स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होणे अन् सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे मनाचा सखोल अभ्यास करता येऊन संघर्षावर मात करू शकणे
१. ध्यानमंदिरातील गुरुपादुका ठेवलेल्या पेटीतील दिवा बंद असल्याचे पाहून साधिकेविषयी राग येऊन तीव्र अपेक्षा होणे आणि क्षुल्लक गोष्टींवरून राग येऊन स्वतःची चूक असूनही इतरांना दोष देत असल्याची जाणीव होणे
‘१०.१.२०२० या रात्री ११ वाजून ७ मिनिटांनी मी ध्यानमंदिरातील गुरुपादुका ठेवलेल्या पेटीतील दिवा बंद करायला गेले. तेव्हा मला कुणीतरी दिवा बंद केल्याचे दिसले. (ध्यानमंदिरातील गुरुपादुका असलेल्या पेटीतील दिवा प्रतिदिन रात्री ११ वाजता बंद करण्याची सेवा माझ्याकडे असते.) मी श्री. अजय प्रजापती यांना सांगितले, ‘‘दिवा बंद आहे.’’ ते म्हणाले, ‘‘एका साधिकेने दिवा बंद केला आहे.’’ तेव्हा ‘त्यांनी दिवा बंद का केला ?’, असा मनात विचार येऊन मला राग आला. माझ्या मनात प्रतिक्रिया येऊन ‘मीच कशी योग्य आहे’, असे विचार चालू झाले. ‘त्यांनी दिवा बंद का केला ? मी येणारच होते ना ? दिवा बंद करणार होते ना ? उद्या मी त्यांना विचारीन. आज मी ध्यानमंदिरात नव्हते, खोलीत होते; म्हणून मला यायला ५ मिनिटे विलंब झाला, तर काय झाले ?’, असे विचार येऊन माझ्यातील ‘सवलत घेणे’ या स्वभावदोषाचीही मला जाणीव झाली.
२. लहानशा प्रसंगात मनात उफाळून आलेल्या विचारांमधून स्वभावदोषांची तीव्रता लक्षात येणे, साधिकेतील ‘तत्परता’ या गुणातून शिकायची जाणीव होणे आणि शिकण्याच्या स्थितीत राहिल्यास सकारात्मक विचार करता येऊन मनाचा संघर्ष अल्प होणार असल्याचे वाटणे
‘दिवा बंद केल्याचे मला भ्रमणभाष करून सांगायला पाहिजे होते. मग मी खोलीतून खाली आले तरी नसते’, असा विचार आल्यावर मला माझ्यातील ‘अपेक्षा करणे’, या अहंच्या पैलूची जाणीव झाली. ‘क्षुल्लक गोष्टींवरून मला किती राग आला होता’, याचीही मला जाणीव झाली. माझ्या मनात किती प्रश्न आले. खरेतर चूक माझीच होती. मी वेळेत न गेल्याने त्यांनी दिवा बंद केला. येथे माझा स्वतःचाच स्वभावदोष आड आला; पण मी इतरांना दोष देत होते. ‘माझी चूक झाल्यास माझे मन लगेच इतरांना दोष देते, त्यांची चूक पहाते’, याची मला जाणीव झाली.
त्यांनी तर वेळेचे पालन करून योग्य कृती केली होती. वेळेवर दिवा बंद केला. त्यांच्यात ‘तत्परता’ हा गुण आहे. इतरांच्या गुणातून मला शिकायचे आहे. त्यांना शिकवायचे नाही. ‘मी येत नाही असे पाहून त्यांनी दिवा बंद केला’, याची मला जाणीव झाली. मीच माझे दायित्व पार पाडण्यास गेले नाही. मी वेळेवर जायला पाहिजे होते. ‘मी गेले नाही’, हा माझा दोष आहे. मी इतरांना अशा प्रकारे दोष द्यायला नको. ‘आपण जर शिकण्याच्या भूमिकेत असू, तर आपण शिकणार आहोत’, असा माझा सकारात्मक विचार झाला. ‘प्रत्येक प्रसंगात सकारात्मक विचार केला, तरच आपल्या मनाचा संघर्ष अल्प होणार’, हे माझ्या लक्षात आले.
३. जवळीक असलेल्या साधकाने साहाय्य केल्यावर त्याचा राग न येता, त्याने काळजी घेतल्याची जाणीव होणे, अन्य साधकांकडून तशी कृती झाल्यास जवळीकता नसल्याने राग अनावर होणे आणि यातून स्वतःचे मन ओळखायला बरीच वर्षे लागल्याची जाणीव होणे
११.१.२०२० या रात्री मी खोलीतून १०.५५ वाजता गुरुपादुका पेटीतील दिवा बंद करण्यासाठी गेले होते. दिवा आधीच बंद केलेला होता. तेव्हा ‘दिवा आजही कुणी बंद केला ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा मला राग आला नाही. त्या वेळी माझ्या ‘मनात प्रतिक्रिया येतील’, असे मला वाटले; पण प्रतिक्रिया येण्याआधीच मनातून प्रसंग स्वीकारला गेला; कारण ‘हा प्रसंग पुढेही घडेल’, असे वाटून मी शांत राहिले. त्या वेळी मला प्रतिक्रिया आली नाही; परंतु ‘दिवा बंद कुणी केला ?’, हे मला समजले पाहिजे’, अशी अपेक्षा मात्र झाली. त्यानंतर ‘दिवा कुणी बंद केला ?’, असे मी श्री. अजय प्रजापती यांना विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी केला.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘ठीक आहे.’’ मला उत्तर मिळाले; पण मला त्यांचा राग आला नाही. मनातील प्रसंग निघून गेला. अजयदादा म्हणाले, ‘‘दिवा मीच बंद केला.’’ त्या वेळी मला त्यांचा राग आला नाही; मात्र साधिकेने दिवा बंद केल्यावर मला राग आला होता. प्रसंग तर एकच होता.
याचे कारण असे होते, ‘जेव्हा मी दिवा बंद करण्यास जाते, तेव्हा अजयदादा ‘स्वीचबोर्ड’जवळ असल्याने ते दिवा बंद करतात; कारण ‘मी दिवा बंद करायला आले आहे’, हे त्यांना ठाऊक असते. मी दिवा बंद करण्यासाठी खाली येत असतांना ते त्यांच्या सेवेच्या ठिकाणी जात असल्यास ते मला विचारतात, ‘‘दिवा बंद करायचा आहे का ?’’ मी ‘हो’ म्हणाल्यावर ते ‘मी बंद करतो’, असेही म्हणतात आणि मला साहाय्य करतात. त्यामुळे त्यांच्याशी माझी जवळीक झाली आहे; म्हणून अजयदादांनी दिवा बंद केल्यावर मला राग येत नाही. ‘माझी कुणी काळजी केली, माझ्याशी मैत्री केली किंवा मला साहाय्य केले, तर मला राग येत नाही’, हे माझ्या लक्षात आले. आपल्या समवेत एखादा साधक सेवा करत असल्यास त्यांची प्रकृती लक्षात येते, तसेच त्याचे स्वभावदोष लक्षात येतात. मला माझे मन ओळखायला पुष्कळ वर्षे लागली.
४. सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मी हा प्रसंग वाचून दाखवला. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘तुम्ही मनाचा अभ्यास चांगला केला आहे.’’
– कु. महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.३.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |