जनतेची होणारी लूट होतांना दिसत असतांना दरपत्रक लावायला हवे, हे परिवहन कार्यालयाच्या लक्षात का येत नाही ? यासाठी पाठपुरावा का घ्यावा लागतो ? कामचुकार संबंधित कर्मचार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, ही अपेक्षा.
पिंपरी-चिंचवड – कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी तसेच उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यास त्याला स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक लूट चालू आहे. यासंदर्भात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी संताप व्यक्त केल्यानंतर पुणे प्रादेशिक आणि पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेश जारी करून खासगी रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक निश्चित केले आहे.
हे दरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक केले आहे. या दरपत्रकापेक्षा जास्त भाडे आकारल्यास mh१४@ mahatranscom.in या ई-मेल आयडीवर तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. अशा तक्रारींची नोंद घेऊन संबंधित रुग्णवाहिकेवर आर्.टी.ओ.च्या वायुवेग पथकाच्या वतीने त्यावर कारवाई करण्यात येईल, असे कार्यालयाने सांगितले आहे.
सर्व रुग्णवाहिका चालक मालक संघटना, रुग्णालयांनी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सेवा द्यावी आणि अतिरिक्त भाडे आकारणी करू नये, असे आवाहन परिवहन कार्यालयाने केले आहे.