नकारात्मक विचार करणार्या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/449594.html
६. सकारात्मक विचार केल्याने होणारे लाभ
६ अ. जीवन आनंदाने जगता येणे : हे जग किती सुंदर आहे ! सृष्टीतील प्रत्येक वस्तूत वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये निर्माण करून त्यांच्या सहवासात रहाण्याची देवाने आपल्याला संधी दिली आहे. मानवाचा अपवाद वगळता सर्व सजीव-निर्जीव वस्तू, प्राणी आणि वनस्पती त्यांचे जीवन कोणत्याही प्रकारचे दुःख व्यक्त न करता आनंदाने उपभोगत असतात, तसेच प्रारब्धानुसार कृती करत असतात. मग मानवानेच या नियमाला का अपवाद असावे ? देवाने ही सृष्टी माझ्या भल्यासाठीच निर्माण केली आहे, असा सकारात्मक विचार केल्यास त्यालाही जीवन आनंदाने जगता येईल.
६ आ. मी स्वतः निराश होणार नाही. दुसर्याला निराश करणार नाही आणि नकारात्मक विचार करणार नाही, असा निश्चय करून कृती केल्यास समवेत असणार्यांनाही निराश होण्याची वेळ येणार नाही.
६ इ. इतरांना साहाय्य करता येऊन त्यांच्याशी अधिक जवळीक साधली जाईल.
६ ई. सकारात्मकतेमुळे कुटुंबामध्ये आनंदी वातावरण निर्माण होऊन सर्वांची मने एकमेकांशी जोडली जातील. एकमेकांशी असलेला देवाण-घेवाण हिशोब फेडतांना जीवनाचा खरा आनंद लुटता येईल.
६ उ. जगातील प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पहाता येणे : मनाची जशी धारणा असते, तसे विचार मनात येतात आणि त्या विचारांनुसार कृती घडते. आपल्या मनात सकारात्मक विचार असतील, तर आपल्याला जगातील प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पहाता येईल. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता येईल.
६ ऊ. प्रारब्ध आनंदाने भोगता येणे : प्रारब्धानुसार आपण भोग भोगत असतो. तेव्हा दुःखाच्या वेळी माझ्या कर्माचे फळ, म्हणजेच दुःख भोगून संपवत आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास ते प्रारब्ध भोगणे सुखावह होते. त्या वेळी उद्विग्नता न येता ते भोगतांनाही आनंदी रहाण्याचा प्रयत्न होतो.
७. मनाच्या सकारात्मक धारणेचा लाभ कसा होतो ?, हे सांगणारी एक कथा
सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एका योगी वैद्यांनी गुडघेदुखीचा त्रास असणार्या १० सहकार्यांना निवडले. त्या वैद्यांनी त्यांना सैन्यदलाच्या शस्त्रकर्मगृहात गुडघ्यांवर निशुल्क शस्त्रकर्म करून देतो, असे सांगितले. वैद्यांनी सहकार्यांना सांगितले, हे शस्त्रकर्म तुम्हाला संगणकाच्या पडद्यावर पहाता येईल. वैद्यांनी नियोजन करून सहकार्यांना शस्त्रकर्म दाखवले. त्यांच्यावर पुढील औषधोपचार चालू ठेवले आणि एका मासाने कळवण्यास सांगितले. सर्वांनी शस्त्रकर्म चांगले झाल्याने गुडघेदुखीचा त्रास न्यून झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्या योगी वैद्यांनी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रकर्म केले नव्हते. त्याने दुसर्याच एका शस्त्रकर्माची ध्वनी-चित्रचकती त्यांना दाखवली होती. त्या रुग्णांच्या मनातील माझ्या गुडघेदुखीवर शस्त्रकर्म झाले आहे, या सकारात्मक विचाराच्या परिणामाने त्यांची गुडघेदुखी नष्ट झाली होती.
८. सकारात्मक दृष्टीकोन कसा ठेवायचा ?, याविषयीचे एक उदाहरण
एक साधक म्हणाला, माझ्यात भाव नाही. यावर दुसर्या साधकाने त्याला समजावले, भाव नाही, असे म्हणालात, तर प्रयत्न आणि प्रगती थांबली. माझ्यात भाव अल्प आहे. तो वाढवण्यासाठी काय करू ?, असे म्हणालात, तर ती सकारात्मकता झाली. भाव वाढवण्यासाठी प्रयत्नांना दिशा मिळून कृती चालू होते. भाव तेथे देव हे आपल्याला अनुभवायचे आहे. त्या स्थितीला जाण्यासाठी नकारात्मकता नाही, तर सकारात्मकताच साहाय्य करते.
९. नकारात्मक विचार दूर करण्यासाठी करावयाची प्रार्थना !
हे गुरुदेवा, माझ्या मनात येणार्या नकारात्मक विचारांमुळे मी साधनेपासून दूर जात आहे. मी नकारात्मक विचार दूर करण्यास असमर्थ आहे. आपणच माझ्यावर दया करा. माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करून तुम्हीच मला यातून पार करा, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने पुनःपुन्हा प्रार्थना करत आहे.
१०. प्रयत्नांती परमेश्वर, या उक्तीप्रमाणे प्रयत्नांची कास धरल्यास त्यातून साधना होईल !
प्रयत्नांती परमेश्वर, असे म्हटले आहे. ते ध्यानात घेऊन प्रयत्नांची कास धरून नेटाने एकेक पाऊल पुढे जात राहिल्यास देव नक्कीच साहाय्याला धावून येणार आहे. अशा वेळी देव कुणाच्या माध्यमातून कोणते रूप घेऊन आला आहे आणि अमुक एक गोष्ट मलाच का सांगत आहेत ?, असा विचार न करता सांगितल्याप्रमाणे कृती केल्यास त्यातून चांगलेच निष्पन्न होणार आहे, असा भाव ठेवून प्रयत्न केल्यास त्यातून साधना होणार आहे.
११. गुरुमाऊलीच्या स्मरणानेच आपले नकारात्मक विचार दूर होतील, अशी श्रद्धा ठेवून प्रयत्न करा !
परात्पर गुरुमाऊली प्रेमळ आणि दयाळू आहे. माझ्या साधनेतील अडचणी दूर करण्यास समर्थ आहे. आपल्या प्रार्थनेने गुरुमाऊलीला आपली करुणा येऊन ते आपल्यातील नकारात्मकता दूर करण्यास संकल्प करतील. खरेतर गुरुमाऊलीच्या स्मरणानेच आपले नकारात्मक विचार दूर होतील, आपले मन आणि बुद्धी शुद्ध होतील आणि आपली शुद्ध भक्ती होऊन साधनेत प्रगती होईल. हे सर्व लवकर होण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे पुनःपुन्हा प्रार्थना करूया आणि परात्पर गुरुमाऊलीप्रती श्रद्धा वाढवूया.
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.७.२०१७)
(समाप्त)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |