सनातन संस्थेच्या वतीने ५.७.२०२० या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाविषयी कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
‘गुरुपौर्णिमा म्हणजे साधकांच्या जीवनातील सर्वात मोठा सण; परंतु या वेळी कोरोना महामारीमुळे प्रतिवर्षीप्रमाणे प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने सर्व साधक, धर्मप्रेमी आणि समाजातील व्यक्ती यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘गुरुपरंपरेचे पूजन, ‘साधकांना साधनेविषयी असलेले प्रश्न आणि अडचणी, त्यांना गुरुदेवांनी दिलेली उत्तरे’ याविषयीची ध्वनीचित्रचकती आणि ‘आपत्काळात साधनेची आवश्यकता’ याविषयी संतांचे मार्गदर्शन’ यांचे नियोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेला गुरुतत्त्व एक सहस्र पटींनी कार्यरत असते. सहस्रो लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा लाभ घेतला. अशा या अलौकिक कार्यक्रमात सहभागी झालेले साधक आणि धर्मप्रेमी यांना अनेक अनुभूतीही आल्या. अनेकांनी ‘श्री गुरु हे साक्षात् ईश्वराचे सगुण रूप आहेत’, असेही अनुभवले.
१. धर्मप्रेमींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत !
१ अ. प.पू. डॉ. आठवले यांनी सांगितलेला विषय मनाला पुष्कळ भावला ! : प.पू. डॉ. आठवले यांनी सांगितलेला विषय मनाला पुष्कळ भावला. आम्ही जीवनात ‘साधना करणे’ अतिशय कष्टाचे आहे’, असे समजलो होतो; परंतु त्यांचे बोलणे ऐकून ‘साधना करणे’ सुलभ आहे’, असे आम्हाला वाटले. परात्पर गुरु डॉक्टर किती सहजतेने सर्वांशी बोलले. ते साधकांनी विचारलेल्या प्रश्नाला तत्परतेने आणि चांगली उत्तरे देत होते. मला पुष्कळ चांगले वाटत होते. मी आणि माझ्या यजमानांनी हा कार्यक्रम बघितला. ‘कन्नड मार्गदर्शन ऐकून पुढे येणारा काळ किती भयानक आहे’, हे लक्षात आले. आता मी कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाला प्रारंभ केला आहे.
– सौ. गंगा (धर्मप्रेमी), बेंगळुरू
१ आ. ‘प.पू. गुरुदेवांना पाहून माझी भावजागृती झाली. गुरुदेवांच्या मुखकमलावर चंद्राची कळा असून ‘किती तेज आहे !’, असे मला वाटले.’ (प्रत्यक्षात श्री. पवन वेगळ्या मार्गाने साधनारत आहेत.)
– श्री. आलूर पवन (हिंदुत्वनिष्ठ), हुब्बळ्ळी
१ इ. केवळ भगवंतालाच असा व्यापक प्रसार करणे शक्य आहे ! : ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला. गुरुदेवांनी पुष्कळ चांगल्या रितीने मार्गदर्शन केले. मला सर्व अर्थ समजला. मी माझ्या मित्रांना कार्यक्रमाचा संदेश पाठवला होता. दळणवळण बंदीमुळे बेंगळुरूसारखे मोठे नगर सोडून लोक दुसरीकडे जात आहेत. सध्या कोरोनामुळे स्थिती अधिक बिकट झाली आहे. ‘अशा स्थितीतही चांगल्या रीतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा साजरी करून ती समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न होणे’, ही सामान्य गोष्ट नाही. केवळ भगवंतालाच असा व्यापक प्रसार करणे शक्य आहे. मी नामजप करत आहे आणि मित्रांनाही करायला सांगितला आहे.’
– श्री. पवन, मैसुरू
१ ई. माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली ! : ‘गुरुपौर्णिमेच्या वेळी मला गुरुदेवांचे मार्गदर्शन प्रारंभी समजले नाही. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर गुरुदेवांच्या मार्गदर्शनाचा अर्थ मला समजू लागला. माझ्या मनात जे काही प्रश्न होते, त्या सर्वांची उत्तरे मला मिळाली. सामान्यतः संत गुरुपौर्णिमेला कुठल्या तरी कथेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करतात; परंतु प.पू. गुरुदेवांचे वैशिष्ट्य, म्हणजे प्रस्तुत काळात समाजाला जे आवश्यक आहे, तेच त्यांनी सांगितले. मला गुरुपौर्णिमेचे मार्गदर्शन वैशिष्ट्यपूर्ण वाटले.’
– श्री. सुंदर शिंदे, बेळगाव
१ उ. ‘गुरुदेवांविषयी माहिती देणार्या सनातन संस्थेप्रती कृतज्ञता !
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
‘अशा श्री गुरूंचे दर्शन होणे’, हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल. संतांच्या मार्गदर्शनाने पुष्कळ आनंद झाला.’
– अधिवक्ता वागीश, शिवमोग्गा
१ ऊ. आम्हाला असे चैतन्यमय मार्गदर्शन आजपर्यंत मिळाले नव्हते ! : ‘आम्ही आधी वेगळ्या संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होतो. आता अनेक दिवसांपासून ते संत आमच्या संपर्कात नाहीत. आम्हाला सनातनच्या गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकून पुष्कळ चांगले वाटले. आम्हाला असे चैतन्यमय मार्गदर्शन आजपर्यंत मिळाले नव्हते. भगवंतानेच आमचा सनातनशी परिचय करून दिला आहे. त्यासाठी तुमच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता !’
– सौ. जानकी बार्गव, बेंगळुरू
१ ए. प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकून पुष्कळ भावजागृती झाली ! : ‘मी हा कार्यक्रम संध्याकाळी असल्याचे विसरून गेले होते; परंतु गुरुदेवांच्या अपार कृपेने त्याच वेळी साधकांनी दूरभाष करून मला आठवण करून दिली. प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकून पुष्कळ भावजागृती झाली आणि ती शेवटपर्यंत टिकून होती.’
– कु. राजश्री जडी (धर्मप्रेमी), हुब्बळ्ळी
१ ऐ. गुरुदेवांची वाणी ऐकून साधनेला प्रेरणा मिळाली ! : ‘मी गुरुपौर्णिमेविषयी जाणून घेतले. गुरुदेवांची वाणी ऐकून मला साधना करायला प्रेरणा मिळाली. संतांच्या मार्गदर्शनाने मला साधनेच्या आवश्यकतेची जाणीव झाली. मी काही अधिवक्त्यांना दूरभाष करून, तर काहींना लघुसंदेश पाठवून कार्यक्रमाविषयी सांगितले आणि त्यांनाही आजच्या कार्यक्रमाला जोडण्याचा प्रयत्न केला.’
– अधिवक्त्या अर्चना शेणै, ऊर्व, मंगळुरू
२. जिज्ञासूंनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांविषयी व्यक्त केलेले मनोगत !
२ अ. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकून या धर्माभिमान्याने उत्तरदायी साधकाला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘माझ्या पत्नीला ‘मी कुठे कुठे न्यून पडतो ? आणि माझ्याकडून कुठल्या चुका होतात ?’ ते मला सांगायला सांगा.’’
– श्री. यशवंत कापु, तुमकुरू
२ आ. ‘आम्हालाही साधना करून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करावे’, असे वाटते ! : ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात प.पू. गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी केलेले मार्गदर्शन ऐकल्यावर सौ. रूपा यांनी साधकांना दूरभाष करून सांगितले, ‘‘मार्गदर्शन पुष्कळच चांगले होते. ‘आम्हालाही साधना करून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करावे’, असे वाटते.’
– सौ. रूपा चोळिन, बागलकोट (त्यांनी तत्परतेने अर्पण दिले.)
२ इ. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्संगामुळे आम्हाला पुष्कळ चांगले विचार समजले. आम्ही आमच्यातील स्वभावदोष न्यून करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. संतांच्या मार्गदर्शनाने आमच्या घरात पालट झाला आहे आणि शांत वाटत आहे.’
– वीणा रविकुमार, शिवमोग्गा
३. गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती
३ अ. कृतज्ञता व्यक्त करत असतांना देहात विद्युत संचार झाल्याचा अनुभव येणे आणि ‘कार्यक्रम अजून चालूच रहावा, आपण पुष्कळ सेवा करावी आणि गुरुदेवांची शिकवण जगाला सांगावी’, असे वाटणे : ‘गुरुपौर्णिमेनिमित्त मी आणि माझे कुटुंब यांच्याकडून सनातन संस्थेला अनंत वंदन ! मी कृतज्ञता व्यक्त करत असतांना मला माझ्या देहात विद्युत संचार झाल्याचा अनुभव आला. डोळे मिटल्यावर ‘प्रकाश पडल्याचे जाणवून गुरुदेव माझ्या मागे उभे आहेत’, असे मी अनुभवले. माझ्या डोळ्यांतून आपोआपच आनंदाश्रू वहात होते. मला ‘कार्यक्रम अजून चालूच रहावा. आपण पुष्कळ सेवा करावी आणि गुरुदेवांची शिकवण जगाला सांगावी’, असे वाटत होते.
– श्री. राजू धरियण्णा (धर्मप्रेमी)
३ आ. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पाहिल्यावर थकवा नाहीसा होऊन उत्साहजाणवणे ! : ‘सकाळपासून काम करून मी थकून घरी आलो होतो; मात्र गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पहायला लागल्यावर मला पुष्कळ चांगले वाटले. माझा थकवा नाहीसा होऊन मला उत्साह जाणवत होता.’
– श्री. प्रकाश बडिगेर, हुब्बळ्ळी (धर्मप्रेमी)
३ इ. स्वप्नात पू. रमानंद अण्णांनी ‘तुझ्यासाठी धर्मस्थळचा प्रसाद आणला आहे’, असे सांगून प्रसाद देणे : ‘माझी व्यष्टी साधना अल्प झाली होती. पू. रमानंद अण्णांचे मार्गदर्शन ऐकल्यावर ‘व्यष्टी साधना अधिक गांभीर्याने केली पाहिजे’, असे मला वाटले. त्याच दिवशी स्वप्नात त्यांनी ‘तुझ्यासाठी धर्मस्थळचा प्रसाद आणला आहे’, असे सांगून मला प्रसाद दिला. मला पुष्कळ कृतज्ञता वाटून आनंद झाला.’
– श्री. मंजुनाथ अदरगुंची (धर्मप्रेमी), हुब्बळ्ळी
(क्रमश: सोमवारच्या अंकात)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/449170.html