होणे आवश्यक !

पुणे – पिंपरी-चिंचवड शहर, पुणे या सर्व ठिकाणच्या एकूण ७२२ रुग्णालयांपैकी पुणे शहरातील १८५, पिंपरी-चिंचवडमधील ४० आणि जिल्ह्यातील १९५ अशा ४२० रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ पूर्ण झाले आहे. उर्वरित ३०२ रुग्णालयांचे ‘ऑडिट’ करण्याचे काम चालू आहे. ‘ऑडिट’ झालेल्या रुग्णालयांमध्ये आढळून आलेल्या त्रुटी १५ दिवसांमध्ये दूर कराव्यात, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. संकटसमयी बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग नसणे, आग विझवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्‍यांची कमतरता, रुग्णालयांमध्ये अग्नीशमन सिलिंडरची उपलब्धता नसणे, यांसारख्या काही त्रुटी आढळून आल्या आहेत. (इतक्या प्राथमिक त्रुटी आढळणे, रुग्णालय प्रशासनासाठी लज्जास्पद ! १५ दिवसांनी पूर्तता केल्याचा अहवाल मागवणे अपेक्षित आहे. आतातरी पुन्हा अशा त्रुटी राहू नयेत यावर ठोस उपाययोजना रुग्णालय काढणार का ? – संपादक) रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळाचे (पी.एम्.आर्.डी.ए.) आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून रुग्णालयांमध्ये जाऊन पाहहाणी करण्यात येत आहे.