कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे विलंबाने अन् अपुर्‍या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोरोनाची लस घेऊनही कोरोनाचा संसर्ग होतोेे ! – डॉ. संजय ओक, प्रमुख, कोविड टास्क

कोरोनाचा संसर्ग होण्यामागे तज्ञांकडून २ शक्यता व्यक्त

मुंबई – कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही कोरोनाचा संसर्ग होतो. एखाद्या व्यक्तीने कोरोनाची लस घेतली; पण त्या वेळी तिला लक्षणे दिसत नाहीत. प्रत्यक्षात ती व्यक्ती ‘पॉझिटिव्ह’ असते. लस घेतल्यावर लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी चाचणी केल्यावर ती व्यक्ती ‘पॉझिटिव्ह’ येतेच, असे मत राज्याच्या ‘कोविड टास्क’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. ओक पुढे म्हणाले, ‘‘कोरोना लस घेऊनही कोरोनाचा संसर्ग होण्यामागे २ शक्यता आहेत. प्रथम कोरोनाची चाचणी केलेली नसते. त्यातच लसीचा दुसरा डोस घेतल्यावर लक्षणे दिसल्यावर आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी केली जाते. त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येतो. ही एक शक्यता आहे. कोरोनाची लस घेतल्यावर शरीर त्या विषाणूला प्रत्युत्तर देत असते. ते प्रत्युत्तर पॉझिटिव्ह टेस्टच्या माध्यमातून निदर्शनास येणे, ही दुसरी शक्यता असते. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना होऊ शकतो; पण तो सौम्य स्वरूपाचा असतो; कारण शरिरात ‘अँटिबॉडीज्’ सिद्ध झालेल्या असतात. त्याच विषाणूशी सामना करत असतात.’’

डॉ. ओक यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले, ‘‘मला तीव्र स्वरूपाचा कोरोना झाला होता. जानेवारी २०२१ मध्ये मी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला. २ मासांनी दुसरा डोस घेतला. मी माझ्या शरिरातील ‘अँटिबॉडीज्’ पडताळल्या. त्या २५० पेक्षा अधिक आहेत. याचा अर्थ माझ्या शरिरात प्रतिकारशक्ती आहे. अर्थात् त्या ‘अँटिबॉडीज्’ कोरोनापासून माझे रक्षण करतीलच, असे नाही; पण मला गंभीर स्वरूपाचा कोरोना होणार नाही. झालाच, तरी त्याचे स्वरूप सौम्य असेल.’’


मुंबई – १. सरकारने संचारबंदी घोषित केली असल्याने अनेकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे सामाजिक अंतराचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. कांजूरमार्ग, चांदिवली, मुलुंड येथील डी-मार्टच्या बाहेर रांगेत घुसखोरी करण्यावरून कडाक्याची भांडणेही झाली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनी ओळखपत्र दाखवून आत जाण्याचा प्रयत्न केला; पण सर्वसामान्यांच्या रोषामुळे त्यांना रांगेतच उभे रहावे लागले.

२. सरकारने डबेवाल्या मराठी लोकांसाठी कोणतेही अर्थसाहाय्य घोषित केलेले नसल्याने ते सर्वजण संतप्त झाले आहेत. त्यांनी ‘आम्ही काही पाप केले आहे का ?’, असा प्रश्‍न सरकारला विचारला आहे.

कल्याण-डोंबिवली – येथील महापालिका रुग्णालयात खाटांची संख्या अल्प पडत असल्याने रुग्णांना बाकांवर झोपवूनच ऑक्सिजन दिला जात आहे.

भंडारा – येथील स्मशानभूमीत एका दिवशी १२ कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांची संख्या प्रतिदिन वाढत असल्याने तेथील कर्मचार्‍यांवर ताण येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अंत्यसंस्कारांच्या वेळी ५०० फूट दूर अंतरावरून नातेवाइकांना शेवटचे दर्शन घ्यावे लागत आहे.

संभाजीनगर – येथे खाटांसह व्हेन्टिलेटर आणि ऑक्सिजन यांचीही कमतरता आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात देयक आकारले जाते. त्यामुळे लोक रुग्णालयात भरती होण्यासच नकार देत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा आहेत; पण आधुनिक वैद्य आणि परिचारिका नसल्याने लोक नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांत भरती होत आहेत. तेथे त्यांना ३ ते ५ लाख रुपये इतके देयक द्यावे लागते.


करमाळा (जिल्हा सोलापूर) येथे कोरोना केंद्रात एकच शौचालय पाण्यावाचून रुग्णांचे हाल !

करमाळा (जिल्हा सोलापूर) – येथील कोरोना केंद्रात ७० रुग्ण असून केवळ एकच शौचालय आहे. तेथे पाण्याचीही सोय नाही. त्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. तरी या संदर्भात तहसीलदारांनी तात्काळ नोंद घेऊन लक्ष घालावे, अशी मागणी रुग्ण करत आहेत.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !


आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]