‘कोरोना महामारी चालू झाल्यानंतर अनेक राष्ट्रीय, तसेच बहुराष्ट्रीय (एकापेक्षा अधिक देशांत शाखा असणारे आस्थापन) आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात् त्यांच्या घरून सेवा करण्याचे आदेश दिले. कोरोना महामारीची स्थिती पहाता अनेक आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा कालावधी वाढवला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’च्या नियमांनुसार घरून काम करतांना या कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे.
१. घरून काम करत असल्याने कर्मचार्यांना अधिक वेळ काम करावे लागणे
दळणवळण बंदी लागू होण्यापूर्वी बहुराष्ट्रीय आस्थापनांतील कर्मचार्यांना सर्वसाधारणपणे ९ घंटे काम करावे लागायचे. दळणवळण बंदी चालू झाल्यावर ‘वर्क फ्रॉम होम’ व्यवस्था लागू झाल्यानंतर काम करण्यास समयमर्यादा राहिली नाही. त्यामुळे या कर्मचार्यांना १२ ते १३ घंटे किंवा त्याहूनही अधिक वेळही काम करावे लागते. ‘सध्या घरूनच काम करत असल्याने तुम्हाला वेगळ्या सुट्टीची आवश्यकता नाही’ असे सांगत त्याच्याकडून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही काम करवून घेतले जाते. काही आस्थापनांनी घरून काम करणार्या कर्मचार्यांना रात्रपाळी करणेही सक्तीचे केले आहे. या कर्मचार्यांच्या बैठका दिवस-दिवस चालू रहातात, दोन बैठकांतील अंतरही अत्यंत अल्प असल्याने त्यांना वैयक्तिक वेळ मिळणेही कठीण झाले आहे. एकूणच ‘वर्क फ्रॉम होम’ करतांना या कर्मचार्यांनी त्यांचा वैयक्तिक वेळच गमावला आहे.
२. कर्मचारी कपात केल्यामुळे कामाचे घंटे वाढणे
कोरोना काळातील दळणवळण बंदीनंतर अनेक आस्थापनांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली. जे कर्मचारी नियमित नोकरीत आहेत, त्यांच्याही मनात ‘आपल्यालाही नोकरीवरून काढतील का ?’, अशी भीती निर्माण झाली. आस्थापनांच्या खर्चात कपात करण्यासाठी (कॉस्ट कटिंग) अनेक कर्मचार्यांना काढल्याने उर्वरित कर्मचारी अधिक काम करण्यासाठी बांधील आहेत. त्यामुळे त्यांचे कामाचे घंटे वाढले असून वेतन मात्र न्यून झाले आहे.
३. अनिश्चिततेमुळे मानसिक ताणात वाढ होणे
घरून काम करत असतांना या कर्मचार्यांचा शारीरिक ताण वाढला आहे. अनेकांना पाठदुखीचे त्रास चालू झाले आहेत. काही जणांचे वजन, स्थूलपणा वाढल्याने अन्य शारीरिक व्याधीही निर्माण झाल्या आहेत. याखेरीज बाहेर जी अनिश्चितता निर्माण झाली आहे, त्यामुळे कर्मचार्यांचा मानसिक ताणही वाढला आहे. काही आस्थापने ‘वर्क फ्रॉम होम’च्या पारदर्शकतेविषयी साशंक असल्याने त्याचाही ताण या कर्मचार्यांवर आहे. आतापर्यंत या कर्मचार्यांची वेतनवाढ वा नोकरीतील नियमितता यात कोणताही खंड नव्हता; पण ‘येथून पुढील काळात सर्व परिस्थिती ठीक असेलच’, याची शाश्वती नाही. आस्थापनेही ‘नोकरी टिकली आहे, हेच पुष्कळ समजा’, अशी सातत्याने जाणीव करून देत असल्याने हे कर्मचारी अनिश्चिततेच्या दबावाखाली आहेत. आस्थापनांनी कर्मचार्यांना गृहीत धरले असून दिलेले काम कर्मचार्यांनी सांगितलेल्या वेळेत कसेही पूर्ण करून द्यावे, या अपेक्षाही या कर्मचार्यांच्या ताणांत भर घालत आहेत.
४. वेतन कपात झाल्यामुळे आर्थिक ताण वाढणे
दळणवळण बंदीच्या काळात अनेक आस्थापनांची उलाढाल न्यून झाली. त्यामुळे कर्मचार्यांची वेतन कपात चालू झाली आणि त्यामुळे कर्मचार्यांचे आर्थिक गणित कोलमडले. अनेक आस्थापनांनी जागतिक मंदी आणि आर्थिक संकट यांचे कारण पुढे करत वेतन, भत्ते यांत मोठी कपात केली आहे. काही जणांनी आपली वार्षिक वेतनवाढ गृहीत धरून ज्या खर्चांचे नियोजन केले होते, त्या सर्व गोष्टींचा आर्थिक ताण वाढला. उदा. घरभाडे, घर अथवा वाहन घेण्यासाठी घेतलेले ऋण (कर्ज), आर्थिक किंवा आरोग्य विमा इत्यादींसह कुटुंबाचा मासिक खर्च या सर्वांवर याचा व्यस्त परिणाम झाला. या काळात बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे घाबरून जाऊन काही जणांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
५. आस्थापनांनी अधिक प्रमाणात तज्ञ कर्मचारी आहेत, असे खोटे सांगून प्रकल्प मिळवणे
बहुराष्ट्रीय आस्थापनांचे ग्राहक हे अन्य देशांतील असतात. अनेक आस्थापने प्रकल्प मिळवण्यासाठी त्यांच्याकडे तज्ञ कर्मचार्यांची संख्या अधिक असल्याचे खोटेच दाखवतात. प्रत्यक्षात मात्र तज्ञ कर्मचार्यांची संख्या न्यून असते आणि अनुभवी नसलेल्या कर्मचार्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे तज्ञ आणि अनुभवी कर्मचार्यांना अधिक काम करावे लागते.
एकूणच राष्ट्रीय अथवा बहुराष्ट्रीय आस्थापने ‘वर्क फ्रॉम होम’च्या आडून कर्मचार्यांची काळजी घेत असल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात मात्र ही आस्थापने आपल्या कर्मचार्यांच्या आर्थिक, मानसिक आणि वैयक्तिक अडचणींचा विचार करत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ‘या आस्थापनांनी कर्मचार्यांना मानसिक आधार देणे, त्यांचा उत्साह टिकेल, ऊर्जा मिळेल, यासाठी प्रयत्न केले, तरच ही आस्थापने खर्या अर्थाने त्यांचे दायित्व पूर्ण करत आहेत’, असे म्हणता येईल.’
– अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०२०)