खडतर प्रारब्धावर मात करून देवावर श्रद्धा ठेवून साधना करणार्‍या देवद आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८० वर्षे) !

श्रीमती सुलभा मालखरेआजी मूळच्या संभाजीनगर येथील आहेत. विवाहानंतर त्यांना अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागले. त्या सातवीपर्यंतच शिकलेल्या असूनही त्यांनी यजमानांचे विविध व्यवसाय सांभाळले. हे कौतुकास्पद आहे. उतारवयात आश्रमात रहायला आल्यानंतर त्यांनी ३ वर्षांतच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांचा जीवनप्रवास साधकांना सर्वच दृष्टीने आदर्शवत् आहे. या लेखातील काही भाग १६ मार्च या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! त्यांची पुढील प्रगती जलद होईल, याची मला खात्री आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/459632.html
परात्पर गुरु डॉ. आठवले

५. घोर प्रारब्ध असूनही ईश्‍वराने साधनेचा मार्ग दाखवून जीवनात आनंदाचे क्षणमोती देणे

माझ्या वैवाहिक जीवनात चांगले काहीच झाले नाही. त्यामुळे मी रागाने माझी जन्मपत्रिका फाडून टाकली होती. माझ्या जीवनात इतके वाईट प्रसंग आले की, माझा भविष्यावरचा विश्‍वासच उडाला होता. एवढ्या घोर प्रारब्धातही माझ्या जीवनात काही आनंदाचेही प्रसंग घडले.

५ अ. साधना समजणे आणि साधनेला आरंभ होणे : आमच्या घरी पुष्कळ आध्यात्मिक त्रास होता. वर्ष २००३ मध्ये माझ्या नागपूर येथील बहिणीने मला साधनेविषयी माहिती दिली. तिच्या सांगण्यावरून एका साधिकेने घरी येऊन मला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याविषयी सांगितले. मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणीदार झाले. माझ्या नागपूर येथील बहिणीने मला साप्ताहिक सत्संग आणि भाववृद्धी सत्संग यांना जायला सांगितले  मी त्या सत्संगांना उपस्थित राहू लागले. संभाजीनगर येथे असतांना मी सनातनच्या मार्गदर्शनाप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधना करू लागले.

श्रीमती सुलभा मालखरेआजी

५ अ १. व्यष्टी साधना

अ. वर्ष २००३ मध्ये संभाजीनगर येथे असतांना मी आरंभी वैखरीतून सामूहिक नामजप करत होते. त्यानंतर हळूहळू ‘मनातून नामजप कसा करायचा ?’, हे शिकून घेऊन त्याप्रमाणे मनातून नामजप करू लागले.

आ. वर्ष २००३ पासून मी कुलदेवतेचा नामजप येता-जाता अखंड करण्याचा प्रयत्न करत होते आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप २ घंटे करत होते.

५ अ २. समष्टी साधना

अ. आरंभी मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्याची सेवा करत होते.

आ. मला प्रत्यक्ष अध्यात्मप्रसार करता येत नव्हता; पण मी श्रीमती मुळेकाकू यांच्या संपर्कात होते.

इ. श्रीमती मुळेकाकू आणि जोशीकाकू यांच्यासमवेत मी संभाजीनगर येथील गावागावांत जाऊन ग्रंथांचे वितरण करण्याची सेवा करायचे.

५ आ. कर्करोग झाल्यानंतर मनाने खचून जाणे, अर्पणाचे महत्त्व जाणून त्यानुसार अर्पण केल्यावर शारिरीक वेदना न्यून झाल्याचे लक्षात येणे आणि त्यानंतर मानसिक स्वास्थ्यही सुधारणे : वर्ष २००३ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी दिवाळीनंतर मला कर्करोग झाल्याचे समजले. वर्ष २००५ मध्ये श्रीमती चव्हाण आणि श्रीमती मुळेकाकू आमच्या घरी आल्या होत्या. मला नुकताच कर्करोग होऊन गेल्याने ‘मी आता काही जगत नाही’, या विचारांमुळे मी अस्वस्थ झाले होते. त्या साधिकांनी मला अर्पणाचे महत्त्व सांगितले. त्या वेळी देवाने माझ्याकडून अर्पण करून घेतले. त्यानंतर माझ्या शारीरिक वेदना न्यून झाल्याचे माझ्या लक्षात आले. माझे मानसिक स्वास्थ्यही सुधारले. माझी साधनाही चांगली चालू झाली.

५ इ. सनातनच्या आश्रमांना भेट देण्याची इच्छा पूर्ण होणे

५ इ १. आश्रम दर्शनासाठी येण्याचा निरोप मिळाल्यावर भावजागृती होऊन डोळ्यांतून घळघळा अश्रू येऊ लागणे : ‘मला आश्रमांचे दर्शन घडावे’, असे मनातून पुष्कळ वाटत होते. होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना मी हा विचार बोलून दाखवला. त्यांनी माझे आश्रमात जाण्याचे नियोजन केले. ‘आश्रम दर्शनासाठी येऊ शकता’, असा निरोप मिळाल्यावर माझी भावजागृती होऊन डोळ्यांतून घळघळा अश्रू येऊ लागले.

५ ई. आश्रमात झालेल्या एका चुकीसाठी खंत वाटणे; पण ‘आश्रमातून घरी जाऊ नये’, असे वाटणे : वर्ष २००६ च्या डिसेंबरमध्ये मी देवद येथील आश्रमात १५ दिवस वास्तव्याला होते. एकदा आश्रमातील एका साधिकेने ‘आजी, तुमचे कपडे धुवायचे असतील, तर माझ्याकडे द्या’, असे मला सांगितले. त्या वेळी मी त्यांना म्हणाले, ‘‘नको. मी ते धुलाईयंत्रात धुवीन.’’ मी आश्रमातील पहिल्या माळ्यावरील धुलाईयंत्रात कपडे धुण्यासाठी घातले आणि मला फार वेळ उभे रहाता येईना; म्हणून त्या माळ्यावरील एका खोलीतील पलंगावर जाऊन पहुडले. त्या वेळी ती खोली आणि तो पलंग एका संतांचा असल्याचे मला ठाऊक नव्हते.

काही वेळाने एक साधिका तेथे आली आणि मला म्हणाली, ‘‘आजी, तुम्हाला येथे झोपायला कुणी सांगितले आहे का ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘नाही. मी माझ्या मनानेच येथे थोडा वेळ विश्रांतीसाठी पहुडले आहे.’’ तेव्हा तिने ‘ही खोली आणि पलंग एका संतांचा असल्याने उत्तरदायी साधकाला विचारल्याविना येथे येण्याची अनुमती कुणालाही नाही’, असे सांगितले. तेव्हा मला ‘माझ्याकडून ही गंभीर चूक झाल्याचे लक्षात आले.’ मी होमिओपथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना माझ्याकडून झालेल्या चुकीविषयी सांगितले आणि मला पुष्कळ रडू आले. तेव्हा कु. आरतीने मला ‘आजी, काही काळजी करू नका’, असे सांगितले. त्यानंतर मला थोडे शांत वाटले.

मी देवद, मिरज आणि गोवा येथील आश्रमांचे दर्शन घेतले. सनातनच्या आश्रमांमध्ये आल्यावर ‘येथून घरी जाऊ नये’, असेच मला वाटत होते.

५ उ. मुलीच्या निधनानंतर नातीजवळ रहायला जाणे, त्यानंतर स्वतःच्या घरी पुन्हा कधीही न जाणे : वर्ष २००७ मध्ये माझी एकुलती एक मुलगी (वय ४५ वर्षे) आणि मोठी नात (वय २२ वर्षे) यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर काही मासांनी माझ्या यजमानांचे निधन झाले. यजमानांच्या निधनानंतर मला घरच्यांनी पैशांसाठी त्रास दिला. मुलीच्या निधनानंतर मी माझ्या जावयांकडे नातीसह रहायला गेले. मी साहित्य आणायला संभाजीनगर येथील घरी गेल्यावर मला माझे काही अलंकार गहाळ झाल्याचे लक्षात आले. आरंभीपासून माझ्या यजमानांचा साधना करायला विरोध होता. त्यांचा विरोध शेवटपर्यंत मावळला नाही. कुटुंबियांपैकी साधनेत कुणीच नाही. त्यामुळे त्यानंतर मी त्या घरी पुन्हा कधीही गेले नाही.

५ ऊ. सनातन संकुलात घर विकत घेता आल्याने आश्रमात राहण्याची इच्छा पूर्ण होणे : ‘देवद येथील आश्रमाजवळ वास्तव्याला जावे आणि थोडीफार सेवा, साधना करावी’, अशी माझी आंतरिक इच्छा होती. वर्ष २००८ मध्ये मला देवद येथील ‘सनातन संकुला’त घर विकत घेता आल्याने गुरुकृपेने ती इच्छा पूर्ण झाली. साधकांनी काही वर्षे या वास्तूचा उपयोग सेवेसाठीही केला. मी वयाच्या ७१ व्या वर्षी सनातन संकुलात रहायला आले.

औरंगाबाद येथील साधिका श्रीमती मुळेकाकू यांची सांगली येथील बहीण श्रीमती यशश्री हेंद्रे या ज्योतिषी विद्या जाणतात. त्यांनी माझी जन्मपत्रिका पाहून मला ‘तुम्हाला देवळात मरण येईल’, असे सांगितले होते.

५ ए. परात्पर गुरुदेवांना भेटण्याची इच्छा पूर्ण होणे आणि त्यांनी भावजागृतीसाठी प्रयत्न करण्यास सांगणे : मी रामनाथी आश्रमात गेल्यावर माझी परात्पर गुरुदेवांना ‘तुमचे मला दर्शन घडू दे’, अशी सातत्याने प्रार्थना होत होती. त्या वेळी आम्हाला परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले. त्या वेळी मी त्यांना विचारले, ‘‘मला भाव म्हणजे काय ?’, ते कळत नाही. मी काय करू ?’’ तेव्हा त्यांनी मला सनातनचे ग्रंथ वाचायला सांगितले. तेव्हापासून मी ग्रंथांचे वाचन करू लागले, तरीही काही कालावधीपर्यंत मला ‘भाव म्हणजे नेमके काय ?’, ते कळत नव्हते.

५ ऐ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् भावजागृती यांसाठी केलेले प्रयत्न

५ ऐ १. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न

अ. वर्ष २००३ मध्ये साधनेला आरंभ केल्यावर २ – ३ मासांनी मी घरात पाय घसरून पडले. त्या वेळी माझ्या उजव्या पायाची करंगळी मुरगळल्याने माझा पाय पुष्कळ सुजला होता. तेव्हा आधुनिक वैद्यांनी क्ष-किरणांद्वारे (एक्स-रे) माझी चाचणी केली. माझ्या पायाला जवळजवळ पाऊण मास ‘प्लॅस्टर’ होते. त्यानंतर काही मासांत (साधनेत आल्यानंतर ६ मासांत) मला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. केवळ गुरूंच्या कृपेमुळेच ‘कर्करोगा’सारखी व्याधी झालेली असतांनाही मी शांत आणि स्थिर राहू शकले.

आ. मी आश्रमात रहायला आल्यावर माझा पुष्कळ संघर्ष होत असे. मी उतारवयात आश्रमात रहायला आल्याने मला असलेल्या पूर्वीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी मोडणे पुष्कळ अवघड जात होते. त्या वेळी माझा थोडाफार संघर्षही होत होता. मी प्रयत्नपूर्वक आश्रमाचे रहाणीमान स्वीकारून आवडी-निवडींना मुरड घातली. साधक ‘आजी, तुमच्यामध्ये पुष्कळ चांगला पालट झाला आहे’, असे सांगतात.

इ. मी आश्रमात आल्यावर संतांनी मला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याविषयी सांगितले. त्यानंतर माझ्या समवेत वास्तव्याला असलेल्या सौ. पडवळकाकूंच्या साहाय्याने मी काही स्वभावदोषांवर स्वयंसूचना सिद्ध करून घेतल्या. मी काही दिवस मनाला स्वयंसूचना दिल्या. मी अशा प्रकारे काही कालावधीसाठी प्रयत्न करत असतांना अन्य दोन साधिकांचेही साहाय्य घेतले होते. मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करायला सांगितल्यानंतर माझ्याकडून त्याप्रमाणे काही मास प्रयत्न झाले.

५ ऐ २. भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न

अ. एकदा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला ‘तुम्ही व्यष्टी साधनेचा आढावा कुणाला देता ?’, असे विचारले. त्या वेळी माझ्या मनात ‘मी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया राबवत नसल्याने मी काय आढावा देणार ?’, असा विचार येऊन ‘मी कुणालाही आढावा देत नाही’, असे त्यांना सांगितले. त्यानंतर सद्गुरु राजेंद्रदादांच्या मार्गदर्शनानुसार मी परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन करायला आरंभ केला, तसेच शरणागतभावाने आणि अपराधीभावाने प्रार्थना करणे चालू केले. मी श्रीकृष्णाची मानसपूजाही करत होते.

आ. ‘सनातन संकुल’ येथे वास्तव्यास असतांना तेथे घरकामासाठी येणार्‍या मुलीला मी साधना म्हणून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगत असे. त्या वेळी ‘तिने साधना करून पुढे जावे’, असे मला वाटत होते. (सध्या ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे.)

इ. वर्ष २०१२ मध्ये ‘सनातन संकुला’त वास्तव्याला आल्यावर मी साधकांना ‘शारीरिक त्रासांवर गुरुकृपेने कशी मात करता येते ? श्रद्धेच्या बळावर आपण साधना कशी करू शकतो ?’, याविषयी स्वानुभवातून सांगत असे.

६. आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होणे

वर्ष २०१४ मध्ये मी देवावरील श्रद्धेच्या बळावर तीव्र प्रारब्धावर मात करू शकल्याने माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाले. परात्पर गुरुदेवांनी माझ्यासाठी श्रीकृष्णाचे चित्र आणि प्रसाद पाठवला होता. त्या वेळी ‘मला कर्करोग झाला होता’, हे साधकांना सांगितल्यावर त्यांना खरेच वाटत नव्हते. माझ्याकडे पाहून ते म्हणत, ‘‘आजी, तुम्ही या वयात कर्करोगासारख्या व्याधीशी कशा काय लढू शकलात ?’’ तेव्हा ‘परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मी या व्याधीतून वाचले आणि येथपर्यंत साधना प्रवास करू शकले’, असे मी त्यांना सांगत असे.

७. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव

अ. ‘मला तीव्र शारीरिक आणि मानसिक आघातांवर मात करण्याचे बळ केवळ परात्पर गुरुमाऊलींनी दिले. अन्यथा त्या वेळी मी मनोरुग्ण झाले असते’, असे मला वाटते. त्यामुळे माझा गुरुमाऊलींप्रती कृतज्ञताभाव वृद्धींगत होत गेला.

आ. ‘मी सेवा आणि साधना काहीच करत नाही. तेव्हा या जन्मात तरी माझी आध्यात्मिक उन्नती होणार नाही. माझा पुढचा जन्म एखाद्या साधक दांपत्याच्या पोटी होईल आणि त्यानंतर कदाचित् माझी साधना चालू होईल. त्यानंतर माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांच्या पुढे होईल आणि त्यानुसार पुढे प्रगती होईल’, असे विचार माझ्या मनात येत असत. एकदा मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना माझ्या मनात येणार्‍या या विचारांविषयी सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आजी, तुम्ही तुमचे तीव्र प्रारब्धभोग भोगून संपवले असल्यानेच तुमची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे.’’ सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितलेले हे विचार माझ्या अंतर्मनातपर्यंत पोचले आणि त्यानंतर मला समाधान वाटले. ‘मी माझ्या तीव्र प्रारब्धावर परात्पर गुरुदेवांमुळे मात करून साधनेत प्रगती करू शकले असे नाही, तर गुरुदेवांनीच मला माझे प्रारब्धभोग भोगण्यास साहाय्य केले आणि माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के करवूनही घेतली’, असे मला त्या वेळी वाटले.

इ. माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यानंतर एकदा ‘परात्पर गुरुदेव मला सोडणार तर नाहीत ना ?’, असा विचारही माझ्या मनात येऊन गेला.  मी सौ. मनीषा गाडगीळ यांच्याशी याविषयी बोलले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही त्याचा विचार करू नका. परात्पर गुरुदेवांना सर्व काही ठाऊक असते. तेच आपली आध्यात्मिक उन्नती करवून घेत असतात.’’ तेव्हापासून मी माझा सर्व भार परात्पर गुरुदेवांवर सोपवून निश्‍चिंत झाले.

८. साधनेत आल्यानंतर आलेल्या अनुभूती

८ अ. श्रीकृष्णाशी संबंधित अनुभूती

१. मी डोळे बंद करून नामजप करत असतांना मला डोळ्यांसमोर श्रीकृष्णाचे चित्र दिसते.

२. अलीकडे नामजप करतांना मला ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र माझ्याभोवती फिरत आहे’, असे दिसते.

८ आ. अन्य देवतांशी संबंधित अनुभूती

१. मला माझ्या सभोवती देवतांचे अस्तित्व जाणवते.

२. मला कधी कधी श्रीकृष्ण आणि श्री गणपति यांचे दर्शन होते.

८ इ. परात्पर गुरुदेवांशी संबंधित अनुभूती

१. मला परात्पर गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन होते.

२. मला स्वप्नात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होते. मी कधी कधी नीट न्याहाळून पहायचा प्रयत्न केल्यास ते अदृश्य होतात.

८ ई. अन्य अनुभूती

१. काही वेळा मला मंदिरेही दिसतात. मी ‘कोणते मंदिर आहे ?’, हे पहाण्याचा प्रयत्न केला असता ते डोळ्यांसमोरून निघून जाते.

९. संतांनी काढलेले उद्गार

अ. वर्ष २०१४ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. त्या वेळी पू. (सौ.) अश्‍विनी पवार मला म्हणाल्या, ‘‘आजी, तुमच्या पूर्णवेळ साधनेला आता आरंभ झाला आहे.’’

आ. एकदा मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आजी, आता तुम्ही मायेतून खर्‍या अर्थाने सुटलात.’’

– श्रीमती सुलभा मालखरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.१२.२०१९)

(समाप्त)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक