६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. ज्ञानदेव पाटील यांना सुचलेले ‘रामसेतू बांधण्याची प्रक्रिया आणि ईश्‍वरी राज्याची स्थापना’ यासंदर्भात साम्य दर्शवणारे विचार

रामसेतू

१. रामसेतू बांधण्याची प्रक्रिया

श्री. ज्ञानदेव लक्ष्मण पाटील

‘वानरसेनेने सेतू बांधण्याची सेवा करतांना स्वतःच्या मनावर श्रीरामरायाचे नाव कोरले आणि त्यानंतर प्रत्येक दगडावर कोरले, तसेच श्रीरामरायांचे नाव घेऊन ते दगड पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्यावर तरंगले. प्रभु श्रीरामरायांच्या कृपेने सेतू बांधण्याचे कार्य लवकर पूर्ण झाले.

२. प्रभु रामरायाच्या संकल्पाने सेतू बांधला असूनही श्रीरामाने त्याचे श्रेय वानरसेना आणि छोटीशी खारुताई यांना देणे

साक्षात् प्रभु रामचंद्राने त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व वानरसेनेला चैतन्य आणि भक्तीरूपी अमृत देऊन त्यांच्याकडून सेतू बांधण्याचे अशक्य असे कार्य करवून घेतले. खरे तर प्रभु रामरायांनी सेतू बांधण्याचा संकल्प केला आणि सेतू बांधून पूर्णही केला; परंतु त्याने सेतू बांधण्याचे सर्व श्रेय वानरसेना आणि छोटीशी खारुताई यांना दिले.

३. ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेची प्रक्रिया

ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या प्रक्रियेविषयी विचार करतांना ‘रामसेतूच्या संदर्भातील सर्व सूत्रे आताही कृपाळू गुरुमाऊलींच्या कृपेने घडत आहेत’, असे लक्षात आले.

३ अ. साधकांनी वानरसेनेप्रमाणे गुरूंचे नाम कोरलेले मन गुरूंच्या चरणी अर्पण केल्यास साधकांची साधना होईल आणि ईश्‍वरी राज्य येईल ! : वानरसेनेने प्रभु श्रीरामाचे नाव स्वतःच्या मनावर, म्हणजेच स्वतःमध्ये असलेल्या अहंरूपी दगडावर कोरले आणि ते दगड समुद्रामध्ये, म्हणजेच या भवसागरात टाकले अन् ते नामरूपी दगड सागरामध्ये तरंगले. त्याप्रमाणेच प्रत्येक साधकाच्या मनावर कृपाळू गुरुमाऊलीचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) नाव कोरले आहे. साधकांनी वानरसेनेप्रमाणे नाम कोरलेले हे मन गुरूंच्या चरणी अर्पण केल्यास साधकांची साधना होईल आणि ईश्‍वरी राज्य येईल !

३ आ. साधकांनी ईश्‍वरी राज्याच्या निर्मितीसाठी केलेले सर्व कर्म गुरुमाऊलीच्या चरणी जाऊन ईश्‍वरी राज्य येईल ! : गुरुमाऊलीच्या ईश्‍वरी राज्याच्या निर्मितीच्या कार्यामध्ये प्रत्येक नामधारी साधक जे कर्म करत आहे, ते सर्वच्या सर्व कृपाळू गुरुमाऊलीच्या चरणी जाऊन त्यांना अपेक्षित असे ईश्‍वरी राज्यही येईल.

३ इ. प्रत्येक साधकाने स्वत:ला विसरून गुरुचरणांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ! : वानरसेना स्वत्व विसरून रामनामाशी एकरूप झाली होती. त्याप्रमाणे ईश्‍वरी राज्याच्या निर्मितीत सहभागी प्रत्येक साधकाने स्वत:ला विसरून गुरुचरणांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायला हवा.

३ ई. वानरसेनेप्रमाणे साधकांनी ईश्‍वरी राज्य स्थापण्याच्या सेवेत सहभागी होऊन जीवनाचा उद्धार करून घ्यावा : प्रत्येक सेवा, म्हणजे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचा एक-एक दगड आहे. प्रत्येक दगड ईश्‍वरी राज्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण वानरसेनेप्रमाणे या ईश्‍वरी राज्य स्थापण्याच्या सेवेत सहभागी होऊया आणि जीवनाचा उद्धार करून मोक्षाला जाऊया.

४. ‘स्वतः (साधक) एक दगड असून गुरुमाऊली त्यावर नाम कोरत आहे आणि तो दगड ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी वापरला जाणार आहे’, असे वाटणे अन् लिखाण करतांना गुरुमाऊलीचे अस्तित्व जाणवून आनंद अनुभवणे

‘मी म्हणजे एक दगड आहे. कृपाळू गुरुमाऊली त्या दगडावर नाम कोरत आहे आणि तो दगड ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी वापरला जाणार आहे’, असे मला वाटत होते. हे लिहीत असतांना मला पुष्कळ हलके वाटले आणि आनंद अनुभवता आला. मला गुरुमाऊलीचे अस्तित्व अखंड जाणवत होते आणि ‘तीच सर्व लिहून घेत आहे’, असे मी अनुभवत होतो. यासाठी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

‘हे कृपाळू गुरुमाऊली, तुम्ही आम्हा साधकांकडून ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेतील दगड बनण्यासाठी प्रयत्न करून घ्या’, अशी आपल्या पावन चरणी शरणागत आणि कृतज्ञताभावाने प्रार्थना आहे.’

– आपला चरणसेवक, श्री. ज्ञानदेव लक्ष्मण पाटील, चिपळूण (३०.८.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक