तिरंग्याचा ‘मास्क’ वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथील पोलीस आणि प्रशासनास निवेदन

(डावीकडे) गटशिक्षणाधिकारी श्री. लवटे यांना निवेदन देतांना श्री. सुरेश जोशी

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर), २२ जानेवारी (वार्ता.) –  दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा ‘मास्क’ वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, तर ध्वजसंहितेनुसार ‘राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे वापर करणे’, हा ध्वजाचा अवमानच आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने पोलीस ठाणे, तसेच प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी (बी.डी.ओ.) सौ. सुप्रिया चव्हाण, गटशिक्षण अधिकारी श्री. लवटे, नगरपालिका मुख्याधिकारी परचंडराव, कामगार कल्याण केंद्राचे केंद्रसंचालक सचिन आवळेकर, शिक्षण मंडळाचे श्री. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश जोशी, तसेच श्री. ऋत्विक जोशी, श्री. अभिषेक रोंगे, सौ. वैशाली वठारे, सौ. सुरेखा जोशी, कु. कांचन वाले आदी राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते. हे निवेदन येथील ४ महाविद्यालये आणि १३ शाळा येथेही देण्यात आले.

सोलापूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री कृष्णहरी क्यातम, तुळसीदास चिंताकिंदी, बालराज दोंतुल, रमेश आवार, आनंद (भाऊ) मुसळे, विलास आडकी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ आदी राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.