खडतर प्रारब्धावर मात करून देवावर श्रद्धा ठेवून साधना करणार्‍या देवद आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८० वर्षे) !

श्रीमती सुलभा मालखरेआजी मूळच्या संभाजीनगर येथील आहेत. विवाहानंतर त्यांना अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागले. त्या सातवीपर्यंतच शिकलेल्या असूनही त्यांनी यजमानांचे विविध व्यवसाय सांभाळले. हे कौतुकास्पद आहे. उतारवयात आश्रमात रहायला आल्यानंतर त्यांनी ३ वर्षांतच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांचा जीवनप्रवास साधकांना सर्वच दृष्टीने आदर्शवत आहे.

लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! त्यांची पुढील प्रगती जलद होईल, याची मला खात्री आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

श्रीमती सुलभा मालखरेआजी

१. बालपण

अ. माझे आई-वडील फार हुशार होते. माझ्या वडिलांचे नाव श्री. रामचंद्र भालचंद्र डोंगरे. माझ्या वडिलांचा गोरेगाव येथे दुधाचा व्यवसाय होता; पण हा धंदा बुडाला. नंतर आम्ही कल्याण येथे रहायला आलो. तेथे वडिलांनी आयुर्वेदीय औषधांचे दुकान चालू केले. त्यांच्या स्वभावामुळे वसूली होत नव्हती. वडिलांना हा व्यवसाय करणेही जमले नाही. ते बाहेर गेल्यावर दुकान बंद ठेवायचे. त्यानंतर त्यांनी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्याकडे काम करणे चालू केले. आमची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती.

आ. आम्ही ५ बहिणी आणि आई-वडील असे ७ जण एका खोलीत रहायचो. आम्ही दुकानात बसायचो. घरी पाण्यासाठी नळ नव्हते आणि वीजपुरवठा नव्हता. तेव्हा आम्ही विहिरीचे पाणी शेंदून (हाताने दोरी ओढून विहिरीतून पाणी वर काढणे) आणायचो.

इ. लहानपणी मी आडदांड होते. सर्व बहिणींमध्ये माझी प्रकृती चांगली होती. झाडावर चढणे, उड्या मारणे, असे मुलांचे खेळ मी खेळत असे. मी एका दमात ५०० दोरीवरच्या उड्या मारत असे.

ई. मी १५ वर्षांपर्यंत कल्याण येथे होते. त्यानंतर मी आणि माझ्या पाठची बहीण डोंबिवली येथे काकांकडे रहायला गेलो. ते भाड्याच्या घरात रहायचे. आत्या आणि आत्याचा मुलगा, काका-काकू, त्यांचा एक मुलगी आणि एक मुलगा, आम्ही दोघी असे ८ जण त्या घरात रहायचो. नंतर त्यांनी स्वतःचे घर बांधले.

उ. त्यानंतर वडिलांना भाग्यनगर येथे (हैद्राबादला) चिनी मातीच्या बरण्यांच्या दुकानात ९० रुपये वेतनावर नोकरी मिळाली. मला काकांकडे रहायला आवडत नव्हते; म्हणून मी आई-वडिलांसह भाग्यनगर येथे रहायला गेले. माझी मोठी बहीण आणि माझ्या पाठची बहीण अशा दोघीजणी काकांकडे राहिल्या. मी आणि सर्वांत लहान बहीण अशा आम्ही दोघी भाग्यनगरला गेलो. तेथे असतांना मी शाळेत चालत जात असे. काका आम्हाला पैसे पाठवायचे.

ऊ. बालपणात झालेले त्रास

१. मला लहानपणापासून श्‍वासाशी संबंधित आणि शौचाचे खडे होण्याचा त्रास होता.

२. मी आडदांड असल्याने आई मला अधिक मारत असे.

२. सात्त्विक आणि धर्माभिमानी आई-वडील

अ. माझे आई-वडील सात्त्विक होते. आई घरातील सर्व पारंपरिक कर्मकांड करत असे.

आ. वडिलांनी ‘हिंदुत्व हे वरदान’ हे पुस्तक लिहिले. माझे वडील सावरकरांच्या भाषणाचे नियोजन करत. ते म्हणत, ‘‘अन्य पंथियांकडून नारळ, केळी विकत घ्यायची नाहीत.’’ आम्ही कल्याण येथे असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माझ्या वडिलांना वाचनालय चालू करण्यासाठी त्यांच्याकडील काही ग्रंथ दिले होते. माझे वडील लेखही लिहायचे. अशा कट्टर देशभक्त असलेल्या कुटुंबात माझे बालपण गेले. माझ्या आईचा आणि माझा आवाज चांगला होता. स्वा. सावरकरांच्या एका व्याख्यानानंतर मी आणि आईने ‘अखिल हिंदु विजय ध्वज हा लढवूया पुन्हा, ध्वज हा उभारूया पुन्हा ।’ हे गीत गायले होते.

इ. माझे वडील नियमितपणे संध्या करायचे. त्यांची सर्वांशी चांगली वागणूक होती. त्यांचे लघुरुद्र म्हणतांना देहावसान झाले. ‘त्यांना पुढची गती मिळाली’, असे मला जाणवले.

३. शिक्षण

अ. माझे इयत्ता सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण कल्याण येथे झाले. भाग्यनगर येथे चौथीपासून हिंदी भाषा होती. ती मला येत नव्हती. तेथे मी आठवीत गेले.

. बालपणापासूनच मी व्यवहारात हुशार होते. वयाच्या ३८ व्या वर्षी मी सायकल शिकले. एका मुलाने मला सायकल शिकवली.

इ. वर्ष १९८० मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी मी गायनाची तिसरी परीक्षा उत्तीर्ण झाले. मी गाणे शिकण्यासाठी शिकवणी लावली होती. माझ्या यजमानांना गाण्याची आवड होती. ते मला गाण्याच्या शिकवणी वर्गाला सोडायचे.

ई. मी संस्कृतच्या तीन परीक्षा दिल्या. मी बाहेरून पेपर देऊन त्यात उत्तीर्ण झाले.

उ. एक महिला ‘लूना’ दुचाकी चालवायची. तिला बघून मला दुचाकी चालवण्याची इच्छा झाली. मी आरंभी कार्यालयात आणि बेकरीत चालत जायचे. नंतर मला सायकल आणि दुचाकी चालवता यायला लागल्यावर मी दुचाकीने जाऊ लागले.

ऊ. वयाच्या ५६ व्या वर्षी मी एका मासात पोहायला शिकले. या वयात मी पोहायला शिकले; म्हणून मला बक्षीसही मिळाले होते.

मी केवळ सातवी उत्तीर्ण असूनही जीवनात मी जे शिकले, ती केवळ गुरुदेवांचीच कृपा आहे.

४. वैवाहिक जीवन

४ अ. विवाह : वयाच्या १८ व्या वर्षी माझा विवाह झाला. यजमानांचे वय माझ्यापेक्षा २० वर्षांनी अधिक होते. असे झाल्याने माझा देवावरचा विश्‍वासच उडाला. सासरी आम्ही १५ जण होतो.

४ आ. केलेले व्यवसाय

४ आ १. बांधकाम व्यवसाय : आमचा बांधकामाचा व्यवसाय होता. यजमानांनी मला दिलेली भूमी तारण ठेवून आम्ही बांधकामाचा व्यवसाय चालू केला होता. आमच्या घराजवळील भूमी विकत घेऊन त्यावरही बांधकाम केले होते. मी कार्यालयामध्ये बसायचे.

४ आ २. बेकरी व्यवसाय : आमची बेकरी होती. तेथे आम्ही लादी पाव, बनपाव, टोस्ट इत्यादी सर्व बनवायचो. मी सकाळी ८ वाजता सर्व आवरून ‘बेकरी’ उघडायला जायचे. मी रात्री ११ वाजेपर्यंत तेथेच असायचे. मी दुपारी जेवणासाठी थोडा वेळ जात असे. आमचा ‘बेकरी’ व्यवसाय चांगला चालायचा; परंतु काही कालावधीनंतर ‘बेकरी’त पुष्कळ चोर्‍या होऊ लागल्या. आमची पुष्कळ हानी झाल्याने आम्ही ‘बेकरी’ बंद केली.

४ आ ३. दुग्ध व्यवसाय : ‘बेकरी’चा व्यवसाय बंद पडल्याने आम्ही दुधाचा व्यवसाय चालू केला. मी त्याचेही सर्व देवाण-घेवाण आणि व्यवहार  बघायचे. त्या वेळी सकाळी ६० लिटर आणि संध्याकाळी ६० लिटर दूधाची विक्री व्हायची. आम्ही १३ म्हशी पाळल्या होत्या. शेतातील गडीमाणसे दूधात पाणी घालायचे; पण यजमानांचा त्यांच्यावर विश्‍वास होता. नंतर म्हशींचा मृत्यू होऊ लागल्याने आम्हाला तोही व्यवसाय बंद करावा लागला.

४ आ ४. व्यवसायातील आर्थिक व्यवहार प्रामाणिकपणे करत असल्याने यजमानांचा विश्‍वास संपादन करणे : माहेरी आमची सधनता नव्हती. मला दोनच साड्या होत्या; पण सासरी मात्र असा प्रसंग कधीच आला नाही. यजमानांचे दुग्ध, बांधकाम आणि बेकरी असे व्यवसाय होते. बेकरी उघडण्यापासून पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुरवणे, व्यवसायांतील पैशांचा व्यवहार सांभाळणे इत्यादी सर्व मी पहात असे. प्रतिदिन पुष्कळ रक्कम येत असे. माझ्याकडे पैसे मोजून ठेवण्याचे काम असायचे; पण मी कधी लबाडी केली नाही. माझ्यावर आई-वडिलांनी चांगले संस्कार केले असल्याने पैशाचा वाईट विनियोग करण्याविषयीचा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. मी तत्त्वनिष्ठ असल्याने यजमानांनी आर्थिक व्यवहार मला सांभाळायला दिला होता. आमच्याकडे सात पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती होती. मी सातवी पास असल्याने पैशांचा ताळेबंद चोख ठेवत होते. मी घरातील सर्व आर्थिक व्यवहार बघायचे. यजमानांची पहिली पत्नी शिकलेली नसल्याने तिच्या हातात पैसे नसायचे. त्यामुळे माझा सर्व जण राग करायचे.

४ इ. रहाणीमान : माझे रहाणीमान साधे होते. यजमानांना दिखाऊपणाची आवड नसल्याने मलाही साधे रहायची सवय लागली होती.

४ ई. साधना करत नसूनही देवावर विश्‍वास निर्माण होण्यासाठी साहाय्यभूत ठरलेले काही प्रसंग : काही कारणास्तव ‘देवाने माझे चांगले केले नाही’, असे माझे मत होते; म्हणून माझा देवावर विश्‍वास नव्हता. मी देवाला मानत नव्हते. अशा घोर प्रारब्धातही देवाने ‘माझा त्याच्यावर विश्‍वास बसावा’, यासाठी काही अनुभूती दिल्या. त्या पुढे देत आहे.

४ ई १. बाळंतपणाच्या वेळी प्रवासात प्रसवकळा चालू झाल्यावर रेल्वेतील एका अनोळखी व्यक्तीने साहाय्य करणे : माझे वडील मला बाळंतपणासाठी घरी न्यायला आले होते. मी आणि वडील सोलापूरहून आगगाडीने भाग्यनगर येथे चाललो होतो. मला प्रवासातच प्रसवकळा चालू झाल्या. आमच्या डब्यात एक व्यक्ती आधुनिक वैद्य असल्याचे त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले. त्यांनी माझ्या वडिलांना ‘भाग्यनगरपर्यंत या बाई बाळंत होतील. तुम्ही सीतापूरला माझ्या घरी चला’, असे सांगितले. रेल्वेच्या डब्यात ओळख झालेल्या त्या व्यक्तीने आम्हाला त्यांच्या घरी नेले. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका परिचारिकेला बोलावून घेतले. मी बाळंत झाल्यावर त्यांनी काही दिवस मला त्यांच्या घरी राहू दिले. ‘ती व्यक्ती दुसरी कोणी नसून देवच माझ्या साहाय्याला आला होता’, असे मला जाणवले.

(तेव्हा तर मी देवाला मानतही नव्हते. ‘देवाने मला ही मोठी अनुभूती दिली’, हे मला साधनेत आल्यावर समजले. )

४ ई २. देवाने मुलीला सुबुद्धी दिल्याने सावत्र मुलाचा स्वार्थी हेतू साध्य न होणे : माझ्या सावत्र मुलाचा माझ्यावर पुष्कळ राग होता. त्याने माझ्या मुलीला विवाहासाठी एक स्थळ आणले. माझ्या मुलीला ते स्थळ पसंत नव्हते. माझे यजमानही म्हणाले, ‘‘तिला पसंत नाही, तर ‘नको’ म्हणून सांगूया’’; पण त्याचा काय स्वार्थ होता, ते देवालाच ठाऊक. तो ‘येनकेन प्रकारे हे लग्न कसे होईल ?’, यासाठीच धडपडत होता. शेवटी मुलीने स्पष्ट नकार दिला. देवाच्या कृपेने तिला चांगली बुद्धी झाली.

४ ई ३. देवाच्या कृपेने न्यायालयातील संपत्तीविषयीचा दावा जिंकणे : यजमानांनी माझ्या नावावर ६ एकर भूमी घेतली होती. ती भूमी माझ्या माहेरच्या नावावर घेतली होती. यजमानांचे निधन झाल्यावर ती भूमी मिळावी, यासाठी सावत्र मुलाने आमच्यावर न्यायालयात दावा दाखल केला; पण देवाच्या कृपेने मी दावा जिंकले आणि भूमी मला मिळाली.’

– श्रीमती सुलभा मालखरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.१२.२०१९)

(क्रमशः उद्याच्या अंकात)

पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/459737.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक