गंगानदी किनारी घाटांवर युवकांकडून ३- ४ सहस्र रुपयांत अंत्यसंस्कार !
संकट समयी एकमेकांना साहाय्य करण्याची संस्कृती असणार्या या देशात अशी स्थिती येणे, हे लज्जास्पद !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशीमधील गंगानदीच्या किनारी घाटांवर असणार्या स्मशानभूमीवर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णवाहिकांद्वारे आणले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मृतांचे नातेवाइक अंत्यसंस्कारापासून स्वतःला लांबच ठेवत आहेत. मृतांच्या अंत्यसंस्काराला कुणीच नसल्याने कुटुंबीय अगतिक झाले आहेत. अशा वेळी घाटावर काही युवकांचा गट ३ -४ सहस्र रुपये आकारून मृतदेहांची तिरडी बांधण्यापासून चितेवर ठेवण्यापर्यंतचे काम स्वतःचा जीव संकटात टाकून करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मृतांच्या कुटुंबियांनाही कोणताच पर्याय नसल्याने ३ – ४ सहस्र रुपये देऊन अंत्यसंस्कार करून घेणे भाग पडत आहे.
कोरोनाच्या दहशतीमुळे स्मशानभूमीत जाणारा मार्ग बंद करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न
अयोध्यापूरमधील वरुणा नदी किनारी असलेल्या मुक्तीधाम स्मशानभूमीवर जाणारा मार्ग काही ग्रामस्थांनी बंद केला. त्यामुळे लोकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन मार्ग खुला केला, तसेच पुन्हा अशा प्रकारे मार्ग बंद केल्यास कारवाई करण्याची चेतावणी दिली.