प.पू. डॉक्टर, १४.८.२०२० या दिवशी रात्री माझ्या मनात काही विचार आले. काही प्रसंगांत आपण सांगितलेली वाक्ये आठवली आणि मनातील सर्व विचार लिहून काढावेसे वाटले.
साधकांना राजश्री सखदेव यांच्या या लेखातून अनेक प्रायोगिक सूत्रे शिकायला मिळतील. त्यांनी त्यांचा स्वतःच्या साधनेसाठी लाभ करून घ्यावा. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. पूर्वजन्मीच्या साधनेमुळे नाही, तर केवळ प.पू. डॉक्टरांच्या इच्छेमुळे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्याची जाणीव होणे
पूर्वी आपण मला २ – ३ वेळा विचारले होते, तुम्ही साधनेत आलातच कशा ? आणि इतके दिवस टिकून कशा राहिलात ? त्या वेळी मी आपल्या बोलण्याचा विचार केला नाही. देव सांगतो, तर त्याकडे लक्ष द्यायला हवे, हे कळलेच नाही. मला वाटत होते, माझी पूर्वजन्मीची काही साधना असेल. त्यामुळे मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे आणि मला प.पू. डॉक्टर भेटले; पण आता लक्षात आले की, माझी पूर्वजन्मीची साधना वगैरे काही नाही. केवळ प.पू. डॉक्टरांच्या इच्छेमुळे मी सनातनमध्ये आले. त्यात माझे काही नाही. मी साधनेत आले कशी आणि इतकी वर्षे टिकले कशी, हे सर्व आपल्यामुळेच आहे. आपणच हे सर्व केलेत, याची जाणीव आता तीव्रतेने होत आहे.
२. प्रत्येक गोष्ट परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे होत आहे, ही जाणीव झाल्याची काही उदाहरणे
२ अ. संत आई लाभणे, ही प.पू. डॉक्टरांची कृपा असणे : माझी आई (सद्गुरु (सौ.) सखदेवआजी) संत आहे, याचाही मला अभिमान होता. तिच्याविषयी कुणी काही बोलले की, मला बरे वाटायचे; कारण ती माझी आई होती; पण प.पू. डॉक्टर आपणच या ठेचकाळणार्या आणि भरपूर अहं असणार्या जिवावर कृपा केलीत आणि मला ती आई म्हणून दिलीत, हे माझ्या लक्षातच आले नव्हते.
२ आ. देवाच्या कृपेचा लाभ करून घेणे म्हणजे खरी श्रीमंती : संत आई मिळाल्याने मी स्वतःला श्रीमंत समजत होते. खरी श्रीमंती म्हणजे आपल्यावर असलेल्या देवाच्या कृपेचा आपण किती लाभ करून घेतो, ही आहे, हे मला कळतच नव्हते. त्यामुळे मी भ्रमात होते.
२ इ. संतसेवेतून वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यासाठीही कृपाच आवश्यक असते, याची जाणीव होणे : आपणच माझ्याकडून संतसेवा करवून घेतली आणि त्या सेवेतून मला असलेला वाईट शक्तींचा त्रास न्यून केलात. वाईट शक्तींचा त्रास न्यून होणे, ही किती मोठी गोष्ट आहे ! त्यासाठी केवळ कृपाच आवश्यक आहे, हे त्या वेळी मला कळले नाही. आता ती जाणीव होत आहे.
२ ई. स्वतःची आई संत असल्यामुळे संतसेवा करायला मिळते, असे नसून प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे संतसेवा करायला मिळणे : प.पू. डॉक्टर, केवळ आपल्यामुळे मला संतसेवेची संधी मिळाली, हेपण माझ्या लक्षात येत नव्हते. माझी आई आहे; म्हणून मला तिची सेवा करायला मिळते, असे मला वाटत होते. त्यात ती आपली कृपा आहे, असे विचार नव्हते. आता ती जाणीव होत आहे.
२ उ. नामजपादी उपायांनी मृत्यूच्या दारात असलेल्या सद्गुरु आजींना प्रतिदिन माघारी आणणारे प.पू. डॉक्टर ! : सद्गुरु आजींच्या आजारपणात केवळ आपल्या कृपेमुळे त्या प्रतिदिन जिवंत रहात होत्या. प्रत्येक दिवशी त्या मृत्यूच्या दारात असत आणि नामजपादी उपाय करायला सांगून आपणच त्यांना तेथून माघारी घेऊन येत होता. हे मी प्रतिदिन अनुभवत होते. मृत्यूच्या दारात जाणे म्हणजे काय असते आणि केवळ देवाच्या कृपेने तेथूनही कसे परत येता येते, हे मी पाहिले. तरीही आपण कोण आहात हे मी ओळखले नाही. मी माझ्या डोळ्यांवर अहंची पट्टी बांधल्याने मला समोरचे दिसत नव्हते. आज ते दिवस आठवले आणि केवळ देवच असे करू शकतो, ही जाणीव तीव्रतेने झाली.
२ ऊ. साधकाला स्व-स्वरूपाची जाणीव त्याच्या लक्षात येईपर्यंत करून देणारे गुरु मिळणे, ही साधकाची खरी संपत्ती असणे : घरी आई-वडील त्यांच्या मुलांना सांभाळतात; पण गुरूंनी साधकाला सांभाळणे, त्याला घडवणे आणि त्याला स्व-स्वरूपाची जाणीव त्याच्या लक्षात येईपर्यंत करून देणे, हे गुरुच करू जाणे. साधकावर असलेली गुरूंची कृपा हीच आहे. हे त्या साधकाचे धन आहे. हीच त्याची खरी संपत्ती आहे. प.पू. डॉक्टर, हे सर्व आजपर्यंत कळले नाही.
२ ए. साधिकेने अपेक्षित अशी साधना करण्यासाठी प.पू. डॉक्टर अनेक वर्षे न कंटाळता प्रयत्न करत असणे : प.पू. डॉक्टर, मी आपल्याला अपेक्षित अशी साधना केली नाही, तरी आपण मला दूर लोटले नाही. शिक्षकही त्याचे न ऐकणार्या मुलाला कितीदा सांगतील ? काही दिवसांनी तेे कंटाळतात; पण आपण अनेक वर्षे न कंटाळता मी सुधारण्यासाठी मला सांगत आहात. तरीही आपण कोण आहात, हे न कळल्याने मला आपले महत्त्व कळले नाही आणि मी माझ्या वागण्यात पालट केला नाही. मी करते, ते बरोबर. मला येते, असे माझे विचार होते. हे सर्व देवामुळे होते, असे वाटणे अगदी वरवरचे होते.
३. अहंमुळे झालेली हानी
३ अ. महर्षींनी प.पू. डॉक्टरांचे खरे रूप दाखवूनही अहंला न सोडल्याने साधनेचे प्रयत्न न होणे : आपण प्रत्यक्ष कोण आहात, हे महर्षींनी उघड केले. गेल्या ४ जन्मोत्सवांमध्ये आपले खरे रूप महर्षींनी दाखवून दिले. आपल्याविषयी काही वाटून माझ्याकडून साधनेचे प्रयत्न झाले नाहीत. खरेतर मी साधना केली, तर त्याचा लाभ मलाच होणार आहे; पण मी त्या अहंला सोडायला अजिबात सिद्ध नव्हते. सुंभ जळला, तरी पीळ सुटत नाही अशी काहीशी माझी अवस्था झाली होती.
३ आ. सेवेच्या निमित्ताने प.पू. डॉक्टरांचे दर्शन होऊन, त्यांचे मार्गदर्शन लाभूनही त्याचा लाभ करून न घेणे : चांगल्या साधकाला गुरूंचे एखादे वाक्य कानी पडले, तर तो त्यानुसार आयुष्यभर आचरण करून स्वतःचा उद्धार करून घेतो. मी मात्र सेवेच्या निमित्ताने आपले सतत दर्शन होऊन, मार्गदर्शन लाभूनही त्याचा काहीच लाभ करून घेतला नाही. याला माझा अहं कारणीभूत होता.
३ इ. स्वतःची साधना चालू झाली आहे, प्रगती होत आहे, असे वाटणे आणि तो भ्रम असल्याचे लक्षात न येणे : प.पू. डॉक्टर, मध्यंतरी मला वाटायचे की, माझी साधना थोडी चालू झाली आहे. हळूहळू का होईना माझी प्रगती होत आहे; पण आज लक्षात आले की, तोही एक भ्रमच होता. मी स्वतःला ओळखलेच नाही. गुरूंना ओळखणे तर किती कठीण आहे ! त्यामुळेच देवा, येथे (रामनाथी आश्रमात) सर्व काही आहे; पण माझ्याकडे काहीच नाही, अशी माझी स्थिती आहे.
३ ई. समाजातील साधना न करणार्यांना पाहून स्वतः साधना करत असल्याचा अहं होणे : समाजातील साधना न करणार्यांना पाहून मला वाटे, अरे, मी तर साधना करते. त्यांंच्यापेक्षा मी बरी आहे. देवा, तोही माझा अहं होता. समाजातील काहींमध्ये असा अहं नसल्याने ते त्यांच्या नित्य कृती करून साधनेत पुढे गेलेही असतील.
३ उ. केवळ स्वकडे लक्ष असल्याने प.पू. डॉक्टर कोण आहेत, याची जाणीव नसणे आणि त्यामुळे त्यांचा लाभ करून न घेणे : आज मला माझ्यातील अहंची थोडी जाणीव होत आहे. इतकी वर्षं गेली; पण मी आपला लाभ करून घेतला नाही ही जाणीव पुष्कळ अल्प आहे. मी स्वतःकडेच पहात असल्याने आपण कोण आहात, याकडे माझे लक्षच जात नाही. त्यामुळे आपल्याला अपेक्षित असा लाभ मला करून घेता आला नाही.
४. देवच सर्व करत असल्याची किंचित जाणीव होणे
आज आपण मला अंतर्मुख केलेत. तोपर्यंत मी पूर्ण बहिर्मुख होते. मला वाटत होते की, मला साधना कळली आहे. मी मला जमतील तसे प्रयत्न करत आहे. मी प्रामाणिकपणे सेवा करत आहे. मी पुष्कळ सेवा करते. वेळ व्यर्थ घालवत नाही. माझ्या सेवेचा वेग इतरांच्या तुलनेत अधिक आहे. माझ्या मनात असे सर्व मी भोवती फिरणारे विचार होते. मी वरवर म्हणत असे, देवच सर्व करतो; पण आता मला जाणीव होतेय की, ते विचार स्वविषयी आणि स्वतःला कुरवाळणारे होते. आता देवच करत आहे याची किंचित जाणीव होत आहे.
५. प्रार्थना
साधनेतील एका महत्त्वाच्या टप्प्याची आपण मला जाणीव करून दिलीत. ही आपलीच कृपा आहे. आपण माझे बोट धरले आहेत. शेवटपर्यंत आपणच घेऊन जाणार आहात, ही निश्चिती आहे. यापुढील साधना आपणच करून घ्यावी, ही आपल्या चरणी शरणागतीने प्रार्थना !
– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |