हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हरिद्वार येथे चालू असलेले संतसंपर्क अभियान

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांना संस्थेच्या कार्याची माहिती देतांना श्री. अभय वर्तक

हरिद्वार, १९ मार्च (वार्ता.) – हिंदु धर्मियांची स्थिती गंभीर आहे, आमच्या श्रीमंत हिंदूंच्या आणि भोळ्याभाबड्या मुली ‘लव्ह जिहाद’ला सर्वाधिक बळी पडत आहेत. सर्वत्र देवतांचे विडंबन होत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमचे सदैव सहकार्य राहील. आम्ही श्री स्वामीनारायण भगवान यांची भक्ती करणारे असलो, तरी प्रथम हिंदु आहोत आणि मग भगवान श्री स्वामीनारायणांचे भक्त आहोत. एक हिंदु म्हणून आम्हाला हिंदु धर्म रक्षणाचे कार्य केलेच पाहिजे, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प.पू. स्वामीजींची संत संपर्क अभियानाच्या अंतर्गत भेट घेतली असता ते मार्गदर्शन करत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हेही उपस्थित होते.

या वेळी श्री. अभय वर्तक यांनी प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांना सनातन संस्था करत असलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. तसेच प.पू. स्वामीजींना गोवा येथील संस्थेच्या आश्रमामध्ये येण्याचे निमंत्रण दिले.

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांचा परिचय

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.

विशेष

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांनी कुंभमेळ्यात धर्मप्रचारासाठी आलेल्या सनातन संस्थेच्या १५ साधकांची निवास आणि भोजन यांची एक मासाची व्यवस्था त्यांच्या आश्रमामध्ये केली आहे.