प्रगती कि अधोगती ?

आज वाढत चाललेल्या आत्महत्या ही जगासाठी डोकेदुखी किंबहुना धोक्याची घंटा असल्याचे सिद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ‘जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. वर्षाकाठी अनुमाने ८ लाख लोक आत्महत्या करतात.’ अर्थात् तिच्या संकेतस्थळावरील ही आकडेवारी वर्ष २०१६ पर्यंतचीच असली, तरी ‘गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत चालले आहे’, असेही संघटनेचे म्हणणे आहे. ‘ब्रिटीश मेडिकल जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार आत्महत्यांमागे सामाजिक-सांपत्तिक स्थिती आणि मानसिक स्वास्थ्य ही कारणे महत्त्वाची भूमिका निभावतात. जर्नलचे म्हणणे आहे की, ज्या देशांमध्ये लोकांच्या नोकर्‍या मोठ्या प्रमाणात गेल्या, त्या देशांमध्ये आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. जर्नलने हेसुद्धा स्पष्ट केले की, कोरोना महामारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण कितपत वाढले, हे जागतिक स्तरावर आता सांगणे शक्य होणार नाही; परंतु वर्ष २००८ मधील जागतिक आर्थिक मंदीनंतर आणि कोरोना महामारीमुळे किमान ३६ देशांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढले. यांपैकी एक देश म्हणजे जपान !

एकटेपणाचे मंत्री !

जपानसारख्या प्रगत देशासाठी आत्महत्या ही मोठी डोकेदुखी बनली आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी या संकटाच्या निवारणार्थ ‘एकटेपणाचे मंत्री’ असे एक पद सिद्ध केले असून एका खासदाराला हे दायित्व दिले आहे. एवढेच नव्हे, तर गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता, तेव्हा जपानने आत्महत्या रोखण्यासाठी एका कार्यालयाची स्थापनाही केली होती. वर्ष २०१८ मध्ये ब्रिटननेही अशाच प्रकारचे एक नवीन पद सिद्ध केले. तसेच मानसिक स्वास्थ्य, आत्महत्या रोखणे आणि रुग्ण सुरक्षा यांच्यासाठीही त्यांनी एका मंत्र्याची नियुक्ती केली.

‘पर्सिवरन्स रोवर’ हे यश ?

प्रगत देशांची ही कथा, तर गरीब देशांची काय व्यथा असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. याचेच विरुद्ध टोक म्हणजे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘पर्सिवरन्स रोवर’ने मंगळ ग्रहावर यशस्वी पाय रोवले. तेथून ते मंगळ ग्रहाच्या विविध नैसर्गिक पैलूंचे संशोधन करणार असून हे संशोधन पुढील काही दशकांसाठी मैलाचा दगड सिद्ध होणार आहे. परिणामी ‘भावी पिढ्यांना त्याचा पुष्कळ लाभ होईल’, असे नासाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. अर्थात् येथे गंमत अशी आहे की, माणसाने चिकाटी ठेवून मंगळ ग्रहापर्यंत मजल तर मारली; परंतु तोच माणूस आपल्या व्यक्तीगत जीवनातील कठीण प्रसंगांना चिकाटीने सामोरे जाण्यास कचरतो, हतबल होतो, परिस्थितीपुढे सपशेल हात टेकतो आणि नैराश्यात जातो अथवा पुढे आत्महत्याही करतो. त्यामुळे ‘पर्सिवरन्स रोवर’च्या यशाला मानवाचे खरे यश म्हणता येईल का ?, हाच मोठा प्रश्‍न आहे.

प्रगतीचे मूल्यमापन !

त्यामुळे मानवी प्रगतीचे मूल्यमापन नेमके कशा प्रकारे करावे, हे मानवाला समजले आहे का, हे विचारात घेण्यायोग्य सूत्र आहे. ते नेमकेपणाने विचारात न घेतले गेल्यानेच मोठी गफलत झालेली दिसते. मानवाची प्रगती म्हणजे भौतिक विकास एवढ्यापर्यंतच सीमित आहे का ? जर तसे असते, तर मानवाला भेडसावणार्‍या सर्व समस्यांवर त्याला उपाय मिळाला असता. त्या मानवाने हे स्वीकारायला हवे की, विज्ञानाला स्वत:च्या मर्यादा आहेत. वस्तुत: पाहिले, तर मानवाच्या अनेक समस्यांचे उत्तर विज्ञानाकडे नव्हे, तर अध्यात्मच मानवाला त्याचे प्रभावी उत्तर देण्यास समर्थ आहे. मानवाच्या जीवनात एखादी घटना का घडते, तिच्याकडे पहाण्याचा मानवाचा दृष्टीकोन कसा असावा, त्या घटनेमागील कारणमीमांसा, तसेच त्या घटनेपासून आपले मन विलग कसे ठेवू शकतो, आपल्या मनाला एका वेगळ्याच उच्च अशा स्थितीत कसे पोचवू शकतो आणि परिस्थितीला पालटण्याचे सामर्थ्य जरी नसले, तरी त्यास धीटपणे सामोरे कसे जाऊ शकतो, हे अध्यात्माद्वारे मानवाला समजू शकते.

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्याने माणूस यशस्वी होऊ शकतो, हे अनेक वेळा म्हटलेही जाते. याचे सध्याचे एक मोठे उदाहरण म्हणजे बेंगळुरू येथील जगप्रसिद्ध ‘नारायण हेल्थ ग्रूप ऑफ हॉस्पिटल्स’ ! ७८ देशांमध्ये सेवा पुरवणार्‍या या गटाचे संस्थापक आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. देवी शेट्टी यांनी त्यांचे मत मांडतांना म्हटले की, केवळ भगवंताच्या कृपेने मी केलेली हृदयाची अत्यंत जटिल शस्त्रकर्मे यशस्वी झाली आहेत. डॉ. शेट्टी हे अत्यंत धार्मिक आणि श्रद्धावान व्यक्ती असून शस्त्रकर्माची यशस्वीता ते संपूर्णपणे भगवंतावर सोपवतात. त्यांच्या चिकित्सालयांतील अन्य आधुनिक वैद्यही भगवंताला मानणारे आहेत. ‘त्यांच्या या श्रद्धेमुळेच भगवंत त्यांच्या साहाय्यास येतो’, असे आमच्यासारख्या श्रद्धावानांना वाटते. ही श्रद्धाच मानवाला तारते.

समतोल विकास !

श्रद्धा म्हणजे तरी काय ? तर, सत्याला धारण करण्याची क्षमता म्हणजे श्रद्धा ! ही श्रद्धा मानवाला विज्ञानाची कास धरून नव्हे, तर अध्यात्म अंगीकारल्यानेच मिळू शकते आणि त्यामुळेच मानवाने साधना करणे आवश्यक आहे. त्याने कोणत्याही कठीण प्रसंगाला तो सहज सामोरे जाऊ शकतो. पुढे येऊ घातलेल्या घनघोर आपत्काळाचा विचार करता अध्यात्म अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे, हे जोरकसपणे सांगावेसे वाटते. येत्या काही वर्षांमध्ये कोरोनासारखे भयावह आजारांचे प्रमाण वाढू शकते, असे त्रिकालज्ञानी संत आणि ज्योतिषी यांनी सांगितले आहे. त्या काळाला समर्थपणे तोंड देण्यासाठी प्रत्येक मानवाने साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे, तर केवळ भौतिक विकास नाही, तर आत्मिक विकास साध्य करणे, अर्थात् विकासात समतोल ठेवूनच मानव यशस्वी आणि समाधानी जीवन जगू शकेल. आत्मिक विकासाकडे दुर्लक्ष केल्यास ती मानवाची प्रगती नव्हे, तर अधोगतीच ठरेल आणि त्याच्या विनाशास कारणीभूत होईल !