आंदोलकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शेळ-मेळावली येथे जाणार नाहीत ! – सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ८  जानेवारी (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेळ-मेळावली येथे नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांना भेटण्यासाठी जाणार नाहीत, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना दिली.

ते म्हणाले, ‘‘विरोधी पक्ष शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांना नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाला विरोध करण्यास लावून त्यांची दिशाभूल करत आहेत. ६ जानेवारीला पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये मेळावली येथे झालेल्या संघर्षात जवळपास १२ पोलीस आणि अनेक ग्रामस्थ घायाळ झाले. मुख्यमंत्री या स्थानिक लोकांशी बोलण्यास सिद्ध आहेत; परंतु ते त्यांना भेटण्यासाठी गावात जाणार नाहीत. जर मुख्यमंत्र्यांनी गावात भेट दिली, तर सामाजिक मानसिकतेमुळे आणखी तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते. ग्रामस्थांनीच त्यांना भेटून या विषयावर चर्चा करावी. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. मला गावात काही लाल झेंडेही दिसत आहेत. साम्यवादीही या परिस्थितीचा लाभ उठवू पहात आहेत. गोव्यात आय.आय.टी. प्रकल्प उभारावा, हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. आताचे शासन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी विरोधी पक्षांचे ऐकून चुकीच्या मार्गाने जाऊ नये. पोलिसांनी ग्रामस्थांवर गुन्हे प्रविष्ट केल्यावर हे पक्ष साहाय्याला येणार नाहीत. ६ जानेवारीला झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याविषयी ग्रामस्थांवर गुन्हे नोंद केले आहेत. ज्या दिवशी अशासकीय संस्था आणि विरोधी पक्ष या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे बंद करतील, त्या दिवशी आय.आय.टी. प्रकल्पाविषयीचा प्रश्‍न सोडवला जाईल.’’

मेळावली गावात प्रवेश करू पहाणार्‍या दोघांना अटक

६ जानेवारीच्या मेळावली ग्रामस्थांशी झालेल्या संघर्षात गंभीर घायाळ झालेल्या १५ महिला पोलिसांची नावे गोवा पोलिसांनी ८ जानेवारीला घोषित केली आहेत. या वेळी पोलिसांवर करण्यात आलेले आक्रमण हे जीवघेणे होते. त्यामुळे या प्रकरणी ३०७,३२३,३२४ ते ३२६ ही भा.दं.संहितेतील कलमे लावणे भाग आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. ८ जानेवारीला वाळपई आणि मेळावली या परिसरात शांतता होती. या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले असून ८ जानेवारीला मेळावली गावात प्रवेश करू पहाणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.