रश्मी शुक्ला भाजपच्या दलाल असून त्यांनी अनुमतीविना फोन ‘टॅप’केले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकासमंत्री

डावीकडून नवाब मलिक, रश्मी शुक्ला

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतांना रश्मी शुक्ला या अनेक नेत्यांचे फोन अनुमती न घेता ‘टॅप’ करत होत्या. भाजपच्या दलाल म्हणून त्या काम करत होत्या, असा आरोप अल्पसंख्यांक विकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत गुप्तचर विभागाच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या स्थानांतरामध्ये रॅकेट असल्याची माहिती पोलीस महासंचालकांद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्या प्रकरणातील ‘फोन रेकॉर्ड’ही त्यांनी सादर केल्याचे म्हटले. त्यावर नवाब मलिक यांनी वरील आरोप केला.

या वेळी नवाब मलिक म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस ज्या अहवालाचा दाखला देत आहेत, त्यातील ८० टक्के अधिकार्‍यांचे स्थानांतर झालेच नाही. कुठलाही मंत्री अथवा गृहमंत्री अधिकार्‍यांचे थेट स्थानांतर करू शकत नाही. त्यासाठी ‘पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड कमिटी’ असते. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांच्या स्थानांतरासाठी ही समिती प्रस्ताव सिद्ध करते. फडणवीस चुकीची माहिती देऊन सरकारची अपकीर्ती करत आहेत.’’