लोकांच्या जिवापेक्षा दुसरे काय महत्त्वाचे असू शकते ?
पुणे, ४ एप्रिल – मागील वर्षभरात दळणवळण बंदीचा परिणाम म्हणून शहरातील ४० टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत. जी चालू आहेत त्यांचा ५० टक्के सुद्धा व्यवसाय होत नाही. अशा परिस्थितीत पुणे आणि पिंपरी शहरासमवेतच जिल्ह्यात ७ दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे; मात्र आजचा दिवस हा हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी ‘काळा दिवस’ आहे, असे सांगत युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन या रेस्टॉरंट असोसिएशनने या निर्बंधांना विरोध केला आहे. पुण्यात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांसंदर्भात रेस्टॉरंट मालकांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
दळणवळण बंदीनंतरही आमच्यावर लागलेले निर्बंध कायम राहिले. इतकेच नाही तर ते अधिक कडक होत गेले. आम्हीही गेले वर्षभर तोटा सहन करीत काम करत राहिलो. आता मात्र या क्षेत्रात टिकून रहाणे सुद्धा शक्य नाही. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास सिद्ध असून आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी या वेळी असोसिएशनचे सचिव दर्शन रावल यांनी केली.